नववर्षाची तेजीने सुरवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

मुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्‍स १८६ अंशांनी वधारला आणि ३६ हजार २५४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४७ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१० वर बंद झाला.

मुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्‍स १८६ अंशांनी वधारला आणि ३६ हजार २५४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४७ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१० वर बंद झाला.

आजच्या सत्रात आयटी, फायनान्शिअल, टेलिकॉम, फार्मा आणि ऑटो आदी क्षेत्रांतील शेअर्सला मागणी दिसून आली. रिझर्व्ह बॅंकेच्या आर्थिक स्थैर्य अहवालात बॅंकिंग क्षेत्र सावरत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्याचे सकारात्मक पडसाद आज बाजारात उमटले. गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य दिले. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर भारती एअरटेल, एचडीएफसी, येस बॅंक, एचडीएफसी बॅंक, एसबीआय, ॲक्‍सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, इन्फोसिस, हिरो मोटो कॉर्प, टाटा मोटर्स, सन फार्मा, बजाज फायानान्स, टीसीएस, पॉवरग्रीड, आयटीसी, बजाज ऑटो, रिलायन्स आदी शेअर तेजीसह बंद झाले. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, ओएनजीसी, एचसीएल टेक आदी शेअर घसरणीसह बंद झाले. नव्या वर्षानिमित्त जगभरातील प्रमुख शेअर बाजारांना सुटी होती.

रुपयाची दमदार कामगिरी
मुंबई - नवीन वर्षात रुपयाने दमदार सुरवात केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी ३४ पैशांनी वधारून ६९.४३ या पातळीवर बंद झाला. 

निर्यातदार आणि बॅंकांकडून डॉलरची विक्री वाढल्याने रुपयाला फायदा झाला. रुपया आज सकाळी ६९.६३ या पातळीपर्यंत वधारला. निर्यातदारांकडून रुपयाची विक्री वाढल्याने तो मागील सत्राच्या तुलनेत ३४ पैशांनी वधारुन ६९.४३ या पातळीवर अखेर बंद झाला. काल (ता.३१ डिसेंबर) डॉलरच्या तुलनेत रुपया १८ पैशांनी वधारुन ६९.७७ या पातळीवर बंद झाला होता. मागील वर्षभरात डॉलरच्या तुलनेत रुपया ५०९ पैसे म्हणजेच ९.२३ टक्‍क्‍याने घसरला आहे. 

‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’च्या संशोधन अहवालानुसार, चालू वर्षात रुपयाची सुरवात चांगली झाली आहे. मागील वर्षात रुपयात मोठी घसरण झाली होती. त्या तुलनेत यावर्षी रुपया वधारण्याची शक्‍यता आहे. मात्र, या वर्षाच्या मध्यात रुपयात किरकोळ घसरण होण्याचा अंदाज आहे. 

रुपयाची पातळी 
  २०१८ अखेर - ६९.७७ 
  २०१७ अखेर - ६३.८७ 

रुपयातील घसरण 
  २०१८ - ५०९ पैसे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Increase