esakal | स्मार्ट टिप्स : तेजी-मंदीतील चुका टाळा!
sakal

बोलून बातमी शोधा

smart tips

स्मार्ट टिप्स : तेजी-मंदीतील चुका टाळा!

sakal_logo
By
गोपाळ गलगली

तेजी आणि मंदी हा शेअर बाजाराचा स्थायीभाव आहे. एकमेकांचा पाठलाग ते करीत असतात. एकमेकांवर कुरघोडी करण्याचाही प्रयत्न करीत असतात. त्याचा प्रत्यय काही शेअरच्या भावात दिसून येतो. कित्येक वेळेला बाजारात काही ‘मार्केट मेकर’ काही शेअरमधे तात्कालिक तेजी-मंदी घडवून आणत असतात. त्यांची अशा शेअरवर पकड असते. त्याचा उपयोग ते स्वतःसाठी करीत असताना बाजार पण हलवत असतात. अशी तेजी-मंदी अल्पकाळ टिकत असते.

‘महासेल’चे दिवस

हल्ली बाजारात सणासुदीनिमित्त सर्वत्र ‘सेल’चा धमाका चालू आहे. चपलांपासून चपलाहारापर्यंत! अशावेळी अनेक कंपन्या आपला जुना, न विकला जाणारा किंवा ‘सेकंड्स’चा माल चांगल्या मालाबरोबरच विक्रीला काढतात. गिऱ्हाईक आकृष्ट होऊन खिसा रिकामा करीत असते. त्याचप्रमाणे शेअर बाजारामध्येही ‘तेजीरुपी सेल’ चालू आहे. मात्र, हा ‘सेल’ कमी भावात नसून, चढ्या भावात चालू आहे. एक ‘आयपीओं’च्या स्वरूपात आणि दुसरा काही निवडक शेअरच्या खरेदी-विक्रीच्या स्वरूपात!

गुंतवणूकदारांनी कोणती काळजी घ्यायला हवी?...

  • तेजीच्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी बाजारात आलेले चढ्या किंमतीचे ‘आयपीओ’ आणि ‘एनएफओ’ ओळखले पाहिजेत.

  • ज्या ‘मर्चंट बँकर’नी संबंधित पब्लिक इश्यू बाजारात आणला आहे, त्यांची विश्वासार्हता तपासली पाहिजे.

  • ‘आयपीओ’ कशासाठी आहे, धंदा वाढविण्यासाठी का जुने कर्ज फेडण्यासाठी, की मालकमंडळींचे शेअर फायद्यात विकण्यासाठी, हे तपासून पाहावे.

  • समान क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या शेअरचा भाव काय आहे, ते तपासावे.

  • ‘आयपीओ’मध्ये पैसे अडकवून ठेवायचे, का ‘लिस्टिंग’च्यावेळी फायदा कमवायचा, ते ठरविले पाहिजे.

  • काही दुसऱ्या चांगल्या शेअरनी आपला ‘पोर्टफोलिओ’ वाढवायचा, की आहेत तेच शेअर वाढवायचे, याचा निर्णय घेतला पाहिजे.

  • शेअर बाजारामध्ये तेजी आहे म्हणून म्युच्युअल फंडामधून बाहेर पडायचे, की तिकडेही गुंतवणूक वाढवायची, हे तज्ज्ञांशी बोलून ठरवावे.

  • तेजीचा फायदा आपण कितपत शेअर विकून घेतो आहोत, ते पाहावे.

  • तेजीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी नफ्यातील सर्व शेअर आता विकून टाकायचे आणि नंतर खाली आल्यावर परत घ्यायचे, हे पण जाणकारांशी बोलून ठरविले पाहिजे.

  • बाजारातील तेजी-मंदी आपल्यासमोर गुंतवणुकीचा भूलभुलय्या निर्माण करीत असते. तो भेदून अलगदपणे बाहेर पडण्यातच आपला कस लागणार आहे.

(लेखक शेअर बाजारातील गुंतवणुकीचे अनुभवी जाणकार आहेत)

loading image
go to top