बाजाराची पातळी खरेदीसाठी उत्तम!

बाजाराची पातळी खरेदीसाठी उत्तम!

गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची अनपेक्षित निवड, तसेच केंद्र सरकारने काळ्या पैशाच्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या अनपेक्षित पावलामुळे सर्वत्र गोंधळाची स्थिती होती. त्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला. सोबत अमेरिकी फेडरल येत्या डिसेंबरमध्ये व्याजदरवाढ करणार अशा बातम्या पसरल्याने बाजारात भीतीचे वातावरण पसरले. इतर जागतिक बाजारांच्या तुलनेत आपल्या बाजारात चढ-उतार तीव्र व अधिक मोठे होते. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांची निवड आपल्या बाजारासाठी फार नकारात्मक नसून, केवळ माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रासाठी तात्पुरती व थोडे दिवस चिंता वाढवणारी आहे. ५०० व १००० च्या नोटांवरील बंदीमुळे देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदतच होणार आहे. यापुढे दैनंदिन व व्यापारात रोखीने देवाण-घेवाण होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्‍यता राहील. यामुळे सरकारी तिजोरीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराच्या रूपाने मोठी भर पडणार आहे. देशाचा विकासदर सुधारण्यासाठी सरकारला खर्च वाढविता येणार असून, सोबत देशाचे आंतराष्ट्रीय आर्थिक मानांकन वाढण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय मानांकन वाढल्यास परकी वित्तीय संस्थांचा शेअर बाजरात गुंतवणुकीचा ओघ वाढणार आहे.
जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील कंपन्यांचे सरासरी निकाल उत्तम नसले तरी नकारात्मक नाहीत. वायदा बाजारातील १७४ कंपन्यांपैकी १३२ कंपन्यांचे निकाल जाहीर झाले असून, कंपन्यांचे हे निकाल विक्री व नफा वार्षिक व तिमाही अंतराने वाढते आहेत. मागील तिमाहीपेक्षा यावेळेस अधिक कंपन्यांनी चांगले निकाल जाहीर केले आहेत. सर्व अंगाने विचार करता, ‘निफ्टी’ ८०५० अंशांखाली जाण्याची भीती नसून, आजची बाजाराची पातळी खरेदीसाठी उत्तम आहे. ८०५० अंशांखाली किंवा फार काळ बाजार खाली थांबणार नसून, पुढील दोन महिन्यांत ‘निफ्टी’ ९०० अंशांपर्यंत वाढण्याची शक्‍यता अधिक आहे.               

तांत्रिक पातळी... 
शुक्रवारच्या दिवसअखेर ‘निफ्टी’ ८३२७ अंश या पातळीवर बंद  झाला. तांत्रिक आलेखानुसार या पातळीपासून वरच्या दिशेने ७३९० व ८५२० अंशांवर अनुक्रमे विरोध पातळ्या दिसत असून, ८२५० व ८०५० अंशांवर अनुक्रमे आधार पातळ्या दिसत आहेत. सध्या ‘निफ्टी’ ८०५० ते ८५२० अंश या पातळीत काही दिवस राहण्याची शक्‍यता आहे. ८०५० अंश ही पातळी तोडून खाली जाण्याची शक्‍यता नसून, वरच्या ८५२० अंशांच्या पातळीवर लगेच जाण्याची शक्‍यता नाही. ८०५० अंश या पातळीजवळ मोठ्या प्रमाणात खरेदी होत राहील. ८५२० अंशांवर जेव्हा ‘निफ्टी’ ताकदीने टिकेल, तेव्हा वरच्या ९०० अंशांच्या दिशेने ‘निफ्टी’ निघण्याची शक्‍यता राहील. सध्या खरेदीस मोठी संधी असून, ही संधी परत लवकर मिळण्याची शक्‍यता नाही.    

खरेदी करण्यासारखे...
बॅंक ऑफ इंडिया (आजचा भाव : रु. १२२, उद्दिष्ट : रु. ३००)
देशांतर्गत चालू घडामोडी बॅंकिंग क्षेत्रासाठी लाभदायक ठरत असून, सरकार व रिझर्व्ह बॅंकेने घेतलेल्या भूमिकेमुळे या क्षेत्रातील व्यवसायाला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल, असे संकेत मिळत आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी बॅंकांमध्ये सर्वाधिक लाभ देणारी ही बॅंक ठरण्याची शक्‍यता आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीचे बॅंकेने आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या निकालातून बॅंकेची आर्थिक परिस्थिती सुधारत असून, बॅंकेने थकीत कर्जाच्या वाढत्या प्रमाणात पुढे घट होईल, असे संकेत दिले आहेत. चालू तिमाहीत ते १.७१ टक्‍क्‍याने वाढलेले दिसत असून, हे इतर सरकारी बॅंकांच्या तुलनेत कमी आहे. नफ्यातही मार्च २०१६ नंतर वाढ होत असून, या तिमाहीत तो १११ टक्‍क्‍यांनी वाढला आहे. बॅंकेची नगदी परिस्थिती सुधारत असून, इतर गुणोत्तरीय प्रमाणेही शेअर खरेदीसाठी उपयुक्त आहेत. आज बॅंकेचा शेअर निव्वळ मालमत्तेनुसार असलेल्या भावाच्या तुलनेत ०.४१ टक्‍क्‍यात मिळत आहे. हे प्रमाण १ पर्यंत अगदी सहज जाणार असून, अशावेळी शेअरचा भाव रु. ३०० पेक्षा अधिक राहील. एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी गुंतवणूक ठेवल्यास हे उद्दिष्ट सहज मिळण्याची आशा आहे.   

अंदाज खरा ठरला...
८५५० ते ८७३० अंश ही बंदिस्त पातळी तोडून ‘निफ्टी’ वरच्या दिशेने निघाल्यानंतर पाच सप्टेंबरच्या अंकात ‘निफ्टी’तील चालू वाढ ९००० अंशांवर थांबेल व तेथून ‘करेक्‍शन’ सुरू होईल, तसेच त्याचा पहिला टप्पा ८५०० अंशांवर राहील व ८५०० अंशांवरून परत ‘निफ्टी’ ८७३० अंशांपर्यंत वाढेल व तेथून ८०५० या खालच्या पातळीकडे निघेल, असे म्हटले होते. पुढे ५ ते ६ महिने ‘निफ्टी’ ८००० ते ९००० अंशांदरम्यान राहील, असेही लिहिले होते. ‘करेक्‍शन’ अगदी त्याच टप्प्यांप्रमाणे झालेले आहे.   

(डिस्क्‍लेमर - लेखक शेअर बाजाराचे संशोधन विश्‍लेषक आहेत. वरील लेखातील मत व अंदाज त्यांनी आपल्या अभ्यासातून व्यक्त केला आहे. त्याच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर आणि तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com