रुपयाची घसरगुंडी; सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर 

पीटीआय
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

डॉलरच्या तुलनेत रुपया 62 पैशांची घसरण होऊन 71.40 या सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर बंद झाला.  

नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील घसरण आणि अर्जेंटिनाचे चलन पेसो कोसळल्याने मंगळवारी रुपया गडगडला. डॉलरच्या तुलनेत रुपया 62 पैशांची घसरण होऊन 71.40 या सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर बंद झाला.  

चलन बाजारात आज सकाळपासूनच डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण होण्यास सुरवात झाली. अखेर तो मागील सत्राच्या तुलनेत 62 पैशांची घसरण होऊन 71.40 या पातळीवर बंद झाला. मागील दोन सत्रांत रुपयामध्ये 71 पैशांची घसरण झाली आहे. परकी निधीचा बाहेर जाणारा ओघ कायम असल्याने रुपयाला फटका बसला आहे. यातच जागतिक पातळीवर व्यापार युद्धाची चिंता असल्याने रुपयावर परिणाम होत आहे. अर्जेंटिनामध्ये प्राथमिक निवडणुकांमध्ये अध्यक्ष मॉरिसिओ मॅक्री यांच्या पक्षाला फटका बसला आहे. याचा परिणाम होऊन अर्जेंटिनाचे चलन पेसो काल (ता. 12) गडगडले. यामुळे देशांतर्गत चलन बाजारासह शेअर बाजाराला आज फटका बसला. 

अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या भीतीने जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण सुरू आहे. यातच हॉंगकॉंगमधील निदर्शने आणि अर्जेंटिनाचे चलन पेसो गडगडल्याने गुंतवणूकदार रोखे, सोने आणि येनमध्ये गुंतवणूक करण्याचा सुरक्षित पर्याय निवडत आहेत. 
- व्ही. के. शर्मा, एचडीएफसी सिक्‍युरिटीज 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupee hits 6 months low