esakal | ‘मेरे पास सेन्सेक्स है...!’
sakal

बोलून बातमी शोधा

stock market

‘मेरे पास सेन्सेक्स है...!’

sakal_logo
By
डॉ. वीरेंद्र ताटके, पुणे

मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ हा निर्देशांक सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या चांगलाच परिचयाचा आहे. त्यातच नुकतीच ‘सेन्सेक्स’ने शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वोच्च पातळी (५३ हजार अंश) गाठल्यामुळे जनसामान्यांच्या मनात देखील ‘सेन्सेक्स’ हा चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय झाला आहे. असा हा ‘सेन्सेक्स’च आपल्याला खरेदी करता येईल का, असा प्रश्न अनेकदा गुंतवणूकदारांच्या मनात येतो.

‘सेन्सेक्स’मध्ये मुंबई शेअर बाजारातील उत्तम कामगिरी करणाऱ्या ३० कंपन्यांचा समावेश होतो. १९७८-७९ या वर्षाची पायाभूत पातळी असलेला ‘सेन्सेक्स’ १०० अंशांच्या पातळीवर सुरु झाला होता आणि अनेक चढ-उतार पार करत तो त्याच्या सर्वोच्च पातळीला पोचला आहे. शेअर बाजार कोणत्या दिशेने चालला आहे, याचा अंदाज यावा म्हणून एका समीकरणाच्या साह्याने तयार केलेला तो एक आकडा आहे. त्यामुळे शेअर बाजारातून थेट त्याची खरेदी करणे शक्य नसते. फार तर त्यामध्ये समाविष्ट कंपन्यांच्या शेअरची खरेदी दिलेल्या प्रमाणात करून ‘सेन्सेक्स’ खरेदी केल्याचे समाधान मिळू शकते. अर्थात या ३० कंपन्यांच्या शेअरची खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेली मोठी रक्कम कायम गुंतवणे आणि त्यातील बदलांकडे लक्ष ठेवणे या गोष्टी सर्वसामान्य गुंतवणूकदाराला सहजशक्य होत नाहीत. तसेच वायदा बाजारात इंडेक्स फ्युचर्सद्वारे ‘सेन्सेक्स’मध्ये व्यवहार करता येतात. पण त्यामधील जोखीम सर्वच गुंतवणूकदारांना झेपेल याची खात्री देता येत नाही.

‘इंडेक्स फंडा’चा उत्तम पर्याय

‘सेन्सेक्स’वर आधारित असलेला ‘इंडेक्स फंड’ हा ‘सेन्सेक्स’मधील सर्व कंपन्यांच्या शेअरची खरेदी दिलेल्या प्रमाणात करत राहतो. कोणताही सर्वसामान्य गुंतवणूकदार एकरकमी पाच हजार रुपये किंवा दरमहा किमान पाचशे रुपये गुंतवून अशा फंडात गुंतवणूक सुरु करू शकतो. याचाच अर्थ म्हणजे इंडेक्स फंडाद्वारे ‘सेन्सेक्स’ खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. अशा फंडांचे अनेक फायदे आहेत. शेअर बाजारातील सर्वाधिक बाजारमूल्य असणाऱ्या सर्वोत्तम ३० कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची संधी अशा फंडामुळे मिळते. तसेच चुकीच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीचा फटका गुंतवणूकदारांना बसण्याची शक्यता नसते. निवडून दिलेल्या शेअरमध्येच गुंतवणूक करायची असल्यामुळे ‘इंडेक्स फंडां’च्या व्यवस्थापकाचे काम इतर फंडांच्या तुलनेने सोपे असते. त्यामुळेच अशा फंडाचे खर्च कमी असतात, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा गुंतवणूकदारांना परताव्याच्या रूपाने मिळतो.

१९७८ मध्ये १०० अंशांच्या पातळीवर सुरु झालेल्या ‘सेन्सेक्स’ने आतापर्यंत सुमारे १६ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, १९७८ मध्ये ज्या गुंतवणूकदाराने ‘सेन्सेक्स’मध्ये १० हजार रुपये गुंतवले होते, त्याच्या गुंतवणुकीचे आजचे बाजारमूल्य अंदाजे ५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. अर्थात प्रत्यक्षात अशी व्यक्ती सापडणार नाही; कारण १९७८ मध्ये आपल्या देशात ‘इंडेक्स फंड’ सुरु झाले नव्हते. पाश्चात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे ‘इंडेक्स फंडा’ची संकल्पना उशीरा आली आणि आजही असे फंड आपल्या देशातील गुंतवणूकदारांना फारसे माहीत नाहीत. ‘सेन्सेक्स’प्रमाणेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- ‘निफ्टी’वर आधारित असलेल्या ‘इंडेक्स फंडा’मध्ये देखील गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

प्रत्येक म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराच्या भात्यात एखादा तरी ‘इंडेक्स फंड’ असावा. जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी देखील कमी खर्च असलेल्या इंडेक्स फंडांत गुंतवणूक सुचविलेली आहे. अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे, ‘सेन्सेक्स’ने आता सर्वोच्च पातळी गाठली आहे आणि ‘सेन्सेक्स’चे पीई गुणोत्तर ३२ च्या पुढे पोचले आहे. याचाच अर्थ, ‘सेन्सेक्स’ खूप महाग झाला असून, त्यात एकरकमी गुंतवणूक करणे टाळावे. त्याऐवजी अशा फंडात दीर्घकाळासाठी ‘एसआयपी’ सुरू करावी. त्याचबरोबर काही कारणास्तव येणाऱ्या काळात ‘सेन्सेक्स’ कोसळला, तर त्याच फंडात एकरकमी मोठी गुंतवणूक करण्याची तयारी ठेवावी. बाजारातील सध्याची दोलायमान स्थिती पाहता, गुंतवणुकीतील नियमितता आणि सातत्य या दोन बाबी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. इंडेक्स फंडात अशा प्रकारे गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार भविष्यात एका लोकप्रिय हिंदी चित्रपटातील गाजलेल्या संवादाप्रमाणे अभिमानाने म्हणू शकेल, ‘मेरे पास सेन्सेक्स है!’

(लेखक म्युच्युअल फंडांचे अभ्यासक आहेत.)

loading image