
रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, व्याजदर कायम ठेवल्याने नाराजी
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) 2022 या आर्थिक वर्षासाठी ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) महागाई 5.3 टक्क्यांवर आणण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर केले.
पहिल्या तिमाहीत सीपीआय महागाई (आर्थिक वर्ष 2022-23) चा अंदाज 5.2 टक्के वर्तवण्यात आला आहे. वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा अंदाज आर्थिक वर्ष 2021-22 साठी 9.5 टक्के ठेवला आहे. यात दुसऱ्या तिमाहीत 7.9 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 6.8 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 6.1 टक्के आहे, असे गव्हर्नर म्हणाले.
आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची वाढ 17.2 टक्के अपेक्षित आहे.
दरम्यान, आरबीआयने शुक्रवारी रेपो दर सरळ आठव्या वेळी कायम ठेवला आणि अनुकूल स्थिती कायम राहण्यासाठी प्रयत्न केले. रेपो दर - केंद्रीय बँकेचा कर्ज दर - 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यावर स्थिर ठेवण्यात आला आहे. कर्ज आणि व्याजदरात सवलत न दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. सणांच्या तोंडावर व्यादरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच कर्जावरील व्याजात सूट मिळण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना होती. मात्र, भ्रमनिरास झाल्याची भावना आहे.