esakal | महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यातील आयुर्विम्याचे योगदान
sakal

बोलून बातमी शोधा

Life Insurance

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यातील आयुर्विम्याचे योगदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विभा पडळकर

आर्थिक स्वातंत्र्य हे तुम्ही काय काम करता किंवा तुमचे उत्पन्न किती आहे यावर अवलंबून नसते. तुमच्या आयुष्यातील दीर्घकालीन लक्ष्य पूर्ण करण्यासाठी बचतीला लवकर सुरूवात करून योजनाबध्द पध्दतीने बचत करणे जसे आवश्यक आहे त्याच प्रमाणे तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या प्रियजनांचे रक्षणही करणे आवश्यक आहे.

या साथीच्या कालावधीत असे दिसून आले आहे की अनेक महिला या आरोग्य सेविका, काळजीवाहक, इन्नोव्हेटर्स आणि राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व इत्यादी पध्दतींनी योगदान दिले आहे. एक महिला म्हणून तुम्ही सुध्दा काहीतरी योगदान दिले आहे आणि अनेक जबाबदार्‍या योग्य पध्दतीने हाताळल्या आहेत. मग तुम्ही व्यावसायिक असा किंवा एक गृहीणी तुमचे योगदान हे नक्कीच बहुमूल्य आहे. तुम्हाला आता ‍आर्थिक स्वावलंबनाचा अवलंब करणे आवश्यक आहे. तुम्ही जर आर्थिक दृष्ट्या सक्षम असाल तर तुमच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घडामोडींवर तुम्ही नीट नियंत्रण मिळवू शकता.

भारतात महिलांचे आयुर्विमा काढण्याचे प्रमाण हे पुरूषांच्या तुलनेत खूपच कमी आहे. आयआरडीएआय च्या वार्षिक अहवालानुसार २०१९-२० महिलांचे नवीन आयुर्विमा पॉलिसी घेण्याचे प्रमाण हे ३२ टक्के होते तर २०१८-१९ मध्ये हेच प्रमाण ३६ टक्के इतके होते. पहिल्या वर्षाच्या हप्त्यानुसार पाहिल्यास महिलांचे योगदान हे २०१९-२० मध्ये ३४ टक्के झाले जे गेल्या वर्षी ३७ टक्के होते.

सध्याच्या साथीच्या रोगांमुळे आरोग्य विमा आणि तत्सम उत्पादनांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. वैद्यकीय आपात्कालीन स्थिती मुळे तुमच्या कुटूंबाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. म्हणूनच एक हॉस्पिटलायझेशन पॉलिसी असणे खूपच गरजेचे आहे. पण त्याच बरोबर प्रत्येकाने कॅन्सर आणि हृदयरोगासारख्या न पसरणार्‍या किंवा जीवाला धोका असणार्‍या आजारांपासूनही संरक्षण मिळवणे आवाश्यक असते. अशा आजारपणांसाठी जीवन विमा प्रदात्यां कडून डिझाईन करण्यात आलेल्या फिक्स्ड बेनि‍फिट प्लान्स किंवा रायडर्स चा लाभ होतो.

आयुर्विमा उत्पादने ही वित्तीय सुरक्षा तर देतातच पण त्याच बरोबर आपल्याला आर्थिक योजना आखण्यासही मदत करतात. म्हणूनच महिलांसाठी ‍ कोणत्या प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत व त्यांचे महत्त्व समजावून घेणे आवश्यक आहे.

परिवारातील अर्थार्जन करणार्‍या महिलेचे टर्म इन्शुरन्स कव्हर असणे आवश्यक आहे. या कव्हरची किमान रक्कम म्हणजे त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा १० ते १५ पट असावी. म्हणजे जर कोणतीही दु:खद घटना घडली तर त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत नाही.

आपल्या प्रत्येकाचे असे दीर्घकाळासाठीचे लक्ष्य असते, उदाहरणार्थ, नवीन घर घेणे, मुलांचे शिक्षण, निवृत्ती किंवा अगदी स्वप्नवत पर्यटन स्थळाला भेट देणे इत्यादी. अशा वेळी जीवन विमा कंपन्यांकडून बचत आणि गुंतवणूक योजना ही उपलब्ध करून दिल्या जातात ज्यायोगे तुम्ही दीर्घकाळासाठी एक मोठा वित्तसंचय करू शकता, म्हणजेच शिस्त बध्द पध्दतीने तुम्ही दीर्घकाळासाठी बचत करून मोठी रक्कम उभारू शकता व तुमची वित्तीय स्वप्ने सत्यात आणू शकता.

यातल्या काही योजना या गॅरेंटीड रिटर्न लाईफ इन्शुरन्स प्लान्स असतात ज्यामुळे आपल्याला सध्याच्या व्याजदरात रक्कम गुंतवणे शक्य होते, त्याच बरोबर भविष्यातील गुंतवणुकीबरोबरच जीवन विमाही प्राप्त होतो. बचतीशी संबंधित उत्पादना मध्ये सहभागी होऊन आपण आयुष्यभरासाठी एक नियमित उत्पन्न ही प्राप्त करू शकता.

युनिट लिंक्ड योजना या अधिक धोका पत्करून अधिक लाभ मिळवणार्‍यांसाठी योग्य आहेत. त्यांचे चार्जेस कमी असल्याने या योजना संपूर्ण योजना कालावधीसाठी वापरल्यास त्याचा लाभ अधिक होतो कारण कोणताही बाजार अस्थिर असला तरीही काही कालावधीनंतर विविध मालमत्ता प्रकारांच्या तुलनेत चांगला लाभ मिळण्यास यामुळे मदत होते.

निवृत्तीचा कालावधी हा जीवनाचा सुवर्णकाळ म्हटला जातो. महागाई आणि वाढता वैद्यकीय खर्च यामुळे तुमच्या निवृत्तीनंतरच्या बचतीवर वाईट परिणाम होताना दिसतो. एक चांगला ॲन्युईटी प्लान निवडल्याने तुम्ही निवृत्तीनंतरही नियमित असे उत्पन्न प्राप्त करू शकता, म्हणजेच तुम्ही जोवर जिवंत आहात तोवर हे उत्पन्न प्राप्त करू शकता.

आपल्या असे लक्षात आले आहे की कधीही अनपेक्षितपणे कोणताही फटका बसू शकतो. पण आपण सुयोग्य पध्दतीने नियोजन केल्यास आणि आपली वित्तीय सुरक्षेची सुयोग्य योजना आखल्यास आपण पुनरागमन करू शकतो. म्हणूनच आपल्या व आपल्या परिवाराच्या सुरक्षेसाठी सुयोग्य जीवन विमा योजना घेऊन तुम्ही अशा कठीण काळात पुन्हा भरारी घेऊ शकता.

(लेखिका या 'एचडीएफसी लाईफ'च्या एमडी व सीईओ आहेत.)

loading image