उत्पादन क्षेत्रातील हालचाली मंदावल्या

पीटीआय
Tuesday, 3 September 2019

या कारणांमुळेही उत्पादनात सुस्ती 

  • बाजारपेठीतील स्पर्धा व आव्हानात्मक स्थिती
  • विदेशातील मागणीची कमतरता 
  • रोकड तरलता व पतपुरवठा विस्कळित 
  • उत्पादन खर्चात झालेली वाढ
  • चलनवाढीचा दबाव 
  • विक्रीत सातत्याने होणारी घसरण

नवी दिल्ली - घटलेली मागणी, रोडावलेली विक्री आणि रोजगारनिर्मितीला बसलेली खीळ, यामुळे कारखाना उत्पादन क्षेत्रातील हालचालींचा वेग ऑगस्टमध्ये मंदावला आहे. तो गेल्या १५ महिन्यांतील नीचांकी स्तरावर घसरल्याचे एका मासिक पाहणीतून समोर आले आहे.

आयएचएस मार्किटचा उत्पादन खरेदी व्यवस्थापन निर्देशांक (पीएमआय) ऑगस्टमध्ये घसरून ५१.४ वर आला आहे. हा मे २०१८ नंतरचा नीचांकी स्तर असून, जुलैमध्ये तो ५२.५ वर होता. सलग २५व्या महिन्यात पीएमआय ५० अंशांवर राहिला आहे. हा निर्देशांक ५० अंशांवर जाणे हे आर्थिक विस्ताराचे निदर्शक असून, तो ५० च्या खाली आल्यास आर्थिक घसरण होत असल्याचे मानले जाते. 

गेल्या महिन्यात विकासदरात झालेली घसरण, मंदीचे सावट आणि चलनवाढीचा दबाव, याचा हा परिणाम असल्याचे आयएचएस मार्किटच्या मुख्य अर्थतज्ज्ञ पोलियाना डे लिमा यांनी सांगितले. नवीन ऑर्डर, उत्पादन, रोजगारनिर्मिती अशा बहुतांश निर्देशांकात घट झाली असून, ही बाब चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Production decrease by recession