वैयक्तिक अपघात विमा : एक अपरिचित सुहृद

अनेकदा विम्याचा विषय निघाला, की बहुतांशजण टर्म इन्शुरन्स घेतला का, असा प्रश्न विचारतात.
Personal Accident Insurance Unfamiliar Friend insurance
Personal Accident Insurance Unfamiliar Friend insurancesakal

- विक्रम अवसरीकर \ मिलींद पत्की

अनेकदा विम्याचा विषय निघाला, की बहुतांशजण टर्म इन्शुरन्स घेतला का, असा प्रश्न विचारतात. आयुर्विमा, आरोग्य विमा याविषयी चर्चा होते, मात्र टर्म इन्शुरन्सची छोटी बहीण असलेल्या पर्सनल पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी म्हणजे वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीविषयी कोणाला फारशी माहिती नसते.

तुम्हाला एखाद्याने सांगितले, की मी अशी एक पॉलिसी काढली आहे. त्यात माझा अपघात झाला, तर उपचाराचे सगळे पैसे मिळतीलच; पण माझे उत्पन्न थांबले असल्यास तेही साधारण दोन वर्षे मला दिले जाईल. मग तुमची प्रतिक्रिया काय असेल? आणि ही पॉलिसी घेण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय तपासणीची गरज नाही, वयाची अट नाही. कोणीही कधीही ही पॉलिसी चुटकीसरशी घेऊ शकतो. तेदेखील अतिशय स्वस्तात! हे ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच बरे वाटले असेल.

पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी ही कोणत्याही जनरल इन्शुरन्स कंपनीची आपण घेऊ शकतो. पॉलिसी घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पॉलिसीची पूर्ण रक्कम नॉमिनीला मिळते. पॉलिसी घेतलेल्या व्यक्तीचा अपघात झाल्यास, काही प्रमाणात त्याच्या उपचाराचा खर्चदेखील दिला जातो.

उत्पन्न बुडत असेल, तर साधारण १०२ आठवडे पाच लाखांपर्यंतची रक्कम समान विभागून प्रत्येक आठवड्याला दिली जाते. अंशतः किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास, ते किती टक्के आहे, याबद्दलच्या वैद्यकीय चार्टप्रमाणे एकरकमी पैसे दिले जातात. आपण जसे त्यात रायडर घेऊ, त्याप्रमाणे मुलांच्या शिक्षणासाठी वगैरे कर्ज घेतले असेल, तर त्याचीही रक्कम पॉलिसी रकमेच्या प्रमाणात एकरकमी दिली जाते.

आपण ही पॉलिसी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या ऑफिसमधील ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसीअंतर्गत घेऊ शकतो. पॉलिसी घेण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय चाचण्यांची आवश्यकता नाही. केवळ अपघात, अपघातामुळे आलेले अपंगत्व किंवा मृत्यू या वेळीच पैसे मिळत असल्याने वयाचीही अट नाही.

या पॉलिसीत कशाचा समावेश होत नाही?

नैसर्गिक मृत्यू झाल्यास पैसे मिळत नाहीत. कोणत्याही प्रकारच्या आजाराच्या उपचारासाठी पैसे मिळत नाहीत. कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य करताना झालेल्या अपघातांसाठी पैसे मिळत नाहीत. आत्महत्या किंवा स्वतःला इजा करून घेतल्यास पैसे मिळत नाहीत. दारू किंवा अति उत्तेजक पदार्थ घेतल्यामुळे काही झाल्यास पैसे मिळत नाहीत.

ही पॉलिसी घेताना आपण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या जास्तीतजास्त २० पट किंवा मासिक उत्पन्नाच्या साधारण ७२ पटीपर्यंत घेऊ शकतो. हे वेगवेगळे आकडे अशासाठी, की वेगवेगळ्या कंपन्यांचा वेगवेगळा निकष असू शकतो.

त्याचप्रमाणे आपल्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे वेगवेगळ्या जोखमी असतात, त्यासाठी त्याच्या वर्गवारीनुसार वेगवेगळा प्रीमियम असतो. ज्याचे काम बैठे आहे, त्याचा प्रीमियम हा ज्याचे काम फिरतीचे आहे, त्यापेक्षा कमी असणार. जनरल इन्शुरन्स क्षेत्रातील राष्ट्रीय कंपन्या आपल्या उत्पन्नाचा दाखला मागवून खात्री करून मगच त्याप्रमाणात ही पॉलिसी देतात.

खासगी कंपन्या आधी पॉलिसी देतात, मग कागदपत्रे मागवतात. मेडिक्लेम पॉलिसीप्रमाणेच क्लेम दाखल करावा लागतो. अपघाती मृत्यू झाल्यास पोस्टमार्टेम, पोलिसांच्या तक्रारीची कॉपी द्यावी लागते. अपघात झाल्यानंतर लवकरात लवकर कंपनीला कळवणे बंधनकारक आहे. या पॉलिसीच्या प्रीमियमवर ‘कलम ८० डी’ प्रमाणे वजावट मिळत नाही.

ही पॉलिसी दरवर्षी ‘मेडिक्लेम’प्रमाणे रिन्यू करावी लागते. ज्यांच्या कामाचे स्वरूप बैठे आहे, त्यांना दहा लाखाच्या संरक्षणाला १७०० रुपये, तर फिरतीचे काम असणाऱ्यांना दहा लाखाच्या संरक्षणाला साधारणपणे २३०० रुपये प्रीमियम येतो. जोखमीचे काम करणाऱ्यांना साधारण ४१०० रुपये प्रीमियम भरावा लागतो. जगभरात या पॉलिसीचे कव्हरेज सर्वाधिक आहे. यावरून त्याचे महत्त्व लक्षात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com