esakal | SBI ग्राहकांनो क्युआर कोड स्कॅनिंगद्वारे पैसे स्विकारत असाल तर सावधान!

बोलून बातमी शोधा

SBI
SBI ग्राहकांनो क्युआर कोड स्कॅनिंगद्वारे पैसे स्विकारत असाल तर सावधान!
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. कुठल्याही ऑनलाइन व्यवहारांसाठी तुम्ही क्युआर कोडचा वापर करत असाल तर बँकेनं तुम्हाला सावधानतेचा इशारा दिला आहे. एसबीआयच्या ग्राहकांनी शक्यतो क्युआर कोड स्कॅनिंगचा वापर करु नये, असं आवाहन बँकेनं आपल्या ग्राहकांना केलं आहे.

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात घराबाहेर जाणं टाळताना लोक बऱ्याचदा ऑनलाइन खरेदी-विक्री करताना दिसतात. त्यामुळे ऑनलाइन व्यवहारांचं प्रमाण या काळात मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. पण असं असलं तरी आपल्या या सवयीचा फायदा काही ऑनलाइन फसवणूक करणारे गुन्हेगार घेत आहेत. या सायबर गुन्हेगारांसाठी क्युआर कोड स्कॅनिंग ही गुन्हा करण्याची खास पद्धत ठरली आहे.

एसबीआयनं ग्राहकांना सावधानतेचा इशारा देणारा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. तसेच या पोस्ट करताना म्हटलंय की, "तुम्ही जेव्हा क्युआर कोड स्कॅन केला तेव्हा तुम्हाला पैसे मिळत नाहीत. उलट तुमच्या फोनवर मेसेज येतो की तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे वजा झाले आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला जर एखाद्याला पैसे द्यायचे असतील तरचं क्युआरकोड स्कॅन करा. पण जर पैसे स्विकारण्यासाठी कोणी तुम्हाला असा कोड स्कॅन करायला सांगत असेल तर कृपया असा कुठलाही व्यवहार करु नका. यामुळे तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की, क्युआर कोड हे केवळ पैसे देण्यासाठीच स्कॅन करायचे असतात पैसे घेण्यासाठी नाही.

क्युआरकोडनं सायबर गुन्हेगार फसवणूक कशी करतात?

हा घोटाळा सुरु होतो जेव्हा एखादी व्यक्ती आपली एखादी वस्तू विक्रीसाठी ऑनलाइन सेल वेबसाईटवर टाकते. त्यानंतर फसवणुक करणारी व्यक्ती ही वस्तू विकणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधते आणि व्यवहार निश्चित करते. त्यानंतर ती पैसे अॅडव्हान्स देण्यासाठी आपल्याकडील क्युआरकोड विक्रेत्याला शेअर करते आणि कोड स्कॅन केल्यावर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील अस सांगते. पण एकदा विक्रेत्याने हा क्युआर कोड स्कॅन केला तर त्याच्या अकाउंटला पैसे येण्याऐवजी ते पैसे त्याच्या खात्यातून वजा झालेले असतात. अशा प्रकारे हे सायबर गुन्हेगार फसवणूक करतात.