बाजाराच्या घसरणीत आपण काय करावे?

Market
Market

भारतीय शेअर बाजारात मागील सलग आठ सत्रांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घसरणीमागची कारणे तपासत असताना इतरही काही गोष्टींचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. लोकसभा निवडणूक निकालपूर्व अनिश्‍चितता, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध, इराणवरील निर्बंध आणि त्याच अनुषंगाने कच्च्या तेलाच्या दरातील अस्थिरता, अशा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कारणांमुळे बाजारात सध्या घसरण होताना दिसत आहे.

देशांतर्गत बाबींचा विचार करता, ‘आयएलएफएस’चे प्रकरण, झी एंटरटेन्मेंटसारख्या कंपन्यांच्या प्रवर्तकांनी केलेले ‘शेअरचे प्लेजिंग’ म्हणजेच कंपनीचे शेअर तारण ठेवून कर्ज उचलणे आणि ते फेडण्यात असमर्थता दर्शविणे यांसारख्या बाबींचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम होत आहे. असे असले तरी अस्थिरता हा शेअर बाजाराचा स्थायीभाव आहे. त्यामुळे या स्थितीत गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता, सावध पवित्र घेतला पाहिजे.

देशातील सर्वांत मोठी बिगर-वित्त पुरवठादार कंपनी ‘आयएलएफएस’ प्रकरणातून भारतीय अर्थव्यवस्था सावरत असतानाच, जेट एअरवेज आणि झी समूहासारखा बलाढ्य ग्रुप अनेक म्युच्युअल फंड किंवा इतर कर्जदारांची देणी परत करण्यास असमर्थ ठरत असल्याने त्याचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम होत आहे. त्याचबरोबर, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि त्या अनुषंगाने शेअर बाजारावर देशातील राजकीय स्थितीचा परिणाम होणे साहजिकच आहे. मात्र, अमुक एका पक्षाचे सरकार आले म्हणजे शेअर बाजार तेजीत राहील किंवा पडझड होईल, असे भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा पाहता वाटत नाही. परंतु, २३ मे रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालांपर्यंत छोट्या गुंतवणूकदारांनी बघ्याची भूमिका घेणे चांगले राहील. 

एकीकडे अस्थिरता हा शेअर बाजाराचा स्थायीभाव म्हणत असतानाच काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर चांगले आणि वाईट टप्पे अनुभवायला येतात. अशा परिस्थितीत शेअर बाजाराच्या अस्थिरतेचा आपल्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी आपण निवडत असलेली कंपनी कर्जविरहित असावी, कंपनीमध्ये प्रवर्तकांचा वाटा ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असावा, असे मापदंड तपासले पाहिजेत. त्याचबरोबर, मागील काही वर्षांमधील कंपनीची कामगिरी कशी राहिली आहे, कंपनीत ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’ला प्राधान्य दिले जात आहे का, याचीदेखील तपासणी केली. हे तपासण्यासाठी https://www.bseindia.com/ या अधिकृत वेबसाईटचा आधार घेता येऊ शकतो. तसेच, यासाठी या क्षेत्रातील अनुभवी, तज्ज्ञांची मदत घेणे हिताचे ठरते. 

याचबरोबर, प्रत्यक्ष शेअर बाजारात गुंतवणूक करताना केवळ ‘सेन्सेक्‍स’ किंवा ‘निफ्टी’ निर्देशांकातील कंपनी (लार्ज कॅफ) म्हणजेच चांगली हा समज दूर ठेवावा. मागील काही महिन्यांमध्ये ‘निफ्टी ५०’ मधील कंपन्यांची कामगिरी पाहता हे सप्रमाण सिद्ध होते. तसेच, ‘मल्टिबॅगर’ शोधण्याच्या फंदात न पडता वर नमूद केलेल्या निकषांच्या कसोटीवर तपासणी करून शेअर निवडावेत. अगदी नवख्या गुंतवणूकदारांनी मात्र गुंतवणुकीला सुरवात करताना म्युच्युअल फंडापासून प्रारंभ केलेला चांगला! 
(शब्दांकन - प्रवीण कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com