रुपयात दीड महिन्यातील सर्वांत मोठी घसरण

पीटीआय
Friday, 3 January 2020

जागतिक पातळीवर आज खनिज तेलाचा भाव आज 4.5 टक्‍क्‍याने वाढून प्रतिबॅरल 69.23 डॉलरवर गेला. याचा परिणाम आज चलन बाजारात दिसून आला. देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीच्या वातावरणाचाही रुपयाला फटका बसला. 

मुंबई : मध्य-पूर्वेतील भूराजकीय तणावामुळे खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला असून, याचा फटका शुक्रवारी रुपयाला बसला. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 42 पैशांनी गडगडला. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार झालेल्या लष्करी कारवाईत इराणचा वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाला. यामुळे मध्य-पूर्वेत भूराजकीय तणाव निर्माण झाला आहे. यामुळे खनिज तेलाच्या भावाचा आज भडका उडाला. जागतिक पातळीवर आज खनिज तेलाचा भाव आज 4.5 टक्‍क्‍याने वाढून प्रतिबॅरल 69.23 डॉलरवर गेला. याचा परिणाम आज चलन बाजारात दिसून आला. देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीच्या वातावरणाचाही रुपयाला फटका बसला. 

चलन बाजारात आज रुपयाची सुरुवात नकारात्मक झाली. तो आज दिवसभरात 71.81 या नीचांकी पातळीवर घसरला होता. अखेर मागील सत्राच्या तुलनेत तो 42 पैशांची घसरण होऊन 71.80 या पातळीवर बंद झाला. मागील दीड महिन्यात एकाच दिवसात रुपयात झालेली ही सर्वांत मोठी घसरण आहे. या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपया 45 पैशांनी घसरला आहे. 

अमेरिका आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे खनिज तेलाचे भाव वधारले. याचा फटका बसून डॉलरच्या तुलनेत रुपयात मोठी घसरण झाली. 
- जतीन त्रिवेदी, वरिष्ठ संशोधक विश्‍लेषक, एलकेपी सिक्‍युरिटीज 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupee plunges by 42 paise against us dollar