Share Market: डिजिटल सोन्यातील गुंतवणूक

युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपली गुंतवणूक सुरक्षित करण्याकडे प्रत्येक गुंतवणूकदाराचा कल असतो.
डिजिटल सोन्यातील गुंतवणूक
डिजिटल सोन्यातील गुंतवणूकSakal

युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपली गुंतवणूक सुरक्षित करण्याकडे प्रत्येक गुंतवणूकदाराचा कल असतो. युद्धाच्या परिस्थितीत शेअर बाजाराची अस्थिरता काही नवी नाही. राष्ट्रीय पातळीवरील या अनिश्चित आणि अमर्याद किंमतवाढीचे परिणाम स्थानिक बाजारांमध्ये होणाऱ्या उलाढालींवर स्पष्टपणे दिसून येतात. खनिज तेलाच्या वाढलेल्या किमती आपला वाहतुकीचा खर्च वाढवतात आणि त्यामुळे बाजारातील वस्तूंच्या किमतीही वाढतात. अशावेळी आपल्याला या वाढीव किमतींच्या झळीपासून केवळ सोन्यामधील गुंतवणूक काही प्रमाणात वाचवू शकते. कारण सुरक्षित गुंतवणुकीचा एक प्रकार म्हणून सर्वप्रथम नजरेसमोर येते ती सोन्यातील गुंतवणूक. शेअर बाजार कोसळला तर सोन्याच्या किमती वाढतात आणि पर्यायाने आपल्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावाही वाढतो. जर आपल्या उत्पन्नातील सात ते पंधरा टक्के रक्कम सोन्यात गुंतवली तर ही गुंतवणूक आपल्या नक्कीच फायद्याची ठरते.

आताची परिस्थिती पाहिली तरी आपल्याला अंदाज येईल. रशिया-युक्रेन युद्धाच्या आधी खनिज तेल ९९ डॉलर प्रति बॅरल होते, ते गेल्या रविवारपर्यंत १४० डॉलर प्रति बॅरलच्या वर पोचले. त्याचप्रमाणे सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ४८ हजार रुपयांच्या दरम्यान होता, तो आता ५२ हजारांवर गेला आहे. म्हणजेच जवळपास १३-१५ टक्क्यांनी वधारला आहे. यावरून सोन्याच्या गुंतवणुकीत किती उच्च परतावा आहे, हे लक्षात येते.

सोन्यातील गुंतवणूक नेहमीच उत्तम परतावा देत फायदेशीर ठरते. या गुंतवणुकीवर अधिक नफा कमावण्यासाठी आपण सोन्यामधील गुंतवणूक प्रत्यक्ष सोन्यामध्ये न करता डिजिटल सोन्यामध्ये केली तर आपल्याला अधिकचा परतावा मिळू शकतो. असे कसे काय, तर आधी हे समजून घेऊ, की प्रत्यक्ष सोन्यामध्ये गुंतवणूक करत असताना आपल्याला कोणकोणते शुल्क भरावे लागते. एक म्हणजे प्रत्यक्ष सोने खरेदी करताना आपल्याला ‘जीएसटी’ द्यावा लागतो आणि जर ही गुंतवणूक आपण दागिन्यांच्या स्वरूपात केलेली असेल तर आपल्याला किमान आठ टक्के घडणावळही द्यावी लागते.

ही ‘जीएसटी’ची रक्कम आणि घडणावळीची रक्कम आपल्याला विक्री करताना परत मिळत नाही; तर उलट विक्री करताना घटही विचारात घेतली जाते. अशा वेळी बाजारभावापेक्षा आपल्याला तीन ते पाच टक्के रक्कम कमी मिळते. तेच जर आपण आपली ही सोन्यातील गुंतवणूक डिजिटल स्वरूपात केलेली असेल, तर खरेदी करताना ‘जीएसटी’ची रक्कम द्यावी लागत नाही. डिजिटल स्वरूपात असल्यामुळे घडणावळीचा प्रश्नच येत नाही. गरजेच्या वेळेस डिजिटल सोने विकताना घटही सहन करावी लागत नाही. या सर्वांचा फायदा आपल्याला मिळतो. या व्यतिरिक्त डिजिटल स्वरूपातील गुंतवणुकीवर आपल्याला व्याजही मिळते. त्यामुळे आता काळानुरूप सोन्यातील गुंतवणूक स्मार्ट आणि डिजिटल स्वरूपात करणे गरजेचे आहे.

- महेंद्र लुनिया

(लेखक विघ्नहर्ता गोल्ड लि.चे संचालक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com