esakal | स्मार्ट माहिती : T+१ सेटलमेंट सायकल
sakal

बोलून बातमी शोधा

Cycle

स्मार्ट माहिती : T+१ सेटलमेंट सायकल

sakal_logo
By
साकेत गोडबोले

शेअर बाजार नियामक ‘सेबी’ने T+१ सेटलमेंट सायकल आणण्याचा पर्याय स्टॉक एक्स्चेंजना देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. ‘सेबी’च्या या परिपत्रकानुसार, एक जानेवारी २०२२ पासून स्टॉक एक्स्चेंज, त्यांनी ठरविलेल्या कोणत्याही शेअरसाठी T+१ सेटलमेंट सायकल लागू करु शकतील आणि हा नवा नियम सर्व शेअरधारकांसाठी लागू असेल. यामुळे नेमके काय होईल, ते समजून घेऊया.

स्टॉक एक्स्चेंजने T+१ सेटलमेंट सायकलसाठी ठरविलेल्या शेअरची विक्री केल्यानंतर एका कामकाजी दिवसानंतर पैसे मिळतील आणि शेअर विकत घेतल्यास एका कामकाजी दिवसानंतर ते शेअर ‘डिमॅट’ खात्यामध्ये जमा होतील. आतापर्यंत सर्व शेअरसाठी T+२ सेटलमेंट सायकल लागू होती.

तसेच या परिपत्रकानुसार, T+१ सेटलमेंट सायकल लागू करण्याआधी स्टॉक एक्स्चेंजला एक महिन्याची आगाऊ नोटीस द्यावी लागेल, तसेच एकदा का T+१ सेटलमेंट सायकल लागू केली, की त्यानंतर सहा महिन्यांसाठी हा नियम लागू ठेवणे अनिवार्य असेल. पुन्हा T+२ लागू करायचा असल्यास स्टॉक एक्स्चेंजला एक महिन्याची आगाऊ नोटीस परत द्यावी लागणार आहे.

सेटलमेंट सायकल म्हणजे

शेअर खरेदी केल्यानंतर तो आपल्या ‘डिमॅट’ खात्यामध्ये येण्यासाठी, तसेच तो विकल्यावर पैसे मिळेपर्यंतचा लागणारा वेळ.

T = ट्रेडिंगचा दिवस

+ १ किंवा २ = कामकाजी दिवसांची संख्या

भारतामध्ये २००३ पासून T+२ सेटलमेंट सायकल लागू झाली होती. त्या आधी T+३ सेटलमेंट सायकल होती.

शेअरधारकांसाठी फायदे

सेटलमेंट सायकल कमी केल्यामुळे शेअर बाजारामधील तरलता (लिक्विडीटी) वाढेल आणि त्यामुळे शेअरमधील व्यवहार वाढतील, म्हणजेच शेअरधारकांकडे लवकर पैसे आल्यामुळे नवे शेअर घेण्याची शक्यता वाढेल. तसेच शेअर डिमॅट खात्यामध्ये लवकर जमा झाल्यावर शेअर लवकर विकता येऊ शकतील.

तुम्हाला माहीत आहे का?

अमेरिका, ब्रिटन आणि अशा अनेक प्रगत देशांमध्ये अजूनही T+२ सेटलमेंट सायकल वापरली जाते. प्रमुख देशांमध्ये T+२ पेक्षा कमी सेटलमेंट सायकल वापरणारा आतापर्यंत चीन हा एकमेव देश आहे.

(लेखक शेअर बाजाराचे जाणकार आहेत.)

loading image
go to top