‘ओव्हरनाइट’ प्रकाशझोतात आलेला फंड

Overnight-Fund
Overnight-Fund

‘सेबी’ने म्युच्युअल फंडात एका नव्या विभागाला गेल्याच वर्षी परवानगी दिली आणि ती म्हणजे ‘ओव्हरनाइट फंड’! या योजना अलीकडच्या काळात अचानक प्रकाशझोतात आल्या. काय असतात हे ‘ओव्हरनाइट फंड’, 
ते थोडक्‍यात पाहूया.

आतापर्यंत आपल्याला म्युच्युअल फंडांच्या ‘लिक्विड फंड’ योजनांची ओळख होती. या योजनांमध्ये मूळ मुद्दल (बऱ्यापैकी) सुरक्षित असते आणि परतावा बॅंकेच्या बचत खात्यापेक्षा जास्त मिळतो. ‘ओव्हरनाइट फंड’ योजना यादेखील ‘लिक्विड’ योजनांचाच भाग असून, त्या लिक्विड योजनांसारखेच कार्य करतात. यात प्रवेश आणि बहिर्गमन भार नाही, ‘लॉक-इन-पिरियड’ नाही. यातील एकही पैसा शेअर बाजारामध्ये गुंतविला जात नाही, त्यामुळे शेअर बाजाराची जोखीम नाही. शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशीसुद्धा याचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) काढले जाते. पैसे काढण्यासाठी अर्ज दिल्यावर दुसऱ्याच दिवशी सकाळी पैसे बॅंक खात्यात जमा होतात. मग आता फरक काय आहे ते पाहूया. 

पैसे गुंतविण्यात फरक!
ओव्हरनाइट फंडात फरक केवळ पैसे गुंतविण्यामध्ये आहे. लिक्विड योजनांमधील पैसे तीन महिने कालावधीपर्यंतच्या मनी मार्केट पेपर्समध्ये गुंतविले जातात. त्यात सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट (सीडी), कॉल मनी मार्केट, सीबीएलओ किंवा ट्रेप्स अर्थात ट्राय पार्टी रेपो, सरकारी रोखे आदींचा समावेश असतो. परंतु, ओव्हरनाइट फंड योजनांमधील पैसे हे केवळ एक दिवसाचा कालावधी (मॅच्युरिटी) असलेल्या साधनांमध्ये अथवा पेपर्समध्येच गुंतविले जातात आणि तेसुद्धा शक्‍यतो कॉल मनी मार्केट, सीबीएलओ किंवा ट्रेप्स अर्थात ट्राय पार्टी रेपो यांमध्येच गुंतविले जातात. (गुंतवणूकदार मात्र कितीही दिवस यात गुंतवणूक ठेवू शकतात.) कॉल मनी मार्केट नावाचा बाजार असतो, ज्यामध्ये बहुतांशी बॅंका एका दिवसासाठी व्याजाने पैसे देतात आणि घेतात. बॅंकांनी एकमेकांना एका दिवसासाठी पैसे दिले असल्याने आणि हे व्यवहार क्‍लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (सीसीआयएल) या संस्थेमार्फत होत असल्याने यामध्ये पैसे बुडण्याचा धोका नसतो. एसबीआय, एलआयसी व अन्य बॅंकांनी मिळून रिझर्व्ह बॅंकेच्या पाठिंब्याने ‘सीसीआयएल’ची स्थापना केली असून, ती प्रत्येक व्यवहार सुरळीत होईल, याची खात्री दिली जाते. देणेकरी, घेणेकरी आणि सीसीआयएल या तीन संस्थांमधील हा करार असतो म्हणून त्याला ‘ट्राय पार्टी रेपो’ असेही म्हणतात. यामध्ये व्याजदराची जोखीम नसते; तसेच क्रेडिट जोखीमही आणि डिफॉल्ट जोखीमसुद्धा नसते. कारण बॅंकांनी पैसे परत केले नाहीत, तर ती सॉव्हरिन म्हणजेच सरकारची जोखीम होते. एक दिवसाची गुंतवणूक असल्याने व्याजदर आधीच ठरविलेला व स्थिर असतो. गुंतवणूक ‘मार्क टू मार्केट’ अर्थात बाजारभावाशी संलग्न नसते. 

अशाप्रकारे ‘ओव्हरनाइट फंड’मधील गुंतवणूक ही लिक्विड योजनांच्या तुलनेत आणखीनच सुरक्षित होते. अर्थात, लिक्विड योजनांच्या तुलनेत ओव्हरनाइट फंडामध्ये परतावा थोडा कमी मिळतो. सध्या ओव्हरनाइट फंडामध्ये साधारणपणे ६.५० टक्के वार्षिक परतावा मिळत आहे.

कशामुळे प्रकाशझोतात?
मागील दोन-तीन महिन्यांपासून या योजनांमधील गुंतवणूक वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे पैसे परत करण्यामधील ‘आयएल अँड एफएस’ या ‘एनबीएफसी’ची असमर्थता. यामुळे ज्या म्युच्युअल फंडांच्या लिक्विड योजनांमध्ये ‘आयएल अँड एफएस’चे पेपर्स होते, त्या योजनांना (मार्क टू मार्केट) तोटा होऊन त्यांचे निव्वळ मालमत्ता मूल्य घसरले. यामुळे लिक्विड योजनांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर ‘ओव्हरनाइट फंड’ योजना विशेषत्वाने प्रकाशझोतात आल्या. सध्या फक्त आदित्य बिर्ला, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एल अँड टी, एसबीआय आणि यूटीआय या म्युच्युअल फंडांनी ‘ओव्हरनाइट फंड’ ही योजना सुरू केली आहे आणि सर्वांची मिळून एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता साधारणपणे १५ हजार कोटी रुपये आहे.

कोणासाठी हा फंड योग्य?
‘सेबी’च्या नियमांप्रमाणे म्युच्युअल फंडांना त्यांच्या कोणत्याही योजनेमध्ये परतावा अथवा मुद्दलाची खात्री देता येत नाही. असे असले तरी ‘ओव्हरनाइट फंड’ योजना कोठे पैसे गुंतवते, हे तपासले तर ज्या गुंतवणूकदारांना परतावा थोडा कमी मिळाला तरी चालेल; परंतु मूळ गुंतवणूक सुरक्षित हवी आहे, अशा मंडळींनी या योजनेचा विचार करायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com