कतार एअरवेजला करायचीय 'या' भारतीय विमान कंपनीत गुंतवणूक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

एअर इंडियात नव्हे, तर इंडिगोत गुंतवणुकीत रस | कतार एअरवेजच्या सीईओंचे स्पष्टीकरण 

नवी दिल्ली, ता. 7 (पीटीआय) : "कतार एअरवेज' या परदेशी विमान कंपनीने भारताच्या "एअर इंडिया'मध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने "एअर इंडिया'मध्ये परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक करावी या हेतूने सिंगापूर आणि लंडनमध्ये "रोड शो'चे आयोजन करण्याची योजना आखली आहे. 

कतार एअरवेज समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अकबर अल बाकर म्हणाले, ""आम्ही इंडिगो एअरलाईन्समध्ये हिस्सा खरेदी करण्यास उत्सुक आहोत. मात्र इंडिगोमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ नाही. कारण अजूनही कंपनीच्या प्रवर्तकांमधील काही प्रश्न अनुत्तरित आहेत. मात्र कंपन्यांमधील धोरणात्मक निर्णयाचा महत्त्वाचा भाग असलेल्या कोड शेअरिंगला आम्ही मान्यता दिली आहे.'' 

इंडिगो एअरलाईन आणि कतार एअरवेजदरम्यान "वन-वे कोड शेअर' करार झाला आहे. सुरवातीच्या टप्प्यात धोरणात्मक बाब म्हणून या दोन कंपन्यांमध्ये करार झाला आहे. यामुळे दोहा-दिल्ली, दोहा-मुंबई आणि दोहा-हैदराबाद या मार्गांवर दोन्ही कंपन्यांदरम्यान "कोड शेअरिंग' केले जाणार आहे. यामुळे कतार एअरवेजच्या ग्राहकांना या मार्गावर विमान प्रवास करताना आसन आरक्षित करता येणार आहे. 

कतार एअरवेज भारतीय विमान कंपनी एअर इंडियामध्ये आणि विमान सेवा बंद केलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे बोलले जात होते; मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून कतार एअरवेजने आपली धोरणे स्पष्ट केली आहेत. इंडिगोची प्रवर्तक कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनचा शेअर 1.59 टक्‍क्‍यांनी वधारून 1,491 रुपयांवर स्थिरावला.

WebTitle : qatar airways wish to invest in this indian airline company


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: qatar airways wish to invest in this indian airline company