
RIL ने मोडले सर्व रेकॉर्ड्स, ठरली देशातील नंबर 1 कंपनी
- शिल्पा गुजर
आंतरराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने रिलायन्सच्या नफ्यात मजबूत वाढ होण्याची अपेक्षा आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर सध्या फुल्ल फॉर्मात आहे. सोमवारी दुपारी 2.23 वाजता ट्रेडिंगमध्ये कंपनीचा शेअर (RIL Share Price) 1.63 टक्क्यांनी वाढून 2523.20 रुपयांवर पोहोचला होता. या तेजीमुळे रिलायन्सची मार्केट कॅप 17 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
रिलायन्स ही देशातील पहिली कंपनी बनली आहे, ज्यांची मार्केट कॅप या पातळीवर पोहोचली असल्याचे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने रिलायन्सच्या नफ्यात बंपर वाढ होण्याची अपेक्षा आहे.
काही दिवसांपुर्वी 16 लाख कोटी मार्केट कॅप
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने काही दिवसांपूर्वी 16 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपचा आकडा गाठला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स सोमवारी दुपारच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारात (बीएसई) 2523.90 रुपयांवर पोहोचले. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाढीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सचा मोठा हात आहे. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सच्या क्लोजिंग प्राइसनुसार, 2021 च्या पहिल्या 9 महिन्यांत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 25 टक्के परतावा दिला आहे. तर बेंचमार्क इंडेक्सने या काळात 26 टक्के परतावा दिला आहे.
आरआयएल स्टॉक वाढीची कारणे
आरआयएलच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ. आरआयएलचे जीआरएममध्ये मजबूत वाढीची नोंद होऊ शकते अशी अपेक्षा आहे. ज्याचा थेट परिणाम कंपनीच्या नफ्यावर होणार आहे. जगभरात नैसर्गिक वायूच्या किंमती वाढत आहेत, 1 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकार किंमती वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते. सौदी अराम्को-आरआयएल करारावरही लवकरच मोठी बातमी अपेक्षित आहे. यामुळे आरआयएलचे शेअर्स आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
टॉप 10 कंपन्यांचे मार्केट कॅप
देशातील पहिल्या 10 कंपन्यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या बाजार मूल्यांकनात एकूण 1,56,317.17 कोटी रुपये जोडले. देशातील 1 नंबरची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल (Market Capital) 58,671.55 कोटी रुपयांनी वाढून 15,74,052.03 कोटी रुपये झाले. शेअरच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर गुरुवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये आरआयएलच्या एम-कॅपने 16 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.