esakal | शेअर मार्केट - दुसरी लाट...दुसरी संधी

बोलून बातमी शोधा

शेअर मार्केट - दुसरी लाट...दुसरी संधी
शेअर मार्केट - दुसरी लाट...दुसरी संधी
sakal_logo
By
भूषण गोडबोले

गेल्या आठवड्यात शुक्रवारी २०२ अंशांची पडझड करून ‘सेन्सेक्स’ ४७,८७८ अंशांवर बंद झाला. देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या, परिणामी पुन्हा सुरू झालेला लॉकडाउन आणि डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली पडझड या सर्वांचे पडसाद सध्या शेअर बाजारावर उमटत आहेत. गेल्या वर्षी कोरोनानामक महासाथीमुळे देशात लॉकडाउन लावावा लागल्याने आर्थिक विकास दर मंदावला. अशावेळेस शेअर बाजारात प्रथम मोठ्या प्रमाणात पडझड झाली. मात्र, नंतर ‘व्ही शेप रिकव्हरी’ करीत नवा उच्चांक गाठून या बाजाराने सर्वांना आश्चर्यचकित केले. काही काळाने हळूहळू ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली. कोरोनावरील लस आल्याची सुखद बातमी मिळाली. देशाची आर्थिक स्थिती रुळावर येत असल्याचे संकेत मिळू लागले असतानाच, अचानक पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होऊ लागली आहे. परिणामी विविध ठिकाणी पुन्हा लॉकडाउन लागू झाले आहे. पण आता कोरोनावरील लस उपलब्ध आहे. आगामी काळात लसीकरणाचा वेगही वाढेल. पण तोपर्यंत बाजारावर भीतीचे सावट नक्की असेल.

हेही वाचा: क्रेडिट कार्डवर कर्ज घेताय? मग 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठे नुकसान

एखादा धावपटू पळून आल्यावर ज्याप्रमाणे काही काळ दम खातो, त्याप्रमाणे गेल्या वर्षी ‘व्ही शेप रिकव्हरी’ करून सर्वांना चकित करणारा शेअर बाजार आता काही काळ मर्यादित पट्ट्यातच चढ-उतार दर्शवू शकतो. अशा वेळेस बाजारातील पडझड ही संधी ओळखून ज्या कंपन्या फंडामेंटली सक्षम आहेत; तसेच ज्या कंपन्यांसाठी लॉकडाउन हे केवळ तात्पुरते संकट आहे, अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने दीर्घावधीची खरेदी केली पाहिजे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मिळालेल्या दुसऱ्या संधीचा लाभ घेणे दीर्घावधीमध्ये फायदेशीर ठरू शकेल.

ट्रॅव्हल-टुरिझम उद्योग

ट्रॅव्हल-टुरिझम उद्योगासाठी कोरोनाचा काळ हे तात्पुरते संकट आहे. या क्षेत्राशी निगडित रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) या कंपनीच्या शेअरने नऊ मार्च २०२१ पासून रु. २०७३ वरून १९ एप्रिलपर्यंत रु. १५५० पर्यंत पडझड केल्यानंतर सध्या या कंपनीच्या शेअरचा भाव रु. १७१२ च्या आसपास आहे. दुसऱ्या लॉकडाउनच्या काळात या शेअरमध्ये पुन्हा दीर्घावधीसाठी खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.

हेही वाचा: गुंतवणूक म्हणून घर घेताय?

बँकिंग क्षेत्र आकर्षक

गेल्या १६ फेब्रुवारीपासून ‘सेन्सेक्स’मधील पडझडीबरोबर बँकिंग क्षेत्रातील शेअरमध्येदेखील घसरण झाली. अशा वेळेस एचडीएफसी बँकेबरोबरच आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, स्टेट बँक अशा बड्या बँकांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या; तसेच शेअर बाजारात शेअरसारखी खरेदी-विक्री करता येणाऱ्या ‘बॅंक बीज’ (ईटीएफ) या रु. ३१७ च्या आसपास उपलब्ध आहेत. या एक्स्चेंज ट्रेडेड फंडातसुद्धा गुंतवणुकीची संधी मिळत आहे.

अशा प्रकारे बाजारातील पडझडीत सुद्धा परिस्थितीनुसार संधी ओळखून आणि मर्यादित जोखीम स्वीकारून दीर्घावधीसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचे धोरण पाळणे लाभदायक ठरू शकेल.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे नेहमीप्रमाणेच आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार आहेत.)