1 हजार ते 50 हजारांचा प्रवास; सेन्सेक्सची ऐतिहासिक उसळी तर BSE सांगितले महत्त्वपूर्ण आकडे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

सेन्सेक्सने गुरुवारी पहिल्यांदा 50,000 अंकांचा टप्पा पार करुन इतिहास रचला आहे.

नवी दिल्ली : सेन्सेक्सने गुरुवारी पहिल्यांदा 50,000 अंकांचा टप्पा पार करुन इतिहास रचला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअर्सवाला इंडेक्स सेन्सेक्स सुरवातीच्या कारभारानंतर 50,126.73 च्या ऐतिहासिक आणि विक्रमी अंकांवर पोहोचला. याप्रमाणेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 85.40 अंक 0.58 टक्क्यांच्या वाढीबरोबर 14,730.10 अंकांवर पोहोचला. याआधी निफ्टी देखील 14,738.30 अंकांनी उच्चांकी ठरला. अमेरिकेमध्ये जो बायडन यांचं सरकार औपचारिक रित्या सत्तेमध्ये आल्यानंतर बाजारात ही अभूतपूर्व अशी तेजी पहायला मिळाली आहे.  

शेअर मार्केटमधील तज्ज्ञ असं गृहित धरुन जात होते की, सेन्सेक्स यावर्षी 50,000 चा रेकॉर्ड तोडू शकतो, मात्र एवढ्या लवकर तो तोडेल याबाबत मात्र कुणीही कल्पना केली नव्हती. जो बायडन यांच्या शपथविधी नंतर शेअर मार्केटमध्ये नव्या दिलासादायक उपायांच्या आशेने शेअर बाजार तेजीमध्ये राहिला. कोरोनावरील लसीकरण सुरु झाल्याने देखील शेअर मार्केटवर परिणाम होताना दिसत आहे. गुरुवारी सेन्सेक्सने गाठलेल्या या उच्चांकानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने देखील सेन्सेक्सच्या आकड्यांमध्ये आजवर झालेला प्रवास सांगितला.

हेही वाचा - Breaking: सेन्सेक्सने गाठला 50 हजारांंचा नवा उच्चांक; ऐतिहासिक विक्रमी उसळी

सर्वांत आधी सेन्सेक्सने जुलै, 1990 मध्ये एक हजाराचा आकडा गाठला होता. ऑक्टोबर 1999 मध्ये 5000 चा, फेब्रुवारी 2006 मध्ये 10,000 चा आकडा पार करुन सेन्सेक्स जुलै 2007 मध्ये 15 हजारांच्या आकड्याच्या पार पोहोचला होता. डिसेंबर 2007 मध्येच सेन्सेक्सने 20 हजारांचा आकडा पार केला होता. मात्र, 25 हजारांचा आकडा गाठायला सेन्सेक्सला जवळपास सात वर्ष लागले. सेन्सेक्सने मे, 2014 मध्ये 25 हजारचा आकडा गाठला. परत मार्च, 2015 मध्ये तीस हजारापर्यंत पोहोचला. जवळपास तीन वर्षानंतर जानेवारी 2018 मध्ये हा इंडेक्स 35 हजाराच्या पार गेला आणि फेब्रुवारी 2020 ला सेन्सेक्सने 40 हजाराचा आकडा पार करत 4 डिसेंबर 2020 रोजी 45 हजारांवर तो पोहोचला. आणि त्यानंतर फक्त एका वर्षाच्या आतच जानेवारी, 2021 मध्ये 10 हजार अंकाची उसळी मारत सेन्सेक्स आज 50 हजारांच्या टप्प्यावर पोहोचला आहे. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी बायडन आल्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये अधिक दिलासादायक आर्थिक पॅकेजची आशा व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील नवे अर्थमंत्री जेनेट येलेन यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी याआधीच भक्कम प्रोत्साहन अर्थात स्टिम्यूलस पॅकेजची घोषणा केली आहे. त्यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी 1.9 हजार अब्ज डॉलरच्या प्रोत्साहन पॅकेजचा प्रस्ताव ठेवला आहे. यानंतर ग्लोबल मार्केट सहित इतर मार्केटमध्ये उत्साहाची परिस्थिती आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sensex touches 50k mark making history sensex journey since the indexs 1000 mark