‘सकाळ मनी’ने होईल आर्थिक उद्दिष्टपूर्ती

मुकुंद लेले
सोमवार, 14 मे 2018

अधिक तपशिलासाठी....
वाचकांना ९८८१०९९२०० या क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्यायचा आहे. तसेच response@sakalmoney.com या मेल आयडीवर संपर्क साधता येईल.

आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा, अशी सर्वांचीच अपेक्षा असते. पण त्यासाठी सध्याच्या काळात कोणत्या गुंतवणूक प्रकारात (ॲसेट क्‍लास) पैसे गुंतवावेत, असा प्रश्‍न अनेकांना पडताना दिसतो. आपले आर्थिक उद्दिष्ट, वय, कालावधी आणि जोखीम घेण्याची क्षमता यानुसार योग्य रीतीने नियोजन केल्यास गुंतवणुकीला खरा ‘अर्थ’ प्राप्त होतो आणि साहजिकच त्याद्वारे आपली आर्थिक उद्दिष्टपूर्ती होऊ शकते. हे सर्व करताना चलनवाढ किंवा महागाईचा दरदेखील गृहीत धरावा लागतो. त्यावर मात करणारा परतावा मिळाला, तरच तो खऱ्या अर्थाने परतावा ठरतो, हेही लक्षात घ्यावे लागते. सर्वसामान्य नागरिकांची हीच गरज लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ आता नव्या अवतारात आपल्या मदतीला येत आहे.

‘सकाळ मनी’च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे विविध तज्ज्ञांचे पर्सनल फायनान्स आणि गुंतवणूकविषयक लेख सातत्याने प्रसिद्ध होत आले आहेत. त्याच बरोबरीने विविध चर्चासत्रांचे आयोजनही केले जात आहे. ‘धन की बात’ या पानाच्या माध्यमातूनही यंदाच्या जानेवारीपासून सातत्याने गुंतवणूकविषयक संकल्पना स्पष्ट करणारे मार्गदर्शनपर लेख प्रसिद्ध केले जात आहेत. या सर्वांचे वाचन करणाऱ्या वाचकांची गुंतवणूकविषयक जनजागृती होत असली, तरी प्रत्यक्ष गुंतवणूक करण्यासाठी कोठे जायचे, कोणाला भेटायचे, असे प्रश्‍न पडायचे. त्यासंदर्भात वाचकांकडून सातत्याने विचारणाही होत असे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांना अर्थसमृद्ध करण्यासाठी ‘सकाळ मनी’ने आता सक्रिय मार्गदर्शकाची भूमिका साकारण्याचे ठरविले आहे. त्याचा श्रीगणेशा आजपासून होत आहे. इंग्रजीबरोबरच मराठीत ही अभिनव वेबसाईट सुरू करीत असल्याचे जाहीर करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. सुनियोजित गुंतवणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही चांगल्या परताव्याची फळे चाखता यावीत, यासाठी ‘सकाळ मनी’ दीपस्तंभासारखे कार्य करेल. म्युच्युअल फंड व पर्सनल फायनान्स क्षेत्रातील ताज्या घटना-घडामोडींची खबरबात देण्याबरोबरच खास मार्गदर्शनपर लेखांची मेजवानीही सोबतीला असेल. 

म्युच्युअल फंडाचा मार्ग 
चलनवाढीच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्‍यता असलेली गुंतवणूक म्हणून सध्या ‘इक्विटी’ या ॲसेट क्‍लासकडे बघितले जाते. बॅंक किंवा पोस्टातील मुदत ठेवींचे सध्याचे व्याजदर पाहता, त्यापेक्षा अधिक परतावा मिळण्याची शक्‍यता या ॲसेट क्‍लासमध्ये दिसून येते. अर्थात, शेअर बाजाराशी निगडित जोखीम यात असते. शिवाय निश्‍चित परताव्याची हमी यात नसते. परंतु, या ॲसेट क्‍लासमध्ये तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून संयम ठेवल्यास चांगल्या परताव्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते. गेल्या सुमारे ३५ वर्षांचा परताव्याचा आढावा घेतला, तर ‘इक्विटी’ या ॲसेट क्‍लासने अन्य पर्यायांच्या तुलनेत वरचढ परतावा दिल्याचे दिसून येते. ‘इक्विटी’मध्ये थेट शेअर्स किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. थेट शेअर बाजारात गुंतवणूक करणे बरेचदा जोखमीचे असते. ज्यांना अशी थेट जोखीम घ्यायची इच्छा नसते, त्यांना म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. म्युच्युअल फंडात एकरकमी किंवा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा पर्याय असतो. मात्र, जोखीम विभागली जावी, यासाठी ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’च्या (एसआयपी) मार्गाने टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हिताचे ठरते. अशी दरमहा शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केल्यास चांगल्या परताव्यासह दीर्घकाळात मोठी संपत्ती जमू शकते. घर, मोटार, मुला-मुलींचे उच्च शिक्षण, लग्नकार्य, परदेशी पर्यटन यांसारख्या आपल्या आर्थिक उद्दिष्टांबरोबरच सेवानिवृत्तीनंतरची तरतूद म्हणूनही याकडे पाहता येते. 

आपली हीच उद्दिष्टे किंवा स्वप्ने साकार करण्यासाठी चला, भेट देऊया नव्या रूपातील www.sakalmoney.com ला!

‘सकाळ मनी’च का?
नैतिकता, मूल्ये आणि विश्‍वासार्हता या तत्त्वांचा अंगीकार करून ‘सकाळ मनी’ कार्यरत राहणार असून, वाचकांना गुंतवणुकीचे मार्गदर्शन करण्यासाठी या क्षेत्रातील जाणकारांची टीम ही ‘सकाळ मनी’ची ताकद आहे. या जाणकारांना गुंतवणुकीच्या क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. संशोधन, विक्री आणि ग्राहकांशी संवाद यासाठीची उत्तम कौशल्ये या टीमकडे आहेत. आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपन्यांशी थेट सहयोग साधून, ‘सकाळ मनी’च्या संशोधन टीमने स्वअभ्यासातून चांगल्या योजना निवडलेल्या असून, गुंतवणूकदारांच्या गरजेनुसार त्या सुचविल्या जाणार आहेत. यासाठी नव्या वेबसाईटवर आपले ऑनलाइन खाते अगदी सोप्या पद्धतीने विनामूल्य सुरू करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आपल्या वैयक्तिक तपशिलांसह नोंदणी करून आणि ‘केवायसी’च्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हे खाते सुरू होणार आहे. गुंतवणुकीच्या नियोजनासाठी खास ‘ऑटोमेटेड’ यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली असून, प्रत्येकाच्या उद्दिष्टानुसार योग्य त्या योजनांची निवड, वर्गवारी, गुंतवणुकीसाठी आवश्‍यक असणारी रक्कम असे सर्व तपशील काही क्षणांत उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार पुढे नेट बॅंकिंगच्या साह्याने थेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा ऑनलाइन पर्याय उपलब्ध असणार आहे. हे व्यवहार सुरक्षितपणे आणि तत्परतेने होण्यासाठी ‘सकाळ मनी’ने बाँबे स्टॉक एक्‍स्चेंजच्या स्टार म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्मशी सहयोग केला आहे.

(डिस्क्लेमर - म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचे माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Money will achieve financial goals