मंदीचा मोर्चा आता आयटी कंपन्यांकडे!

वृत्तसंस्था
Thursday, 22 August 2019

मंदीचा तडाखा : आयटी कंपन्यांमधील भरतीत घट होण्याची शक्यता !

मुंबई: आयटी कंपन्यांकडून इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीतील (आयआयटी) विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर भरती केली जाती. कॅम्पस इंटरव्युहच्या माध्यमातून ही संधी विद्यार्थ्यांना मिळत असते. पुढील तीन महिन्यात आयआयटीमधील इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांसाठीची अंतिम प्लेसमेंटची प्रक्रिया सुरू होईल. यावेळेस मात्र या प्रक्रियेद्वारे आयटी कंपन्यांमध्ये होणाऱ्या भरतीमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

 आयटी कंपन्या त्यांच्या नोकरभरतीवर पुनर्विचार करत आहेत. आयटी कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या भरतीत 15 टक्क्यांपर्यतची घट होऊ शकते. सर्वसाधारणपणे तंत्रज्ञानविषयक आणि आयटी कंपन्यांकडून एकूण नोकरभरतीपैकी 60-70 टक्के भरती ही आयआयटीमधून केली जाते. मात्र यावेळेस यात घट होण्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आहे. सध्या देशाची आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या सावधपणेच नोकरभरती करत आहेत. तर अनेक छोट्या कंपन्यांनी कॅम्पस भरतीला पाठ दाखवली आहे. त्यामुळे एकंदरच देशातील 23 आयआयटीमधील विद्यार्थ्यांना याची झळ सोसावी लागणार आहे.

मात्र त्याचबरोबर आयटी कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्री-प्लेसमेंट ऑफर्समध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्री-प्लेसमेंट ऑफर्सद्वारे विद्यार्थ्यांना आधी कंपनीत इंटर्न म्हणून रुजू व्हावे लागते. त्यानंतर इंटर्नशीपच्या कालावधीत जर विद्यार्थ्याची कामगिरी समाधानकारक असली तर त्यांना कंपनीत पूर्णवेळ रुजू करून घेण्यात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recession is now affecting IT Companies