अर्थव्यवस्थेत तेजी! चालू आर्थिक वर्षात एसबीआयला 9.6 टक्के विकासदर वाढीची अपेक्षा | Arthavishwa | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थव्यवस्थेत तेजी! चालू आर्थिक वर्षात एसबीआयला 9.6 टक्के विकास दरवाढीची अपेक्षा
अर्थव्यवस्थेत तेजी! चालू आर्थिक वर्षात एसबीआयला 9.6 टक्के विकासदर वाढीची अपेक्षा

चालू आर्थिक वर्षात SBI ला 9.6 टक्के विकासदर वाढीची अपेक्षा!

अर्थव्यवस्थेतील (Economy) सर्वांगीण ताकद लक्षात घेऊन विविध संघटना आणि संस्थांनी विकासदरात (Growth rate) वाढीचा अंदाज व्यक्त करण्यास सुरू केले आहे. सोमवारी जारी केलेल्या संशोधन अहवालात SBI ने चालू आर्थिक वर्षात (2021-22) 9.3-9.6 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. SBI ने यापूर्वी चालू आर्थिक वर्षात 8.5-9.0 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर 2021) 8.1 टक्‍क्‍यांसह जगातील 28 प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा (Indian Economy) सर्वात वेगवान विकासदर असेल, असे SBI ने म्हटले आहे.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला 'ब्रेक'! संपामुळे 315 कोटींचा फटका

दुसरीकडे, महसूल संकलनामुळे वित्तीय तूटही कमी होत असल्याचे दिसते. रेटिंग एजन्सी फिचने चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट जीडीपीच्या 6.6 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, जो पूर्वी 6.8 टक्के होता. SBI च्या मते, भारतीय अर्थव्यवस्थेत तेजी दिसून येत आहे, कारण देशातील 42 टक्के प्रौढांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत आणि 81 टक्‍क्‍यांहून अधिक प्रौढांना एक डोस मिळाला आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण सातत्याने कमी होत असून अर्थव्यवस्थेत सर्वांगीण तेजी आहे.

चालू आर्थिक वर्षातही वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे; कारण जागतिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळित झाल्याचा भारतावर विशेष परिणाम दिसून आला नाही. त्याच वेळी जगातील इतर प्रमुख अर्थव्यवस्था महागाई, कोरोना आणि पुरवठा साखळी संबंधित अडचणींमुळे गंभीरपणे प्रभावित होत आहेत. यामुळेच अमेरिकेचा विकासदर जो यावर्षी एप्रिल-जूनमध्ये 12.2 टक्के होता, तो जुलै-सप्टेंबरमध्ये घसरून 4.9 टक्के झाला.

हेही वाचा: मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी हालचाली!

चीनमध्येही जुलै-सप्टेंबरमध्ये विकासाचा वेग मंदावला आणि तेथेही या काळात 4.9 टक्के वाढ झाली. यावर्षी एप्रिल-जूनमध्ये चीनचा विकासदर 7.9 टक्के होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्‍टोबर- डिसेंबर) भारताचा विकासदर 6.0-6.5 टक्के राहण्याचा अंदाज एसबीआयने वर्तवला आहे. त्याच वेळी, आरबीआयने चालू आर्थिक वर्षात विकासदर 9.5 टक्के, जुलै-सप्टेंबर तिमाहीत 7.9 टक्के आणि ऑक्‍टोबर-डिसेंबर तिमाहीत 6.8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

loading image
go to top