सेन्सेक्समध्ये अकराशे अंशांची घसरण;गुंतवणूकदारांचे चार लाख कोटी बुडाले 

वृत्तसंस्था
Friday, 25 September 2020

सेन्सेक्सवर नोंदविलेल्या सर्व कंपन्यांचे एकत्रित मूल्य कालच्या १५२ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत आज १४८ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले. निर्देशांकांची ही सलग सहावी घसरण आहे.

मुंबई  - अमेरिकी बाजारातील थंडावलेली विक्री, कोरोनाच्या सावटामुळे जागतिक अर्थव्यवस्थांबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आदी कारणांमुळे आज आज भारतीय शेअरबाजारांमध्ये विक्रमी पडझड झाली. आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १ हजार ११४ अंशांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३२६ अंशांनी कोलमडला. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या समभागांचे मूल्य आज चार लाख कोटी रुपयांनी रोडावले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शेअर बाजारामध्ये आज सकाळी व्यवहाराला सुरवात झाल्यानंतर निर्देशांकामध्ये सातत्याने घसरण होत होती. दिवसअखेर सेन्सेक्स ३६ हजार ५५३.६० अंशांवर तर निफ्टी १० हजार ८०५.५५ अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्सवर नोंदविलेल्या सर्व कंपन्यांचे एकत्रित मूल्य कालच्या १५२ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत आज १४८ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले. निर्देशांकांची ही सलग सहावी घसरण आहे. गेल्या सात सत्रांमध्ये सेन्सेक्स ३९ हजारांवरून सुमारे तीन हजार अंशांनी घसरला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

४७ समभाग नुकसानीत 
आज निफ्टी निर्देशांकातील ५० प्रमुख समभागांपैकी फक्त भारती इन्फ्राटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर व झी एंटरटेनमेंट हे तीनच समभाग लहान मोठी वाढ दाखवीत बंद झाले. उरलेले ४७ समभाग नुकसानीत बंद झाले. सेन्सेक्सच्या तीस समभागांपैकी फक्त हिंदुस्थान युनिलिव्हर मध्ये वाढ झाली. आज सर्वात जास्त घसरण (७.१० टक्के) इंडसइंड बँकेच्या समभागात झाली व तो ४९० रुपयांवर बंद झाला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यांच्या भावातही घसरण 
इतके दिवस तेजी दाखवणारे बजाज फायनान्स (२१४ रुपयांनी घसरून ३ हजार०२७ रु. ला बंद), टाटा कन्सल्टन्सी (१३५ ची घसरण २ हजार ३३१ ला बंद), बजाज फिनसर्व्ह (२२७ ची घसरण ५ हजार ४२७ रु. बंद), मारुती (२०७ रु. घसरण ६ हजार २९५ बंद) हे बडे समभागही आज तीन ते साडेसहा टक्के घसरले. रिलायन्स (२,१८१), इन्फोसिस (९७५), सन फार्मा (४८५), टाटा स्टील (३४३), लार्सन अँड टुब्रो (८५०) यांचेही भाव कमी झाले. 

इंडसइंड बँकेला फटका 
आज सर्वांत जास्त घसरण इंडसइंड बॅंकेच्या समभागात (७.१० टक्के) झाली. आतापर्यंत तेजीत असणारे बजाज फायनान्स (२१४ रुपयांनी घसरून ३,०२७ रु. ला बंद), टाटा कन्सल्टन्सी (१३५ ची घसरण २,३३१ ला बंद), बजाज फिनसर्व्ह (२२७ ची घसरण ५,४२७ रु. बंद), मारुती (२०७ रु. घसरण ६,२९५ बंद) हे बडे समभागही आज तीन ते साडेसहा टक्के घसरले. रिलायन्स (२,१८१), इन्फोसिस (९७५), सन फार्मा (४८५), टाटा स्टील (३४३), लार्सन अँड टुब्रो (८५०) यांचेही भाव कमी झाले. 

सोने, चांदीतही घसरण 
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचा भाव वधारल्याने भारतीय बाजारपेठांमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. १० ग्रँम सोने ५० हजार रुपयांखाली गेले; तर एक किलो चांदीचा भावही दीड हजार रुपयांनी घसरत ५७ हजारांपर्यंत कमी झाला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या अनिश्‍चिततेमुळे आता सोने-चांदीमधील गुंतवणूकदारांना विकसित देशांच्या मध्यवर्ती बॅंकांकडून पॅकेजची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांनी सोने-चांदीतील गुंतवणूक कमी केली आहे. भारतीय बाजारपेठांमधील २४ कॅरेट सोन्याचे दर आठवडाभरातच ५१ हजार ४०० वरून ४९ हजार ४०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. वायदे बाजारातील सोन्याचा दर ४९ हजार ४४२ रुपये; तर चांदीचा दर ५६ हजार ८३३ रुपये होता. 

घसरणीची कारणे 
जागतिक बाजारातील मंदीचे वातावरण 
अमेरिकी बँकांच्या व्यवहारांचा लीक झालेला डेटा 
अन्य आशियायी बाजारांवरील मंदीचे मळभ 
जगभरातील कोरोनाचा वाढता संसर्ग 
बड्या देशांतील मागणीमध्ये घसरण 
गुंतवणूकदारांनी घेतलेला आखडता हात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex fell by 1,114 points. Four lakh crore of investors sank