Share Market : ‘आयपीओं’ची दिवाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयपीओ

Share Market : ‘आयपीओं’ची दिवाळी

गेली दीड-दोन वर्षे सर्वांसाठी खूपच कसोटीची गेली. कोरोनाच्या महासाथीने जगभरात कहर केला. आपल्यालाही त्याचा त्रास झालाच. कोरोनाची पहिली लाट आली, त्यानंतर दुसरी अजून भयानक आली. हे होत असतानाच, कोरोनावरची लस आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. तिसऱ्या लाटेची पण भीती व्यक्त होत होती, पण जसजसे लसीकरण वाढत चालले आहे, तसतशी कोरोनाची तीव्रता कमी होत चालल्याचे जाणवत आहे. आजपासून दिवाळी सुरू झाली आहे आणि कोरोनाचे संकट पण कमी होत चालले आहे. त्यामुळे एकूणच सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे.

जसे कोरोनाने सगळ्यांना हादरवून सोडले, तसे शेअर बाजार त्यातून कसा सुटणार? तो तर अर्थव्यवस्थेचा आरसाच असल्यामुळे साहजिकच त्याच्यावरही महासाथीचे तीव्र पडसाद उमटले. मार्च २०२० मध्ये २५,००० अंशांच्या घरात आलेला ‘सेन्सेक्स’ हा निर्देशांक उसळी खाऊन अगदी वर आला आणि आता ऑक्टोबर २०२१ मध्ये म्हणजे दीड वर्षात ६०,००० अंशांच्या पार गेला. तब्बल १४० टक्के परतावा नीचांकी स्तरापासून मिळाला आहे. त्यामुळे खरे सांगायचे झाले तर शेअर बाजारात दिवाळीच चालू आहे आजपर्यंत...

शेअर बाजारात ‘धूम मचाले धूम’ चालू असताना नवनव्या कंपन्या संधी कशी सोडतील? दुय्यम (सेकंडरी) बाजारातील तेजी साहजिकच प्राथमिक बाजारासाठी दरवाजे अधिक खुले करते. २०२०-२०२१ मध्ये प्राथमिक समभाग विक्रीचा (आयपीओ) पाऊस पडत गेला. २०२० मध्ये १६ कंपन्यांचे ‘आयपीओ’ आले, तर २०२१ मध्ये आतापर्यंत ३८ ‘आयपीओ’ आलेआहेत. येणारे बहुतांश ‘आयपीओ’ गुंतवणूकदाराला बँक मुदत ठेवींच्या कित्येक पट पैसा मिळवून देत होते. आता नव्या नोव्हेंबर महिन्यात पॉलिसीबझार (पीबी फिनटेक), पेटीएम (वन ९७ कम्युनिकेशन) यांचे मेगा आयपीओ, त्याशिवाय अजून तीन-चार छोटे-मोठे ‘आयपीओ’ येत आहेत. शेअर बाजाराला सतत काहीतरी घडण्याची गरज असते. बातमी नसेल तर तो सुस्तावतो. त्यामुळे या सर्व ‘आयपीओं’नी बाजाराला सतत इंधन पुरवत ठेवून तो धगधगता ठेवला. यात भरीत भर म्हणून कंपन्यांचे तिमाही निकालही उत्तम येत गेले, त्यामुळे वातावरण एकूणच प्रफुल्लित आहे.

‘झोमॅटो’च्या ‘आयपीओ’ने नवे युग

झोमॅटो हे मूळ एक स्टार्टअप आहे. हे असे पहिले स्टार्टअप आहे, की ज्याची शेअर बाजारात नोंदणी झाली आहे. तेव्हापासूनच आता शेअर बाजारात नवनवे स्टार्टअप जसे की पेटीएम, पॉलिसीबझार, मोबिक्विक, ओयो, मॅप इंडिया, नायका आदी कंपन्या येऊन वातावरण अजून उत्साही करण्यास मदत करीत आहेत.

‘झोमॅटो’चा आयपीओ येण्याआधी कंपनीचा अभ्यास करायचा झाला, तर कंपनीचे उत्पन्न, विक्री, नफा, प्रतिशेअर नफा, रिटर्न ऑन इक्विटी या सर्वांचा प्रामुख्याने विचार केला जात असे. पण ‘झोमॅटो’च्या आयपीओला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आणि त्याची झालेली उच्चांकी नोंदणी बघता एकूण न्यू जनरेशन कंपन्यांचा अभ्यास कसा करावा, याच्या ठोकताळ्यांमध्येच थोडा बदल करावा लागेल, की काय, असे वाटते. कारण झोमॅटो कंपनीला अजून नफा झालेला नाही. पण दिवाळीनंतर शिमगाही येतोच, हे प्रत्येक गुंतवणूकदाराने लक्षात ठेवले पाहिजे.

मागील वर्षात गुंतवणूकदार अशा विविध कंपन्यांच्या ‘आयपीओं’मधून मालामाल झाले. कारण १५ दिवसांत त्यांच्या गुंतवणुकीवर ३०-४० टक्क्यांहून अधिक परतावा मिळत होता. चांदी झाली, दिवाळी झाली, हे शब्द अपुरे पडावे, असा परतावा काही नव्या शेअरच्या नोंदणीतून मिळाला. शेअर बाजाराकडे नव्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ही उत्तमच घटना आहे.

पण सावधान... हीच ती वेळ आहे जेव्हा वॉरेन बफे म्हणतात त्यानुसार ‘BE GREEDY WHEN EVERYONE IS FEARFUL AND BE FEARFUL WHEN EVERYONE IS GREEDY’ हे वाक्य लक्षात ठेवण्याची!

त्यामुळे कोणत्याही ‘आयपीओ’ला अर्ज करण्यासाठी काही प्राथमिक बाबी आधी तपासूनच घेतल्या पाहिजे. त्या पुढीलप्रमाणे-

आयपीओ आणत असलेल्या कंपनीचे आधीच बाजारात असणाऱ्या कंपन्यांपेक्षा काही वेगळेपण आहे का?

बाहेरून पैसे गोळा करण्यात कंपनीचा अंतस्थ हेतू काय आहे?

प्रवर्तकांची या भांडवलावर अधिक परतावा मिळवून देण्याची क्षमता आहे का?

मागील ३ ते ५ वर्षे कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?

आणि सर्वांत शेवटी जर आपल्याला या बाबी तपासणे शक्य नसेल, तर आपल्या सल्लागाराकडून त्या तपासून घ्याव्यात. या सर्व बाबींचा शांतपणे विचार केला, तर एकूण आपला निर्णय चुकण्याची शक्यता बरीच कमी होऊन सध्या ‘आयपीओं’ची जी दिवाळी चालू आहे, त्यामध्ये आनंदाने सहभागी होता येईल.

(लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

टॅग्स :Share MarketIPO