आरबीआयची डिजिटल करन्सी मोठ्या बँकांसाठी वापर सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RBI Digital Currency

रिझर्व बँकेने जारी केलेली डिजिटल करन्सी म्हणजेच डिजिटल रुपी आजपासून मोठ्या बँकांच्या वापरासाठी सुरू झाली.

आरबीआयची डिजिटल करन्सी मोठ्या बँकांसाठी वापर सुरू

मुंबई - रिझर्व बँकेने जारी केलेली डिजिटल करन्सी म्हणजेच डिजिटल रुपी आजपासून मोठ्या बँकांच्या वापरासाठी सुरू झाली. सर्वसामान्यांसाठी ही करन्सी लवकरच सुरू होईल.

डिजिटल रुपी ही देशाच्या आर्थिक क्षेत्रातील मोठे पाऊल असल्याचे जाणकार सांगत आहेत. त्याचे खरे फायदे लवकरच दिसून येतील. देशभरात यूपीआय आणि किंवा क्यूआर कोडवर आधारित पेमेंट पद्धती लौकर लागू केल्याने तिचे फायदे साऱ्या देशाने पाहिले आहेत. आता या डिजिटल करन्सीचेही वेगळे फायदे दिसून येतील असे जाणकार सांगत आहेत.

आजपासून मोठ्या बँकांसाठी आणि मोठ्या व्यवहारांसाठी लागू केलेल्या डिजिटल रुपी पद्धतीमुळे दोन बँकांमधील पेमेंट आणखीन वेगवान तसेच कार्यक्षम पद्धतीने होईल. तसेच रिझर्व बँकेच्या सेटलमेंट पद्धतीतही बँकांचे व्यवहार कार्यक्षमतेने होतील. तसेच या व्यवहारात आणि सौदेपूर्ती मध्ये धोके राहणार नाहीत, असे दाखवून दिले जात आहे.

रिझर्व बँक लवकरच आंतरराष्ट्रीय पेमेंट साठी देखील ही पद्धती लागू करणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकांसह एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्र बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक व एचएसबीसी या बँका सध्या डिजिटल रुपी चे व्यवहार करू शकतील.

डिजिटल रुपी जेव्हा सर्वसामान्यांसाठी लागू होईल तेव्हा सरकारच्या कल्याणकारी योजनांचे लाभ म्हणजेच सरकारी खात्यांमधून थेट नागरिकांना पैसे हस्तांतरित करण्याची पद्धतही अत्यंत निर्धोक आणि विश्वासार्ह होईल. या पद्धतीत कार्यक्षमता, अचूकता वाढेल तसेच पैसे हस्तांतरित करण्याचा खर्चही अत्यंत कमी असेल व सौदेपूर्तीचे व्यवहारही अत्यंत वेगात होतील. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि चुका होण्याची शक्यता अत्यंत कमी राहील. तसेच सरकारी योजनांचे लाभ नागरिकांच्या खात्यात हस्तांतरित करण्याचे व्यवहार आपोआप होतील असेही दाखवून दिले जात आहे.

क्रिप्टो करन्सी नव्हे

मात्र ही डिजिटल करन्सी म्हणजे क्रिप्टो करन्सी सारखे आभासी चलन नसून ती रिझर्व बँकेने जारी केलेली आणि रिझर्व बँकेचे नियंत्रण व नियमन असलेली करन्सी असेल. हे चलन दोन प्रकारचे असेल, रिटेल चनल हे किरकोळ ग्राहक आणि उद्योजक, व्यावसायिक यांच्यासाठी असेल. तर होलसेल प्रकारात बँका, बड्या वित्तसंस्था यांच्यासाठी ही करन्सी असेल. हे चलन वापरताना आभासी चलनाचे धोके त्यात नसतील.

टॅग्स :rbiBanksdigitalCurrency