esakal | इनोव्हेशनला चालना देणारी डिफेन्सची 'नवयुक्ती'

बोलून बातमी शोधा

Navyukti Innovations start up
इनोव्हेशनला चालना देणारी डिफेन्सची 'नवयुक्ती'
sakal_logo
By
- सलील उरुणकर

सिमेवरील जवानांसाठी हेल्थ-माॅनिटरिंग सिस्टिम असेल किंवा लहान मुलांना वेदनारहित लस देणारे उत्पादन... 'डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स्ड टेक्नाॅलाॅजी'च्या (डीआयएटी) 'इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर'मध्ये नुकतेच नवयुक्ती इनोव्हेशन्स ही पहिली स्टार्टअप कंपनी सुरू करण्यात आली आहे. 'डीआयएटी'मधल्या प्रा. डाॅ. संगीता काळे यांच्या नेतृत्वाखाली ही स्टार्टअप कंपनी विविध उत्पादने येत्या काही महिन्यात बाजारात दाखल करणार आहे.

विज्ञान किंवा संशोधन हे फक्त प्रयोगशाळांपुरते मर्यादित न राहता त्याचे रुपांतर व्यावसायिकरित्या यशस्वी तंत्रज्ञानामध्ये झाल्यास त्याचा लाभ समाजातील विविध घटकांना होतो. हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी आता 'डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स्ड टेक्नाॅलाॅजी'मधील (डीआयएटी) तज्ज्ञांनी पुढाकार घेतला आहे. डिफेन्स इन्स्टिट्यूट म्हटलं की फक्त संरक्षण खात्याशी संबंधित संशोधन किंवा तंत्रज्ञान असे स्वतःला मर्यादित करून न घेता, आपल्या जवानांसह सामान्य नागरिकांच्या दृष्टीने कोणती फायदेशीर उत्पादने विकसित करता येतील यावर आता डीआयएटीमधील तज्ज्ञांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यातूनच जन्म झाला आहे तो नवयुक्ती इनोव्हेशन्स या डीआयएटीमधील पहिल्या स्टार्टअप कंपनीचा!

प्रा. डाॅ. संगीता काळे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या या स्टार्टअप कंपनीने दोन प्रकल्प प्राधान्याने हाती घेतले आहेत. त्यामध्ये लहान मुलांसाठी वेदनारहित लस देणारे उत्पादन हे एक आहे. हे उत्पादन पुढील चार ते सहा महिन्यात बाजारात उपलब्ध होईल, असा विश्वास डीआयएटीच्या पाॅलिसी अँड प्लॅनिंग विभागाच्या संचालिका तसेच नवयुक्तीच्या संस्थापिका प्रा. डाॅ. संगीता काळे यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरा प्रकल्प हा जवानांच्या हेल्थ माॅनिटरिंग सिस्टिम विकसित करण्याचा आहे. मात्र हे उत्पादन बाजारात दाखल होण्यासाठी एक वर्ष किंवा थोडा अधिक कालावधी लागणार आहे. ही दोन्ही उत्पादने काय आहेत हे जाणून घेण्यापूर्वी डीआयएटी आणि त्यातील इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर काय आहे हे समजून घेऊ!

डीआयएटी विषयी

पुणे शहर हे लष्करी आणि सामरिकदृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. केवळ आजच नव्हे तर इतिहासातही त्याचे महत्त्व होते. त्यामुळेच या शहरात व आजूबाजूच्या परिसरात तीन कँटोन्मेंटसह सुमारे ३० ते ४० डिफेन्सशी संबंधित संस्था आहेत. त्यामध्ये लष्कराचे दक्षिण मुख्यालय (सदर्न कमांड) ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) ही नावे आपल्याला परिचित आहेत. मात्र या एनडीएच्याच जवळ डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स्ड टेक्नाॅलाॅजी (डीआयएटी) ही संस्था तुलनेने कमी लोकांना माहिती आहे.

डीआयएटीचे पूर्वीचे नाव इन्स्टिट्यूट आॅफ आर्ममेंट टेक्नाॅलाॅजी. खडकवासला धरणाजवळ असलेल्या या अभिमत विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसह संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. आपण पाहतो की अनेक विद्यापीठांमधील संशोधनाचे कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक तंत्रज्ञानामध्ये रुपांतरण होत नाही. तसे डीआयएटीमध्ये होऊ नये यासाठी आता पावले उचलली गेली आहेत.

इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटरमध्ये काय होणार

डीआयएटीचे कुलगुरू डाॅ. सी पी रामनारायण यांच्या पुढाकाराने संस्थेच्या आवारातच एक परिपूर्ण पद्धतीने विकसित केलेल्या इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून नवउद्योजकांना आणि तेथे इन्क्युबेट केलेल्या स्टार्टअप कंपन्यांना जागेपासून इंटरनेट कनेक्शनपर्यंत सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भविष्यात डीआयएटीकडून काही निवडक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्याचाही विचार केला जाणार आहे, मात्र अद्याप त्याबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. तूर्तास या स्टार्टअप्सला केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट आॅफ सायन्स अँड टेक्नाॅलाॅजी तसेच बायरॅकच्या बायोटेक्नाॅलाॅजी इग्निशन ग्रांट (बीआयजी) योजनेमार्फत भांडवल निधी उभारणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या याेजनांचा नेमका लाभ कसा घ्यावा यासाठीचे मार्गदर्शन एनसीएल व्हेन्चर सेंटरमधील तज्ज्ञांकडून घेण्यात येत आहे.

वेदनारहित लस आणि जवानांच्या हेल्थ माॅनिटरिंग प्रकल्पांविषयी

डाॅ. काळे म्हणाल्या, “आम्ही बायोसेन्सर्सवर काम करीत आहोत. या प्रकल्पांतर्गत आम्ही एक 'ड्रग डिलिव्हरी व्हेईकल' उत्पादनाचे नियोजन केले आहे. उदाहरणार्थ औषध किंवा लस वेदनारहित पद्धतीने देणारे एक उत्पादन. जेव्हा लहान मुलांना लस दिली जाते त्यावेळी त्यांच्यासाठी तो एक वेदनादायी अनुभव असतो. मात्र आमच्या उत्पादनाचा वापर केल्यास, त्या लहान मुलांना वेदना होणार नाहीत आणि लसही दिली जाईल. सध्या हा प्रकल्प संशोधनाच्या टप्प्यावर आहे आणि पुढील चार ते पाच महिन्यांमध्ये ते उत्पादन बाजारात दाखल होईल. या उत्पादनासंदर्भात काही फार्मास्युटिकल कंपन्यांबरोबर आम्ही चर्चा करीत आहोत."

“दुसरा प्रकल्प आहे तो सेन्सर्स-संबंधित क्षेत्रातला आहे. जवानांच्या आरोग्याची निगराणी करणारी एक यंत्रणा यामध्ये विकसित करण्यात येणार आहे. या यंत्रणेमार्फत जवानांच्या शरीरातील रक्तदाब, हिमोग्लोबिन, प्लेटलेट काउंट किंवा सिरम कंटेन्ट अशा विविध गोष्टींची नोंद एका इंटरनेट-आॅफ-थिंग्ज म्हणजे आयओटी डिव्हाईसच्या माध्यमातून केली जाईल व ही माहिती एका मोबाईल किंवा अन्य डिस्प्लेवर दर्शविण्यात येईल. हे उत्पादन विकसित करण्यासाठी आंतरविद्याशाखीय कौशल्य व तज्ज्ञांची गरज भासणार आहे. त्यामुळे ते प्रत्यक्षात वापरात येण्यासाठी आणखी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.”