2021 पासून भारतात धावणार इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या इलेक्ट्रिक कारविषयी  

टीम ई-सकाळ
Wednesday, 30 December 2020

नवीन वर्षात वाहनांच्या खरेदीसंदर्भात विचार करत असाल तर, टेस्ला कारचा देखील ऑप्शन राहणार आहे. 

नवीन वर्ष सुरु होण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. यंदाच्या वर्षात कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. आणि त्यामुळेच सर्वजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच नवीन वर्षापासून अनेक बदल होणार आहेत. काही बाबतीत नवीन नियम लागू होणार आहेत. तर काही जुन्या नियमांमध्ये सुधारणा होणार आहे. शिवाय आगामी वर्षापासून बाजारात काही नवीन गोष्टींची एन्ट्री देखील होणार आहे. अशाच एका वाहनाची एन्ट्री भारतीय बाजारपेठेत होणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या वर्षात 2021 मध्ये टेस्ला कार भारतात दाखल होणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे नवीन वर्षात वाहनांच्या खरेदीसंदर्भात विचार करत असाल तर, टेस्ला कारचा देखील ऑप्शन राहणार आहे. 

सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही इकोफ्रेंडली असाल तर नक्कीच टेस्ला कार तुमच्या पसंतीस उतरू शकते. कारण टेस्लाची वाहने ही इलेक्ट्रिक आहेत. आणि 2021 पासून टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची विक्री भारतात सुरु होणार आहे. आतापर्यंत टेस्लाची सर्वात स्वस्त कार मॉडेल 3 आहे, ज्याची किंमत 35,000 डॉलर आहे. म्हणजे 22.45 लाख रुपये आहे. एकदा ही कार फुल चार्ज केल्यानंतर 346 किलोमीटर धावू शकते. तसेच 225 किमी वेगाने धावण्याची या कारची क्षमता आहे.  

नवीन वर्षात घरगुती उपकरणे महागणार 

त्यानंतर, टेस्लाची मॉडेल एक्स लाँग रेंज ही कार आहे. ही जगातील सर्वाधिक जास्त रेंज असलेली कार आहे. कारण ही कार चार्ज केल्यानंतर विनाअडथळा 523 किलोमीटर धावते. त्यामुळे या कारची किंमत देखील थोडीफार अधिक आहे. 84,990 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 60.35 लाख या कारची किंमत आहे. याव्यतिरिक्त, टेस्लाची मॉडेल एस लाँग रेंज देखील कार आहे. या कारची रेंज देखील अधिक आहे. आणि एकदा चार्ज केल्यावर ही कार 595 किलोमीटर धावू शकते. या कारची किंमत 79,990 डॉलर म्हणजे जवळपास 56.80 लाख रुपये आहे. 

टेस्लाच्या या सर्व कार उच्च तंत्रज्ञानासह सुसज्ज आहेत. भारतीय बाजारपेठेत सध्या दुचाकी इलेक्ट्रिक वाहने धावताना दिसतात. मात्र पुढील वर्षापासून इलेक्ट्रिक चारचाकी वाहने भारतीय रस्त्यांवर फिरताना दिसणार आहेत. आणि शिवाय अशा वाहनांमुळे हवा आणि आवाजाचे प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार असून, पर्यावरणाचे देखील संरक्षण होणार आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read out about Tesla electric cars cause Electric cars will be run in India from 2021