होय, ९,९९९ रुपयांच्या ‘ईएमआय’वर हेलिकॉप्टर!

होय, ९,९९९ रुपयांच्या ‘ईएमआय’वर हेलिकॉप्टर!

तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्यानंतर बचतीत वाढ होते का? शक्‍यतो नाही! उत्पन्न वाढूनही तुम्ही पैशांची बचत करू शकत नाही, असे तुम्ही अनेकवेळा बोलून दाखवता का? यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का? याचे उत्तर अगदी साधे आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्यानंतर तुमचा कर्जावरील खर्च वाढतो. परिणामी अधिक ‘ईएमआय’ भरावा लागतो आणि हाती काहीच बचत शिल्लक राहात नाही. उत्पन्नात झालेल्या प्रत्येक वाढीसोबत खर्चात वाढ का होते?

याचे सोपे उत्तर आहे, ‘स्टॅंडर्ड ऑफ लिव्हिंग’ कायम राखणे. याचमुळे उत्पन्नातील वाढीसोबत तुम्ही अनेक वस्तू खरेदी करता आणि ’स्टॅंडर्ड ऑफ लिव्हिंग’शी जुळवून घेण्यासाठी तुम्ही आणखी खर्च करता. तसेच, गरज नसताना गॅझेट्‌ससारख्या वस्तू खरेदी केल्या जातात.

वस्तू खरेदी करणे हेच मुख्य कारण आहे का?
तुमची जीवनशैली सुधारणे आणि चांगले ‘स्टॅंडर्ड ऑफ लिव्हिंग’ कायम ठेवणे यासाठी आणखी वस्तू खरेदी करणे, हे याचे मुख्य कारण नाही. तुमच्या बजेटमध्ये न बसणाऱ्या वस्तू खरेदी करणे ही समस्या आहे. तुम्ही एखादी वस्तू खरेदी करता त्या वेळी तुम्हाला सर्वोत्तम वस्तूशिवाय दुसरे काही नको असते. यात समस्या आहे खरेदी कराल ते सर्वोत्तम असावे, या मागे धावणे. 

एखाद्याला मोबाईल खरेदी करावयाचा असल्यास तो प्रथम बजेटपासून सुरुवात करतो. त्यावेळी बजेट ३०,००० ते ४०,००० रुपये असते. पुढील पायरी म्हणजे मोबाईलची माहिती घेणे आणि हवा तो मोबाईल खरेदी करण्यासाठी निवडणे. यातील शेवटची पायरी असेल, प्रत्यक्ष मोबाईल खरेदी.

दुकानात गेल्यानंतर प्रत्यक्ष काय घडते?
दुकानात गेल्यानंतर विक्रेता तुम्हाला हवा असलेला मोबाईल दाखवितो. खरेदी पूर्ण  होण्याआधी दुकानदार ६० हजार रुपयांचा आणखी ‘लेटेस्ट मोबाईल’ दाखवितो. दुकानदार म्हणतो की, तुम्ही, क्रेडिट कार्ड वापरत असाल तर केवळ ३ हजार रुपयांच्या ‘ईएमआय’वर मोबाईल मिळेल. त्यामुळे ठरविलेल्या ‘बजेट’पेक्षा अधिक महाग असलेला मोबाईल अचानक बजेटमध्ये बसत असल्याचे पटते. अनेक जण लेटेस्ट मोबाईल खरेदीला प्राधान्य देतील, बरोबर? बजेटपलीकडील वस्तू खरेदी करताना मनात नेमके काय सुरू असेल? एकदाच वस्तू खरेदी करणार असू, तर ती सर्वोत्तमच असावी. ती वस्तू वारंवार खरेदी करणार आहोत का? हाच ‘ट्रॅप’ असतो. प्रथम स्वतःला प्रामाणिकपणे विचारा की, याआधी कितीवेळा बजेटच्या पलीकडील वस्तूंची क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या सोप्या ‘ईएमआय’मुळे खरेदी केली आहे?

पुरेसे कमावूनही पुरेशी 
बचत होत नाही, कारण..

होय, क्रेडिट कार्ड आणि  ‘ईएमआय’ संस्कृतीच्या जोरामुळे तुम्ही हेलिकॉप्टरही खरेदी करू शकता! हे गमतीशीर वाटते ना!  दरमहा केवळ ९,९९९ रुपये भरून प्रत्येक जण हेलिकॉप्टर खरेदी करू शकतो, पुढील २०० वर्षांत! हे आकडे तंतोतत जुळत नसले तरी, ‘ईएमआय’बद्दल वस्तुस्थिती यातून लक्षात येईल. ‘ईएमआय’मुळे आपण या पृथ्वीतलावरील प्रत्येक गोष्ट खरेदी करण्याचा आत्मविश्‍वास येतो. पण ही वस्तू आपल्याला प्रत्यक्षात परवडू शकते का? यासाठीच तुम्हाला वस्तूची खरेदी करताना खरेदी आणि परवडणे यातील फरक समजून घ्यायला हवा.

कार्ड्‌सचा वापर करण्यात काही गैर नसून, उलट ती रोख पैशांपेक्षा अधिक सोईची असतात. क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने वापरल्यास ती एक महत्त्वाचे आर्थिक साधन बनतात. परंतु, क्रेडिट कार्ड्‌स ही तुमच्या आर्थिक आरोग्याला घातक ठरतात आणि जादा खर्चाचे सर्वांत मोठे कारण बनतात.

(लेखक पर्सनल फायनान्स स्ट्रॅटेजिस्ट आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com