esakal | झूम : वाहन विमा : लाखमोलाचे सुरक्षा कवच
sakal

बोलून बातमी शोधा

Vehicle Insurance

झूम : वाहन विमा : लाखमोलाचे सुरक्षा कवच

sakal_logo
By
प्रणीत पवार

रस्त्यावर धावणाऱ्या प्रत्येक वाहनाचा विमा उतरवणे आवश्‍यक आहे. हा वाहन विमा काढण्यात पळवाटाही आहेत. पोलिसी कारवाई टाळण्यासाठी किंवा प्रीमीयम कमी असतो म्हणून कमी किमतीचा विमा काढतात. परंतु हा ‘शॉर्टकट’ आर्थिक फटका देणारा ठरू शकतो.

वाहन विमा आपल्या वाहनाला होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देतो.

काही गोष्टी ध्यानात ठेवा...

१) वाहनाचा विमा वेळेत काढणे आवश्‍यक आहेच. परंतु, विमा वैध असला म्हणजे झाले, असे नसते. वाहन चालवताना वैध वाहन परवाना, वाहनाची आवश्‍यक कागदपत्रे अशा अनेक बाबी महत्त्वाच्या असतात. अपघात झाल्यानंतर क्लेम करताना या गोष्टी तपासल्या जातातच, त्याशिवाय विमा कंपनी दावा मंजूर करत नाही.

२) भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) विमा कंपन्यांसाठी वाहन विम्यावर एक क्युआर कोड प्रिंट करणे बंधनकारक केले होते. याद्वारे ग्राहकाला आपल्या विम्याचे पूर्ण तपशील मिळतात. भारतात डिसेंबर २०१५नंतर विम्यावर क्युआर कोड दिला जातो.

३) वाहनांचा विमा नवीन अथवा अनोळखी कंपनीकडून खरेदी करू नका. विमा काढल्यानंतर त्या कंपनीच्या विम्यावर, व्यवहारांवर संशय असल्यास ‘आयआरडीए’च्या संकेतस्थळावर परवानाधारक कंपन्यांच्या यादीत कंपनीचे नाव तपासता येते.

४) विमा ओळखीच्या व्यक्तीकडूनच खरेदी करावा. ऑनलाइन विमा संबंधित कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच खरेदी करा. विमा खरेदी करताना केवळ धनादेश किंवा ऑनलाइन व्यवहार करावेत, तसेच धनादेश देताना केवळ कंपनीच्या नावाने द्या. कोणत्याही व्यक्तीच्या नावाने चेक देऊ नका. फसवणूक होण्याची शक्यता असते.

नैसर्गिक आपत्ती वेळी...

१) नैसर्गिक आपत्तीत वाहनावर झाड किंवा अन्य कुठली वस्तू पडून नुकसान झाल्यास ४८ तासांच्या आता विमा कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकावर फोन करावा. घटनेची व वाहनाची संपूर्ण माहिती द्यावी.

२) वाहनावर पडलेले झाड किंवा वस्तू काढायचा प्रयत्न करू नका. आहे त्या परिस्थितीत वाहनांची माहिती देणे सोयीचे होते. वाहनावर पडलेल्या वस्तू हटवल्यास भरपाई मिळणे कठीण होते.

३) ऑनलाइन किंवा मोबाईलद्वारे विम्याचा क्लेम करण्याची परवानगी विमा कंपन्यांना देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्जासाठी वाहनाचा बाहेरून, आतून फोटो काढून तो विमा कंपनीला पाठवता येतो.

दावा का फेटाळला जातो?

१) वाहन चालवताना वाहनचालकाचा परवाना अवैध असणे.

२) विम्याचा दावा करताना नोंदणी प्रमाणपत्र, कर प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र नसणे.

३) अपघाताच्या वेळी चालकाने मद्यप्राशन केलेले असल्यास दावा फेटाळला जातो.

४) वैयक्तिक खासगी वापराचे वाहन व्यावसायिक कामासाठी वापरल्यास.

बोगस कंपन्यांचाही सुळसुळाट

देशात प्रसिद्ध कंपन्यांखेरीज बोगस विमा कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. ट्रकचालक आणि दुचाकीस्वार यांची यात फसवणूक होते. वैध विम्याची किंमत साधारण १० हजारांच्या घरात असते. परंतु, बोगस विमा चार ते सहा हजारांपर्यंत मिळतो. यात फसवणूक होण्याची शक्यता असते. पोलिस तपासणीत उपयोगी पडणार असल्याने बहुतांश ग्राहक खोटा विमा खरेदी करतात, असे ‘आयआरडीए’च्या आकडेवारीतून समोर आले आहे. हा शॉर्टकट महागात पडू शकते.

loading image