बाजारात पडझड

पीटीआय
शुक्रवार, 7 जून 2019

‘एनबीएफसी’ समभागांवर दबाव
‘क्रिसिल’ने अर्थसंकटात सापडलेल्या ‘डीएचएफएल’च्या कमर्शिअल पेपर्सचे (सीपी) मानांकन ए ४+ वरून घटवत डी (डिफॉल्ट) असे केले आहे. यामुळे कंपनीचा शेअर आज सुमारे १५ टक्‍क्‍यांनी कोसळला. त्याबरोबर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स, इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स, एल अँड टी हाउसिंग फायनान्स या कंपन्यांच्या शेअरमध्येही सुमारे ८.६१ टक्‍क्‍यांची घसरण नोंदली गेली.

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात बॅंकिंग क्षेत्रातील रोकडटंचाईबाबत ठोस निर्णय न झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. गुंतवणूकदारांनी बॅंकिंग, भांडवली वस्तू व ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने सेन्सेक्‍स तब्बल ५५३ अंशांनी गडगडून ३९,५२९ अंशांवर स्थिरावला. निफ्टीत १७७ अंशांची घट  होत ११,८४३ अंशांवर बंद झाला. 

पतधोरण आढावा बैठकीत ‘एनबीएफसी’सह बॅंकिंग क्षेत्राला भेडसावणाऱ्या रोकडटंचाई व तत्सम समस्यांवर ठोस उपाययोजना जाहीर होतील, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांना होती. त्‍यात बँकेने चालू वर्षासाठी विकासदराचा अंदाज कमी करून ७ टक्‍क्‍यांवर आणल्याचे पडसात बाजारावर उमटले. त्यामुळे रेपोदरात केलेली कपात गुंतवणूकदारांवर प्रभाव टाकण्यात अपयशी ठरली. सेन्सेक्‍स मंचावर इंडसइंड बॅंक, येस बॅंक, एसबीआय, एल अँड टी, टाटा स्टील, बजाज फायनान्स, वेदांता टाटा मोटर्स, रिलायन्स आदी शेअर सुमारे ६.९७ टक्‍क्‍यांनी घसरले. कोल इंडिया, पॉवर ग्रीड, एनटीपीसी, एचयूएल, हिरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्‌स, इन्फोसिस आदी शेअर तेजीसह बंद झाले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Decrease Share Market