शेअर बाजार कोसळतोय अन् तुमच्यावर हसतोय!

शेअर बाजार कोसळतोय अन् तुमच्यावर हसतोय!

शेअर बाजारात घसरण अजूनही थांबलेली नाही. गेल्या महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'कॉर्पोरेट टॅक्स'मध्ये कपातीची घोषणा करत बाजाराला दोन दिवस तरी 'अच्छे दिन'' दाखवले. त्या दोन दिवसांमध्ये शेअर बाजारात सुमारे तीन हजार अंशांची वाढ झाली. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा घसरणीला सुरुवात झाली. त्यामुळे शेअर बाजार सध्या घसरतोय आणि तुमच्यावर हसतोय असे म्हणणे योग्य ठरणार आहे. 

गुंतवणूकदारांनी काय करावे?
गुंतवणूकदारांवर अक्षरशः रोज नवीन माहितीचा खच पडतोय. त्यामध्ये अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मंदीच्या वाटेवर आहे किंवा अर्थव्यवस्थेचा विकासदर पुन्हा मंदावला असे एक ना अनेक गोष्टी वाचायला मिळतात.  'कॉर्पोरेट टॅक्स'मध्ये कपात केल्यानंतर 'बुलिश' लोक पुन्हा डिसेंबरपर्यंत बाजार 40 किंवा 45 हजारांवर जाणार असेही सांगू लागले. यात मात्र सामान्य गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. करावे तर काय करावे अशी मनस्थिती गुंतवणूकदारांची झाली आहे. 

गुंतवणूकदारांनी काही गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत
- शेअर बाजारात कंपन्यांच्या किंमतीवर अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या गोष्टींचा आधीच परिणाम झालेला असतो. 
- मानवी मनस्थितीच्या अगदी विरुद्ध बाजार हा वागत असतो. 

 शेअर बाजारात कंपन्यांच्या किंमतीवर अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या गोष्टींचा आधीच परिणाम झालेला असतो.
अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या विविध घटनांचा परिणाम हा शेअर बाजारातील कंपन्यांच्या शेअरवर होत असतो. Efficient Market Hypothesis (EMH) या गुंतवणुकीच्या थेअरीनुसार शेअरच्या किंमतीवर सर्व उपलब्ध माहितीच प्रभाव हा झालेला असतोच. त्यामुळे फंडामेंटल ऍनालिसिस असो वा टेक्निकल ऍनालिसिस असो यांच्या माध्यमातून जास्त परतावा मिळू शकत नाही. 

ईएमएच थेअरीनुसार, गुंतवणूकदार अतिशय कमी किंमतीत शेअर खरेदी किंवा जास्त किंमतीला शेअरची विक्री करणे अशक्य आहे. शेअर बाजारातील कोणताही तज्ज्ञ,  शेअर बाजारात शेअर खरेदी किंवा विक्रीसाठी 'मार्केट टायमिंग' सांगू शकत नाही. त्यामुळे गुंतवणूकदाराला चांगले 'रिटर्न' हवे असल्यास जोखीम घ्यावीच लागेल. 


मानवी मनस्थितीच्या अगदी विरुद्ध बाजार हा वागत असतो.
शेअर बाजारात आपण विचार करत असतो अगदी त्याविरुद्ध प्रतिक्रिया देत असतो. त्यामुळे आपण शेअर बाजारात एखाद्या शेअरबद्दल घडणाऱ्या गोष्टी वाचून शेअर खरेदी अथवा विक्री करण्याचा निर्णय घेत असतो. मात्र शेअर बाजारावर विविध घडणाऱ्या घटनांचा परिणाम होत असतो. 

शेअर बाजार तुमच्यावर हसतोय
शेअर बाजार तुमच्यावर हसतोय! कारण, शेअर बाजारात घसरण सुरु असते त्यावेळी सामान्य गुंतवणूकदार हा घसरण होते म्हणून बाजूला राहतो. किंवा शेअर बाजारात आणखी घसरण होईल या भीतीने शेअर बाजारातून बाहेर पडतो. याउलट बाजार जेव्हा तेजीत असतो त्यावेळी तो आणखी वाढेल म्हणून शेअरची विक्री करत नाही. मग पुन्हा घसरणीला सुरुवात झाली की कमी किंमतीला शेअर विकून बाहेर पडतो. 

शेअर बाजारात ज्यावेळी घसरण होते त्यावेळी ती खरेदीची संधी असते असे समजून शेअर बाजारात थोडे थोडे शेअर खरेदी केले पाहिजे. शिवाय ज्यावेळी बाजार तेजीत आहे त्यावेळी नक्कीच शेअर बाजारात शेअर विकून नफा कमावला पाहिजे. कारण मुळात शेअर बाजारात गुंतवणूक ही चांगला परतावा मिळावा या उद्देशानेच केली असते. 

मग प्रश्न उरतो शेअर खरेदी-विक्री कधी करायची?
शेअर बाजार किती अंशांनी वाढणार अथवा घटणार हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे आपण किती जोखीम घेऊ शकतोय हे ठरवून गुंतवणूक केली पाहिजे. अर्थात ज्या कंपनीचा शेअर खरेदी करणार असाल त्याबाबत प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहेच. शिवाय वर्षभरातील शेअरचीउच्चांकी आणि नीचांकी पातळी किती आहे हे बघणे आवश्यक आहे. 

शेअर खरेदीसाठी पैसे कुठून आणणार?
शेअर बाजारात ज्यावेळी मंदी असते आणि शेअर खरेदीचा सल्ला दिला जातो. मात्र  त्यावेळी सामान्य गुंतवणूकदार म्हणतात पैसे कुठून आणायचे? पण सामान्य गुंतवणूकदारांनी 'बचत' म्हणून केलेला पैसा शेअर बाजारात गुंतवू नये. तुमच्याकडे अतिरिक्त पैसा असेल. जो तुम्हाला तुमच्या अडीअडचणीच्यावेळी लागणार नसेल तेच पैसे शेअर बाजारात गुंतवा. सामान्य गुंतवणूकदाराने कायमच शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊनच गुंतवणूक करणे गरजेचे आहे. जेवढी जास्त जोखीम तेवढा जास्त परतावा हे सगळ्यांना माहिती आहेच. 

गेला महिन्यात कॉर्पोरेट टॅक्समध्ये केलेल्या कपातीच्या घोषणेनंतर शेअर बाजार दोन दिवसात तीन हजार अंशांनी वधारला. त्यामुळे एका दिवसात शेअर बाजाराने 5 टक्के परतावा दिला. त्यामुळे शेअर बाजार सध्या घसरतोय म्हणजे तुमच्याकडे बघून खुणावतोय की घाबरू नका आणि संधीचा फायदा घ्या
 
शेअर बाजारात सध्या खऱ्या अर्थाने सुपीक वातावरण आहे. त्यामुळे आता जेवढं जास्त पेराल तेवढं जास्त पीक भविष्यात मिळेल.


(डिस्क्लेमर: शेअर बाजारातील गुंतवणुकीत सर्वाधिक जोखीम असते. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक करताना तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या आणि मगच गुंतवणूक करा)


  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com