शेअर बाजारातून मंदी गायब; सेन्सेक्समध्ये 800 अंशांची तेजी 

वृत्तसंस्था
Monday, 26 August 2019

केंद्र सरकारने योजलेल्या उपाय योजनांना भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे

मुंबई: देशांतर्गत अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने योजलेल्या उपाय योजनांना भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सकाळच्या सत्रात 'साईडवेज ट्रेंड'मध्ये असलेला शेअर बाजार दुपारच्या क्षेत्रात वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 800 अंशांनी वधारला असून तो 37 हजार 544 अंशांवर पोचला आहेत तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीमध्ये 227.70 अंशाची वाढ झाली आहे. निफ्टीने 11 हजारांचा टप्पा पार करत 11,070 अंशांची पातळी गाठली आहे. 

आजच्या उसळीमध्ये प्रामुख्याने बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील शेअरमध्ये तेजीत बघायला मिळत आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दिलेल्या भरघोस मदतीचा फायदा बँकिंग क्षेत्रातील शेअर वाढीमध्ये दिसतो आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांबरोबरच येस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय, कोटक बँकेच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आहे. 

दुसरीकडे वाहन उद्योग क्षेत्राला दिलासा दिला आहे. मात्र या क्षेत्रातील कंपन्यांकडे गुंतवणूकदार फारसे आकर्षित झाल्याचे दिसत नाही. निफ्टी ऑटो निर्देशांकातील हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो आणि टाटा मोटर्स सारख्या मोठ्या कंपन्या नकारात्मक व्यवहार करत आहेत. तर महिंद्राच्या शेअरमध्ये तेजी आहे. वाहन कंपन्यांचा अपवाद वगळता स्मॉल, मिड आणि लार्ज कॅप प्रकारातील कंपन्यांचे शेअर सकारात्मक पातळीवर व्यवहार करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex climbs 800 pts amid relief measures, likely US-China trade talks