मालमत्ता जप्त केल्यावर पैसे कसे परत देणार? : विजय मल्ल्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

विजय मल्ल्याच्या वकिलाचा हायकोर्टात सवाल 

विजय मल्ल्याच्या वकिलाचा हायकोर्टात सवाल 

मुंबई: गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्याची माझी इच्छा आहे; मात्र मालमत्ता जप्त केल्यास पैसे कसे देणार, असा सवाल सोमवारी (ता. 1) कर्जबुडवा उद्योगपती विजय मल्ल्या याच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला. त्यावर फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याखाली मल्ल्यासह हिरेव्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांनाही भारतात परत आणू, असा दावा सक्तवसुली संचालनालयाने केला. 
विशेष पीएमएलए न्यायालयाने मल्ल्याला जानेवारीत नव्या कायद्यानुसार फरारी आर्थिक गुन्हेगार जाहीर केले असून, सक्तवसुली संचालनालयाने त्याची मालमत्ता जप्त केली आहे. त्या कारवाईविरोधात मल्ल्याने उच्च न्यायालयात ऍड. अमित देसाई यांच्यामार्फत याचिका केली आहे. या याचिकेवर सोमवारी न्या. आय. ए. महंती यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

कर्जापेक्षा अधिक रकमेची मालमत्ता तपास यंत्रणेने जप्त केलेली आहे. अशा परिस्थितीत खातेदारांना पैसे कसे देणार, असा प्रश्‍न मल्ल्याच्या वतीने उपस्थित करण्यात आला. अशा प्रकारची सबब न देता मल्ल्याने भारतात परत येऊन चौकशीला सामोरे जावे, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला. 
फरारी आरोपींना देशात आणण्यासाठी फरार आर्थिक गुन्हेगार कायदा तयार करण्यात आला आहे, असे सांगण्यात आले. खंडपीठाने याचिका सुनावणीसाठी मंजूर केली असून, पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार आहे. 

 

Web Title: Property seizure draconian, Vijay Mallya tells Bombay HC