डॉलरच्या तुलनेत  रुपया गडगडला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

डॉलरच्या तुलनेत रुपया 68 पैशांची घसरण होऊन 71.60 या पातळीवर बंद झाला

मुंबई : खनिज तेलाच्या भडक्‍यात सोमवारी रुपया होरपळला. डॉलरच्या तुलनेत रुपया 68 पैशांची घसरण होऊन 71.60 या पातळीवर बंद झाला. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेली मोठी वाढ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मारक ठरणार आहे.

भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे. तेलाचे भाव वाढल्याने वित्तीय तूट वाढून महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता आहे. चलन बाजारात आज डॉलरच्या तुलनेत रुपयात सकाळपासूनच घसरण सुरू झाली. अखेर तो 68 पैशांची घसरण होऊन 71.60 या पातळीवर बंद झाला. जगभरातील प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर वधारल्याचा फटका आज रुपयाला बसला, अशी माहिती चलन बाजार विश्‍लेषकांनी दिली.

मोठ्या प्रमाणात तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या विकसनशील देशांच्या चलनांवर आज परिणाम दिसून आला. तेलाच्या आयातीचा खर्च वाढल्याने चलनवाढीचा आलेख चढता राहणार असून, व्यापारी तूट वाढण्याची शक्‍यता आहे, असे वॅलिडस वेल्थचे मुख्य गुंतवणूक अधिकारी राजेश चेरुवू यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rupee fell against the dollar