शेअर ‘ॲव्हरेज डाउन’ करताय? 

साकेत गोडबोले 
Monday, 7 December 2020

‘ॲव्हरेज डाउन’ म्हणजे शेअरचा भाव खाली घसरायला लागला, की कमी भावात परत शेअर घ्यायचे, ज्यामुळे ‘कॉस्ट’ कमी होते. पण यामध्ये एक मोठा धोका असतो.

तुमच्या पोर्टफोलिओमधील एखादा शेअर खाली जायला लागला, की तो ‘ॲव्हरेज डाउन’ करा, असा सल्ला अनेकांकडून मिळतो. ‘ॲव्हरेज डाउन’ म्हणजे शेअरचा भाव खाली घसरायला लागला, की कमी भावात परत शेअर घ्यायचे, ज्यामुळे ‘कॉस्ट’ कमी होते. पण यामध्ये एक मोठा धोका असतो. जो शेअर तुम्ही ‘ॲव्हरेज डाउन’ करत आहात, तो भविष्यामध्ये वाढलाच नाही तर? 

अलीकडचे एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे- येस बँक. 
मला असे अनेक गुंतवणूकदार माहीत आहेत, की जे येस बँकेचा शेअर पडायला लागल्यापासून ‘ॲव्हरेज डाउन’ करत गेले. तसेच असेही अनेक जण आहेत, ज्यांनी येस बँकेच्या शेअरचा भाव ५० टक्क्यांच्या खाली आल्यावर शेअर घेणे सुरु केले आणि त्या भावापासून अजून ५० टक्के पडल्यावर अजून शेअर घेतले आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

असे का केले, तर त्यांना असे वाटले, की हा शेअर परत वर जाणारच... 
पण काय झाले हे सर्वांना माहीतच आहे. कदाचित कधीतरी हा शेअर परत पूर्वीच्या भावाच्या वर जाईलही. पण अशा वेळेस खालील प्रश्न स्वतःला विचारावेत- 

१) अशा शेअरमध्ये अजून पैसे टाकून, तो शेअर परत वर जाईल, या आशेवर आपले भांडवल किती दिवस अडकवून ठेवायचे? 

२) या ऐवजी जो शेअर वर जात आहे, त्यात जर ते भांडवल गुंतवले तर फायदा होण्याची जास्त संधी नाही का? 

आता अशी पण अनेक उदाहरणे आहेत, ज्यामध्ये ‘ॲव्हरेज डाउन’ करून फायदा झाला आहे. उदा. इन्फोसिस. हा शेअर साधारणपणे ‘लिस्ट’ झाल्यापासून पाच वेळा ३० टक्क्यांहून जास्त तुटला. अशा वेळेस जर ‘ॲव्हरेज डाउन’ केले असते तर खूप फायदा झाला असता. 
पण यासाठी, 
१) तुमच्याकडे अमर्यादित भांडवल असायला पाहिजे. (कितीही खाली गेला तरी मी तो शेअर अजून घेतच राहणार) 
२) तुमच्याकडे अमर्यादित संयम पाहिजे (परत वर यायला कितीही वेळ लागला तरी मी बसून राहणार) 
३) ‘ॲव्हरेज डाउन’ करणाऱ्या शेअरवर तुमचा पूर्ण आत्मविश्वास पाहिजे (असा, की तो शेअर परत वर जाणारच) 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वांकडे वरील गोष्टी असणे हे फार अवघड आहे. 

विचार करा, तुम्ही लॉँग टर्म इन्व्हेस्टर म्हणून रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स इन्फ्रा, डीएचएफएल, पीसी ज्वेलर्स, एचसीसी, एचडीआयएल, सुझलॉन, जेपी असोसिएटस आणि अशाच अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये २००८ च्या आधी गुंतवणूक केली असती आणि ‘ॲव्हरेज डाउन’ करीत राहिला असता, तर काय झाले असते? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जर तुम्ही लॉँग टर्म इन्व्हेस्टर असला, तरी 
१) शेअरवरील नफा नियमितपणे काढून घेतला 
२) पडायला लागलेला शेअर कमी तोट्यात काढून घेतला 
३) ज्यामध्ये तेजीची चालना दिसत आहे, तोच शेअर ‘होल्ड’ केला आणि वर जायला लागला, की ‘ॲव्हरेज अप’ केला 
तर शेअर पडायला लागला, की तयार होणारी अनिश्चितता, काळजी निघून जाऊ शकते. 

(लेखक इक्विटी टेक्निकल ॲनालिस्ट आणि सीए आहेत.) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saket godbole write article share Average Down