अनिवासी भारतीयांनाही म्युच्युअल फंडांत संधी

उज्ज्वल मराठे
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा वाढता कल आता म्युच्युअल फंडांकडे आहे. दीर्घ कालावधीसाठी म्युच्युअल फंडांच्या योजनांचे फायदे गुंतवणूकदारांना पटू लागले आहेत.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा वाढता कल आता म्युच्युअल फंडांकडे आहे. दीर्घ कालावधीसाठी म्युच्युअल फंडांच्या योजनांचे फायदे गुंतवणूकदारांना पटू लागले आहेत.

अनिवासी भारतीयांना (एनआरआय) पण आता म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुवर्णपर्वाचा भागीदार होणे सहजशक्‍य आहे. भारतात प्रस्थापित असलेल्या म्युच्युअल फंडाच्या योजनांतून अनिवासी भारतीयांना त्यांच्या नावाने गुंतवणूक करता येते. मात्र, अमेरिका आणि कॅनडा येथील निवासी गुंतवणूकदार काही मोजक्‍याच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात. गुंतवणूक करण्यासाठी ‘पॅन’ असणे आवश्‍यक असून, ‘केवायसी’ची पूर्तता करावी लागते. गुंतवणूक डेट किंवा इक्विटी योजनांमध्ये करता येतो. तसेच डिव्हीडंड किंवा ग्रोथ असे पर्याय निवडता येतात. गुंतवणूक करताना त्यासाठीचा अर्ज भरून किंवा ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्यास तिचा वापर करता येतो. रहिवासी गुंतवणूकदारांप्रमाणेच म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी ‘एसआयपी’, ‘एसटीपी’ आणि ‘एसडब्ल्यूपी’ सुविधा उपलब्ध असतात. 

गुंतवणूक करतेवेळी अनिवासी भारतीयांच्या ‘एनआरओ’ किंवा ‘एनआरई’ बॅंक खात्यातूनच रक्कम गुंतवावी लागते. ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’मार्फतदेखील गुंतवणूक करणे शक्‍य असते. मात्र, अशा वेळेस ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ची प्रत गुंतवणूक अर्जासोबत द्यावी लागते. ‘एनआरओ’ बॅंक खात्यातून केलेल्या गुंतवणुकीची जेव्हा विक्री होते, त्या वेळेस मिळणाऱ्या रकमेचे परकी चलनात पुनःपरिवर्तन करता येत नाही. ‘एनआरई’ बॅंक खात्यातून केलेल्या गुंतवणुकीची विक्री होते, त्या वेळेस मात्र मिळणाऱ्या रकमेचे परकी चलनात पुनःपरिवर्तन करता येते. 

करतरतुदी कोणत्या लागू होतात?
भारतीय रहिवासी गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर ज्या-ज्या कर तरतुदी लागू आहेत, त्या सर्व अनिवासी भारतीयांनादेखील लागू आहेत. युनिटधारकाला मिळणाऱ्या लाभांशावर त्याला कोणताही कर भरावा लागत नाही; पण होणाऱ्या भांडवली नफ्यातून ‘टीडीएस’ कापला जातो. म्युच्युअल फंड ‘टीडीएस’ कापून घेतात आणि उर्वरित रक्कम गुंतवणूकदाराच्या बॅंक खात्यात जमा करतात. अल्पकालीन भांडवली नफ्यावरील ‘टीडीएस’चा दर इक्विटी योजनांसाठी (१२ महिन्यांपूर्वी विक्री करून झालेला नफा) - १५ टक्के आणि डेट योजनांसाठी (३ वर्षांपूर्वी विक्री करून झालेला नफा) - ३० टक्के आहे. तसेच, दीर्घकालीन भांडवली नफ्यावर ‘टीडीएस’चे दर हे इक्विटी योजनांसाठी (१२ महिन्यांनंतर  विक्री करून झालेला नफा) - १० टक्के आणि डेट योजनांसाठी (३ वर्षांनंतर विक्री करून झालेला नफा) - १० टक्के आहे.

अनिवासी भारतीयांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना परकी चलनाच्या तुलनेत रुपयाच्या होणाऱ्या घसरणीचा फटका बसू शकतो. हा धोका मात्र गुंतवणूकदाराने कायम लक्षात ठेवला पाहिजे. मात्र, दीर्घ कालावधीत रुपयाच्या अवमूल्यनानामुळे होणाऱ्या नुकसानापेक्षा जास्त दराने परतावा मिळण्याची अधिक शक्‍यता आहे आणि त्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड योजना आकर्षक ठरतील. डेट योजना परताव्याच्या दृष्टिकोनातून ‘एनआरई’ खात्यावरील परताव्याच्या तुलनेत फारशा आकर्षक वाटत नाहीत. याचे कारण अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांना त्यांच्या ‘एनआरई’ बॅंक खात्यावर मिळणारे व्याज आजमितीला ६.७५ ते ७.२५ टक्के दराने आहे आणि ते करमुक्त आहे. व्याजदर जर कमी झाले तर ही परिस्थिती पण बदलेल. ‘एनआरओ’ खात्यावरील व्याज मात्र करपात्र आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunities for non-resident Indians in mutual funds