आठच दिवसात 'ब्लॅक फ्रायडे'ची पुनरावृत्ती; शेअर बाजार कोसळला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 March 2020

- शेअर बाजार कोसळला ; सेन्सेक्स 893, निफ्टीची 279 अंशांनी घसरण

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भाव आणि येस बँकेवरील निर्बंध यामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली. परिणामी मुंबई शेअर बाजार सेन्सेक्स 893.99 अंशांनी घसरून 37,576.62 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी 279.55 अंशांनी खाली येऊन 10,989.45 वर स्थिरावला. दरम्यान सकाळच्या सत्रात बाजार उघडताच सेन्सेक्स 1,459 अंशांनी तर निफ्टी 350 अंशांनी कोसळल्याने गुंतवणूकदारांच्या चार लाख कोटींचा चुराडा झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने जागतिक शेअर बाजार घसरलेले असतानाच खासगी क्षेत्रातील येस बँकेवर आरबीआयने आर्थिक निर्बंध लादल्याने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर विक्रीवर जोर दिला. परिणामी बीएसई आणि एनएसईवरील सर्वच प्रमुख निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरून बंद झाले. क्षेत्रनिहाय पातळीवर सार्वजनिक बँकांचा निर्देशांक सर्वाधिक 5.25 टक्क्यांनी घसरला होता. त्याखालोखाल मीडिया, धातू आणि रिएलटी क्षेत्रातील निर्देशांकांमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. तर निर्बंध लादण्यात आलेल्या येस बँकेचा शेअर तब्बल 54.89 अंशांनी घसरून 16.60 वर स्थिरावला.

सेन्सेक्सच्या मंचावर बजाज ऑटो, मारुती आणि एशियन पेन्ट्सच्या शेअर्समधील नाममात्र तेजी वगळता इतर सर्व 27 शेअर मोठ्या प्रमाणात घसरले होते. घसरण झालेल्या शेअरमध्ये टाटा स्टील, एसबीआय, इंडसइंड बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि ओएनजीसीच्या शेअरमध्ये सर्वाधिक पझाड झाली होती.

परकी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक काढून घेण्यावर भर
कोरोनाचा परिणाम आणि ढासळत्या रुपयाच्या पार्श्वभूमीवर परकी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेण्यावर भर दिला आहे. परकी गुंतवणूकदारांचा कल शेअर विक्रीवर राहिल्याने मागील 14 सत्रात एकूण 18,343 कोटींची गुंतवणूक देशाबाहेर गेली आहे.

रुपयात घसरण सुरूच

आंतरराष्ट्रीय चलन बाजारात कालच्या सत्रात वधारलेला रुपया आज पुन्हा 32 पैशानी घसरून 73.24 वर स्थिरावला.

आठच दिवसात दुसरा 'ब्लॅक फ्रायडे'

28 फेब्रुवारीला सेन्सेक्स आणि निफ्टीतील तब्बल 3 टक्क्यांची घसरण ताजी असतानाच आज पुन्हा एका 'ब्लॅक फ्रायडे'ची पुनरावृत्ती झाली.

                        सेन्सेक्स   निफ्टी
28 फेब्रुवारी        1448        431
06 मार्च              893         279


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share market update BSE Midcap index down