लॉकडाउनच्या काळात 'पर्सनल फायनान्स'कडे लक्ष द्या

personal-finance
personal-finance

आपल्या आजूबाजूला सध्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या विश्वास बसण्याजोग्या नाहीत. अशा गोष्टी आपण फक्त चित्रपटातच पाहिल्या आहेत. मात्र, खऱ्या आयुष्यात संपूर्ण देशात लॉकडाउन होऊन आपल्या सर्वांना घरातच राहावे लागेल या गोष्टींची कधी कल्पनाही केली नव्हती. संपूर्ण जग थांबल्यासारखे झाले आहे. या सर्व घडामोडींमुळे जगभरातील बाजार कोसळत आहेत आणि या सर्व गोष्टी कधी थांबतील याबाबत कोणीही सांगू शकत नाही. 

यात दिलासादायक बाब म्हणजे प्रत्येकाला कुटुंबासमवेत घालवण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे. स्वतःला वेळ देऊन आयुष्याला अधिक चांगल्या पद्धतीने पाहण्याची संधी मिळाली आहे. हीच ती वेळ आहे की ज्यावेळी तुमच्या 'पर्सनल फायनान्स'चे योग्य नियोजन करता येईल. 

(1) 'इन्शुरन्स ऑडिट' करा:
'इन्शुरन्स ऑडिट' करण्याची ही चांगली वेळ आहे. 'कोरोना'सारख्या संकटामुळे आयुष्यात अनिश्चितता अनुभवतो आहोत. त्यामुळे सर्वात प्रथम टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स आर्थिक  आणीबाणीच्या काळात कुटुंबाची काळजी घेऊ शकेल का? हे पाहा.

(2 )  'ऍसेट अॅलोकेशन' तपासा:
बाजारात अस्थिरतेचे वातावरण असल्याने 'ऍसेट अॅलोकेशन' करणे आवश्यक आहे. सध्या म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक पाहिल्यास ती फारशी समाधानकारक दिसणार नाही. पण त्यातील गुंतवणूक न थांबवता ती वाढवण्यासाठी योग्य वेळ आहे. भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल. सध्या तुमच्या एकूण ऍसेटमध्ये 'इक्विटी'तील गुंतवणूक कमी असेल, तर चिंता करण्याची गरज नाही.  तुमचा पोर्टफोलिओ 'रिकव्हर' होण्यास काही काळ द्यावा लागू शकतो. सध्या गुंतवणुकीत घट झाली असली, तरी अतिघाईने कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नका.

(3) 'ऍसेट अॅलोकेशन' तपासताना : तुम्ही नको असलेल्या किंवा टाकाऊ उत्पादनामध्ये गुंतवणूक केली आहे का हेही तपासा. बऱ्याचदा नियोजन न करता किंवा त्यावेळची गरज म्हणून काही उत्पादनांमध्ये गुंतवणूक करतो. मात्र, तिचे  पुनर्मूल्यांकन करणे आपल्याला शक्य होत नाही. 

(4) 'बॅलन्सशीट' तयार करा :
तुम्ही स्वतःचे 'बॅलन्सशीट' तयार केले आहे का? तुमची निव्वळ मालमत्ता, उत्पनाची साधने, देणी आणि कर्जे माहिती आहेत का ? निव्वळ मालमत्तेचे 'स्टेटमेंट' तयार करा. त्यातून तुम्हाला तुमचे एकूण उत्पन्न आणि देणी समजतील. या 'स्टेटमेंट'द्वारे तुमची सध्याची आर्थिक स्थिती आणि उद्दिष्टाचा विचार करता तुम्ही कुठे आहात हे लक्षात येईल. 

(5) मुलांना आर्थिक धडे: 
 तुमची मुले आता घरात असतील. त्यांच्यासोबत बसा आणि त्यांना 'पर्सनल फायनान्स' शिकवा. गुंतवणुकीचे सोपे धडे द्या. उदा. बँकिंग व्यवहार कसे होतात. ऑनलाईन पैसे कसे ट्रान्सफर करायचे हे शिकवा.  'बजेटिंग' आणि 'इन्व्हेस्टिंग' ही दोन मूलभूत तत्त्वे समजावून सांगा.

 (6) फायनान्शिअल डॉक्युमेंट्स जपा :
गेल्या काही आठवड्यांत जग पूर्णपणे बद्दलल्याचे प्रत्येकाने अनुभवले आहे. भविष्यात काही विपरीत घडल्यास तुमची सर्व 'फायनान्शिअल डॉक्युमेंट्स' सहज पद्धतीने सापडतील अशा एका ठिकाणी आहेत का? त्याचा व्यवस्थित 'बॅकअप' ठेवला आहे का? 'फायनान्शिअल डॉक्युमेंट' डिजिटल स्वरूपात देखील ठेवणे आवश्यक आहे.

(7) तुमच्या जोडीदाराला माहिती द्या: 
तुम्ही केलेल्या गुंतवणुकीबद्दल तुमच्या जोडीदाराला, जवळच्या व्यक्तींना माहिती आहे? तुमच्या अनुपस्थितीत तुमची गुंतवणूक, महत्त्वाचे 'पासवर्ड' जोडीदाराला माहिती असणे गरजेचे आहे.

(8) इच्छापत्र तयार करा:
तुमचे इच्छापत्र तयार करण्याची ही चांगली वेळ आहे. अनेक वेळा आवश्यकता भासत नसल्याने इच्छापत्र करणे टाळले जाते. फक्त श्रीमंतांनीच नव्हे तर प्रत्येकाने इच्छापत्र करायला हवे. यामुळे भविष्यातील कौटुंबिक कलह टाळता येतात.
लेखक गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com