esakal | 'बजाज समूहा'त मोठी घडामोड; राहुल बजाज होणार पायउतार
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Bajaj

'बजाज समूहा'त मोठी घडामोड; राहुल बजाज होणार पायउतार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज, बजाज फिनसर्व्हच्या (बजाज फायनान्स) चेअरमन आणि कार्यकारी संचालकपदावरून पायउतार होणार आहेत. 16 मे पासून ते बजाज फिनसर्व्हच्या चेअरमन आणि कार्यकारी संचालकपदाचा भार सोडणार आहेत. पुढील पिढीच्या हाती सूत्रे सोपवण्याच्या योजनेचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बजाज फिनसर्व्ह ही एक बिगर बॅंकिंग वित्त कंपनी (एनबीएफसी) आहे. मात्र, ते सन्माननीय मार्गदर्शक चेअरमन या नात्याने कंपनीच्या सेवेत असणार आहेत. त्यांच्या जागी चेअरमन पदाची जबाबदारी सध्याचे व्हाईस चेअरमन नानू पामनानी सांभाळणार आहेत.

बजाज फिनसर्व्हची 2007 मध्ये स्थापना झाल्यापासून राहुल बजाज कंपनीची धुरा सांभाळत होते. बजाज समूहाची धुरा राहुल बजाज पाच दशकांपासून सांभाळत आहेत. राहुल बजाज यांनी 15 फेब्रुवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला असून 16 मेला संचालक मंडळाच्या नियोजित बैठकीनंतर तो अंमलात येणार आहे. 'राहुल बजाज यांचा प्रचंड अनुभव आणि ज्ञान यांचा कंपनीला वेळोवेळी मार्गदर्शनासाठी लाभ व्हावा यासाठी संचालक मंडळाने त्यांची सन्माननीय मार्गदर्शक चेअरमनपदावर नियुक्ती करण्याचे ठरवले आहे. संचालक मंडळाच्या 16 मे 2019 ला होणाऱ्या बैठकीनंतर हा निर्णय लागू होईल', अशी माहिती बजाज फिनसर्व्हकडून देण्यात आली आहे. 

या पदावर कार्यरत असताना राहुल बजाज कोणत्याही प्रकारचे मानधन घेणार नसल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. बजाज फिनसर्व्हच्या संचालक मंडळाने डी जे बालाजी राव, नानू पामनानी आणि गीता पिरामल यांची स्वतंत्र संचालकपदावर पुनर्नियुक्ती केली आहे. राव आणि पामनानी यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ 1 एप्रिलला संपत असून दोघांनाही पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. गीता पिरामल यांचा कार्यकाळ 15 जुलैला संपत असून त्यांची नियुक्तीसुद्धा पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.

loading image