esakal | कर्जदारांना मोठा दिलासा, 'या' बँकेने केली व्याजदरात कपात
sakal

बोलून बातमी शोधा

SBI cuts external benchmark-based rate by 25 bps

कर्जदारांना मोठा दिलासा, 'या' बँकेने केली व्याजदरात कपात

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई, ता ३० (वृत्तसंस्था ): सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) कर्जदारांना दिलासा दिला आहे. एसबीआयने बाह्य मानकावर (एक्स्टर्नल बेंचमार्क) आधारित कर्जदरात 0.25 टक्क्यांची (पाव टक्का) कपात केली आहे. व्याजदरात कपात केल्यानंतर बँकेचा कर्जदर 7.80 टक्क्यांवर आला आहे. तो याआधी 8.05 टक्के होता. यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.  एक्स्टर्नल बेंचमार्क आधारित गृह कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा 'ईएमआय' कमी होणार आहे. नवीन व्याजदर येत्या 1 जानेवारीपासून  लागू होणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच एसबीआयने 'मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट'मध्ये (एमसीएलआर) 0.10 टक्के कपात केली होती. यामुळे बॅंकेचा एक वर्ष मुदतीचा 'एमसीएलआर' 7.90 टक्के झाला आहे. चालू वर्षात एसबीआयने सलग आठव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. 

पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना देण्याच्यादृष्टीने एसबीआयने व्याजदरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2019 पासून आतापर्यंत रेपोदरात 1.35 टक्क्यांची कपात केली आहे. ऑक्‍टोबरपासून बॅंकेने बाह्य मानकावर (एक्‍स्टर्नल बेंचमार्क) आधारित कर्जदर निश्‍चितीचे धोरण लागू केले आहे. यासाठी रिझर्व्ह बॅंकेचा रेपो दर एक्‍स्टर्नल बेंचमार्क म्हणून ग्राह्य धरण्यात आला आहे. सध्या रेपो दर 5.15 टक्के आहे. त्यावर एसबीआयकडून 2.65 टक्के अतिरिक्‍त भार आकारला जातो. गृहकर्जात आणखी प्रिमियम आकारला जातो, त्यामुळे "एसबीआय"चा "एमसीएलआर" 8.05 टक्के आहे. बॅंकांकडून अंतर्गत मानकानुसार (इंटर्नल बेंचमार्क) गृहकर्जाचा दर ठरवला जातो. जवळपास 90 टक्के कर्ज बदलत्या व्याजदारावर आधारित आहेत. 20वर्ष मुदतीच्या दीर्घकालीन कर्ज योजनेत ठराविक कालावधीनंतर व्याजदर आढावा घेतला जातो. कर्जदाराला कोणत्या बेंचमार्कने कर्ज घ्यायचे आहे हे निवडण्याचा पर्याय आहे.