Share Market : शुभमुहूर्तावर करा गुंतवणूक!

लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर शेअर बाजारात तासभराचे विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्र होणार आहे.
शुभमुहूर्तावर करा गुंतवणूक!
शुभमुहूर्तावर करा गुंतवणूक!sakal

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५९,३०६ अंशांवर, तसेच ‘निफ्टी’ १७,६७१ अंशांवर बंद झाला आहे. आलेखानुसार, ‘निफ्टी’ जोपर्यंत १७,४५२ या आधार पातळीच्या वर आहे, तोपर्यंत निर्देशांकातील घसरण म्हणजे तेजीनंतरचा विसावा असल्याचे प्रतीत होत आहे. येत्या आठवड्यात एचडीएफसी लि., स्टेट बँक, टाटा मोटर्स, डिव्हीज लॅब आदी दिग्गज कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होतील, ज्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.

मुहूर्त ट्रेडिंग

या आठवड्यात गुरुवारी (ता. ४ नोव्हेंबर) सायंकाळी ६.१५ वाजता दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर शेअर बाजारात तासभराचे विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्र होणार आहे. अशा वेळेस गुंतवणूकदारांनी कशा प्रकारे ‘ट्रेडिंग’ किंवा गुंतवणूक करावी, हे आपण पाहूया. ‘मुहूर्त ट्रेडिंग’चा विचार करता, सर्वप्रथम ज्या गुंतवणूकदारांनी यापूर्वी शेअर बाजारात गुंतवणूक करून सध्या उत्तम नफा मिळविला आहे, त्यांनी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवरील नफा हा काही प्रमाणात लक्ष्मीच्या रुपाने घरी आणणे योग्य ठरेल.

शुभमुहूर्तावर करा गुंतवणूक!
Share Market 'या' शेअर्सकडून एका वर्षात 210 टक्के परतावा

दीर्घावधीसाठी गुंतवणूक

दीर्घावधीतील व्यवसायवृद्धीचा विचार करता, पुढील कंपन्यांचा जोखीम लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करणे योग्य ठरू शकेल.

१) एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (बंद भाव ः रु. २६४७)

२) व्हीआयपी इंडस्ट्रीज (बंद भाव ः रु. ५४३)

३) एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज (बंद भाव ः रु. १८२०)

४) गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स (बंद भाव रु. ९५६)

५) व्ही-गार्ड इंडस्ट्रीज (बंद भाव ः रु. २५६)

एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी

एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ही देशातील सर्वांत मोठ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक आहे. व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेचा (एयूएम) विचार करता, कंपनीकडे सप्टेंबर २०२१ पर्यंत ४.४ लाख कोटी रुपये इतका ‘एयूएम’ आहे. २२७ शाखांसह मजबूत वितरणाचे जाळे आणि ७०,००० पेक्षा जास्त वितरण भागीदार कंपनीकडे आहेत. दीर्घावधीमध्ये होणाऱ्या व्यवसायविस्ताराचा विचार करता, कंपनीच्या मिळकतीमध्ये दीर्घावधीत उत्तम वाढ होऊ शकेल, असे वाटते.

व्हीआयपी इंडस्ट्रीज

व्हीआयपी इंडस्ट्रीज ही कंपनी आशियातील सर्वांत मोठी आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची प्रवासी सामान; तसेच इतर गोष्टी नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅग, सूटकेस आदींची उत्पादक आहे. कोरोना महासाथीनंतर आगामी काळात प्रवासी-पर्यटन क्षेत्रात पुन्हा सुगीचे दिवस परतल्यावर कंपनीच्या व्यवसायात उत्तम वाढ होणे अपेक्षित आहे.

एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज

एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज ही कंपनी ॲल्युमिनियम डाय कास्टिंग (अॅलॉय व्हीलसह), सस्पेंशन, ट्रान्समिशन आणि ब्रेकिंग उत्पादनांच्या निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात गुंतलेली आहे. वाहन क्षेत्रात लागणाऱ्या अॅल्युमिनियम कास्टिंग विक्रीचा विचार करता, या कंपनीचा भारतात १६ टक्के बाजारहिस्सा आहे. शॉक ॲब्सॉर्बर आणि फ्रंट फोर्क विक्रीचा विचार करता, या कंपनीचा भारतात ३३ टक्के बाजारहिस्सा आहे. आगामी काळात वाहन उद्योगात प्रगती झाल्यास या कंपनीच्या विक्रीत; तसेच नफ्यामध्ये उत्तम वाढ होऊ शकते.

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स ही ‘हिट’, ‘गुड नाईट’, ‘गोदरेज नंबर १’ साबण, सिंथॉल, गोदरेज एक्स्पर्ट हेयर कलर, नुपूर मेहंदी, एअर फ्रेशनर, गोदरेज प्रोटेक्ट हँड वॉश आदी अनेक नामवंत ग्राहकोपयोगी उत्पादनांची निर्मिती आणि वितरण करते. हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीत यशस्वीरित्या कामकाज करणारे सुधीर सीतापती ऑक्टोबर २०२१ पासून गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस या कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. सध्या गोदरेज समूह बाह्य सल्ल्याची मदत घेऊन सौहार्दपूर्ण विभक्त होण्याच्या मार्गावर आहे. तरीदेखील या कंपनीच्या व्यवसायाचे एकूण स्वरूप आणि भविष्यातील व्यवसायवृद्धीचा विचार करता, या कंपनीच्या शेअरमध्ये दीर्घावधीमध्ये उत्तम परतावा मिळू शकेल.

शुभमुहूर्तावर करा गुंतवणूक!
‘बिटकॉइन’ने टाकले ‘फेसबुक’ला मागे

व्ही-गार्ड इंडस्ट्रीज

व्ही-गार्ड इंडस्ट्रीज ही एक प्रतिष्ठित भारतीय कंपनी आहे, जी इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स वस्तूंच्या श्रेणींमध्ये नावीन्यपूर्ण उत्पादने बनवते. स्टॅबिलायझर, डिजिटल यूपीएस आणि बॅटरी, इलेक्ट्रिकल्समध्ये घरातील वायरिंग केबल, स्वीच गियर, मॉड्यूलर स्वीचेस, पंप; तसेच पंखे, एअर कूलर, स्वयंपाकघरातील उपकरणे, सौर आणि इलेक्ट्रिक वॉटर हीटर आदी अनेक उत्पादनांची निर्मिती आणि वितरण या कंपनीमार्फत केले जाते. गेल्या १० वर्षांत कंपनीने गुंतविलेल्या भांडलावर उत्तम परतावा मिळवत व्यवसायवृद्धी केली आहे.

‘आयआरसीटीसी’च्या शेअरमध्ये नक्की काय झालं?

‘आयआरसीटीसी’ या कंपनीला सुविधा शुल्कातून होणाऱ्या उत्पनातील ५० टक्के हिस्सा रेल्वेला द्यावा लागेल, अशी बातमी आधी धडकल्यावर या शेअरमध्ये घसरण झाली. नंतर रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय मागे घेतल्याची बातमी आल्यावर हा शेअर सावरत रु. ८४५ ला बंद झाला. उलट-सुलट बातम्यांमुळे शेअरचा भाव सी-सॉ सारखा वर-खाली होत असल्याने या शेअरमध्ये नक्की चाललंय तरी काय? अशी गुंतवणूकदारांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. आज (एक नोव्हेंबर) या कंपनीचे तिमाही निकाल जाहीर होतील, ज्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.

या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. यामुळे प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com