REIT ः गुंतवणूक कितपत फायदेशीर? 

रोहित गायकवाड 
Monday, 27 July 2020

REIT म्हणजे "रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट' हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. माईंडस्पेस बिझनेस पार्क REIT चा "आयपीओ' आजपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने या गुंतवणूक पर्यायाविषयी जाणून घेऊया. 

रिअल इस्टेटमध्ये छोट्या प्रमाणात गुंतवणुकीचा पर्याय आपल्याकडे बरीच वर्षे उपलब्ध नव्हता, जो सुरक्षित, सोयीस्कर, कायदेशीर आणि नियोजनबद्ध असेल. कमर्शिअल (व्यावसायिक) प्रॉपर्टीमध्ये रेसिडेन्शिअल (रहिवासी) प्रॉपर्टीपेक्षा जास्त परतावा मिळतो. पण त्यांच्या किमती पाहता, छोट्या गुंतवणूकदारांना त्यामध्ये गुंतवणूक करता येत नाही. ज्यांच्याकडे रिअल इस्टेट विकत घेण्यासाठी मुबलक पैसे उपलब्ध नसतील, त्यांच्यासाठी REIT म्हणजे "रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट' हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. माईंडस्पेस बिझनेस पार्क REIT चा "आयपीओ' आजपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने या गुंतवणूक पर्यायाविषयी जाणून घेऊया. 
याचे प्रकार असतात. 

रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे (REIT) तीन प्रकार असतात. 

1) इक्विटी REIT - यामध्ये संस्था, वैयक्तिक, समूह आणि कंपनीकडून पैसे गोळा करते आणि हा सर्व पैसा रेडी पझेशन कमर्शिअल प्रॉपर्टी (ऑफिस स्पेसेस, आयटी पार्क, एसईझेड, हॉटेल, मॉल) किंवा इतर तत्सम स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करते. या मालमत्तेमधून मिळणारा नफा (उदा. भाडे, विक्रीतून मिळालेले जादा उत्पन्न) गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात (लाभांश स्वरूपात) वाटप करते. यामध्ये उत्पनाचा मुख्य मार्ग हा भाडे असतो. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

2) मॉर्गेज REIT - यामध्ये संस्था गुंतवणूकदारांचा पैसा हा दुसऱ्या प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याला कर्ज म्हणून देते आणि त्यामधून मिळणारे व्याज हा उत्पन्नाचा मुख्य मार्ग असतो. या व्याजातून मिळणारा नफा ही संस्था गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात (लाभांश स्वरूपात) वाटप करते. 

3) हायब्रीड REIT - या प्रकारामध्ये संस्था वरील दोन्ही प्रकारच्या उपक्रमांमध्ये कार्यरत असते. म्हणजेच मिळणारे उत्पन्न हे भाडे, विक्री नफा किंवा व्याज या माध्यमातून मिळते आणि ते लाभांश स्वरूपात वाटप करते. 

गुंतवणुकीचे फायदे -
- कमीत कमी दोन लाख रुपये गुंतवून "अ' श्रेणी कमर्शिअल प्रॉपर्टीचे भागीदार (मालक) होता येते. 
- कमीत कमी गुंतवणूक करून वेगवेगळ्या शहरांतील वेगवेगळ्या प्रॉपर्टी/प्रोजेक्‍टमध्ये भागीदार बनता येते. 
- भाडेकरू शोधायची गरज नाही किंवा प्रॉपर्टी सांभाळायची देखील कटकट नाही. 
- अंडर कन्स्ट्रक्‍शन प्रॉपर्टीमध्ये असलेला धोका देखील नाही. 
- शेअर बाजाराच्या तुलनेत स्थिर आणि खात्रीशीर परतावा. 
- पारदर्शकता असल्याने सर्व अद्ययावत माहिती (सध्याचे भाडे, विक्री/खरेदी दर, नफा, उपलब्धता) ऑनलाइन बघता येते. 
- म्युच्युअल फंडाप्रमाणे सर्व कामकाज तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चालते. 
- "सेबी'संलग्न असल्यामुळे गैरव्यवहार होण्याची शक्‍यता नगण्य. 

गुंतवणूकदारांसाठी कर : 
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 1-194 (एलबीए) (1) च्या अटीनुसार, निवासी गुंतवणूकदाराच्या हाती व्याजउत्पन्न आणि भाडे उत्पन्नाच्या स्वरूपात कोणतेही वितरणयोग्य उत्पन्न 10 टक्के दराने करकपातीस पात्र आहे. अनिवासी व्यक्तीच्या बाबतीत ते 5 टक्के दराने करकपातीस पात्र आहे. 

इतिहास काय सांगतो? 
भारतातील एकमेव नोंदणीकृत "एम्बसी ऑफिस पार्क्‍स'ने सर्वप्रथम मार्च 2019 मध्ये "आयपीओ' बाजारात आणला होता. "निफ्टी'तील 9 टक्‍क्‍यांची घट आणि बीएसई रिऍल्टी इंडेक्‍समधील 25 टक्‍क्‍यांच्या घसरणीच्या तुलनेत REIT ने मागील वर्षी 8 टक्के परतावा दिला आहे. 

नवा "आयपीओ' आजपासून 
आता माईंडस्पेस बिझनेस पार्क्‍स REIT चा "आयपीओ' आजपासून (27 जुलै) खुला होत आहे आणि तो 29 जुलैपर्यंत चालेल. प्रति युनिट किंमत 274 ते 275 आहे. आयपीओ लॉट साइज 200 युनिट आणि त्यापुढे 200 युनिट्‌सच्या पटीत असेल. किमान गुंतवणूक 55 हजार रुपये असेल. माईंडस्पेस बिझनेस पार्क REIT संस्था अंदाजे 4500 कोटी रुपये या "आयपीओ'च्या माध्यमातून जमवेल. याचे प्रायोजक ब्लॅकस्टोन रिऍल्टी व के. रहेजा कॉर्पोरेशन आहेत. 

गुंतवणूकदारांना सल्ला 
माईंडस्पेस कंपनीचा विचार करता, त्यांची मूलतत्त्वे, उलाढाल, व्यवस्थापन आणि बाजारातील स्थान वाखाणण्याजोगे आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता गुंतवणूक करताना विचारपूर्वक पाऊल उचलणे महत्त्वाचे ठरते. "कोविड-19'वर अजून तरी औषध उपलब्ध झालेले नाही. त्यातच जवळपास सर्वच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. अशी घरून काम करण्याची पद्धत रूढ झाली, तर कंपन्या व्यावसायिक जागा सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात. याचा गंभीर परिणाम व्यावसायिक बाजारपेठेवर होऊ शकतो. तसेच "कोरोना'च्या साथीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे आणि त्यामुळे व्यावसायिक जागेची मागणी घटू शकते. अशा परिस्थितीत कदाचित REIT तील गुंतवणूकदारांना यंदा फायदा होण्याची शक्‍यता मर्यादित आहे. भविष्यात "कोविड-19'ची परिस्थिती सुधारल्यास या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार आपल्या सल्लागाराशी चर्चा करून घ्यावा. 

(लेखक रिअल इस्टेट प्रशिक्षक, वक्ता आणि लेखक आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rohit gaikwad article about REIT investment