महत्त्वाची बातमी: 'त्या' बँका बंद होण्याचा 'तो' मेसेज खोटा

वृत्तसंस्था
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

सार्वजनिक क्षेत्रातील नऊ महत्त्वाच्या बँक बंद होणार असल्याचे वृत्त खोटे 

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक सार्वजनिक क्षेत्रातील नऊ महत्त्वाच्या बँका बंद करणार आहे असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मात्र केंद्रीय अर्थ सचिव सह सचिव, वित्तीय सेवा विभागाचे (डीएफएस) राजीव कुमार यांनी याबाबत महत्त्वाचे ट्विट केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नऊ महत्त्वाच्या बँक बंद होणार असल्याचे वृत्त खोटे आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. केंद्र सरकार बँकांना अधिक बळकट करत आहे. आपल्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना केंद्र सरकारकडून अधिक निधी देखील दिला जात आहे. 

व्हायरल मेसेजवर लोकांनी विश्वास ठेवू नये असे सरकारचे आवाहन केले आहे. 

काय आहे  व्हायरल होणार खोटा मेसेज: 
"भारतीय रिझर्व्ह बँक नऊ बँका कायमस्वरूपी बंद करणार आहे.  यामध्ये  यूको बँक, आयडीबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्र बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश असल्याचे  व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये  सांगण्यात आले आहे. बँकांमध्ये जर तुमचे काही खाते असेल तर कृपया ताबडतोब सुरक्षित करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याचेही या मेसेजमध्ये सांगण्यात आले आहे. 

हा मेसेज दोन वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता ज्यावेळी आरबीआयने काही सार्वजनिक बँकांवर निर्बंध घातले होते.  मात्र आता पीएमसी बँकेमुळे समजकंटकांकडून हा मेसेज जाणूनबुजून व्हायरल केला जात आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील कोणतीही बँक बंद केली जाणार नसून सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajeev kumar says No question of closing any Public Sector Bank