esakal | स्मार्ट खबरदारी : चेक देताय? काळजी घ्या!
sakal

बोलून बातमी शोधा

स्मार्ट खबरदारी : चेक देताय? काळजी घ्या!

स्मार्ट खबरदारी : चेक देताय? काळजी घ्या!

sakal_logo
By
सुधाकर कुलकर्णी

चेकमधील नावात अथवा रकमेत फेरफार करून गैरप्रकार (फ्रॉड) करण्याच्या घटना वरचेवर घडताना दिसून येतात. यावर एक प्रभावी उपाय म्हणून ‘पॉझिटीव्ह पे’ ही सुविधा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) विकसित केली असून, नुकतीच म्हणजे एक सप्टेंबर २०२१ पासून रिझर्व्ह बँकने ती लागू केली आहे.

‘पॉझिटीव्ह पे’ सुविधेची प्रमुख वैशिष्ट्ये...

  • रु. ५०,००० वरील रकमेचा चेक देण्यासाठी ही सुविधा खातेदारांना आता वापरता येईल. रु. ५०,००० ते रु. ५ लाखांपर्यंतच्या रकमेचा चेक देताना ही सुविधा वापरणे ऐच्छिक स्वरुपाची असेल; मात्र रु. ५ लाख व त्यावरील रकमेचा चेक देताना ही सुविधा वापरणे बंधनकारक असणार आहे.

  • यानुसार चेक देताना चेकवरील पेयीचे नाव, रक्कम, तारीख व चेक नंबर हा तपशील चेक देण्यापूर्वी बँकेला कळवावा लागणार आहे.

  • आपण दिलेल्या तपशिलाची नोंद बँकेकडे घेतली जाईल व ज्यावेळी चेक बँकेकडे ‘पेमेंट’साठी येईल, त्यावेळी आपण दिलेला तपशील व चेकवरील तपशील तंतोतंत जुळला तरच बँकेकडून चेकचे पेमेंट केले जाईल; अन्यथा चेक परत केला जाईल. तसे झाल्यास चेक रिटर्न चार्जेस खातेदाराच्या खात्यावर नावे टाकण्यात येतील.

  • जर रु. ५ लाख अथवा त्यावरील रकमेचा चेक देताना अशी माहिती खातेदाराने बँकेस दिली नसेल, तर चेकचे पेमेंट होणार नाही (खात्यात पुरेशी शिल्लक असली तरी); शिवाय चेक रिटर्न चार्जेसही भरावे लागतील.

  • चेकचा तपशील देण्यासाठी आपण नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यांचा वापर करू शकता. बँकांनी आता हा पर्याय त्याच्या साईटवर; तसेच मोबाईल अॅपवर देऊ केलेला आहे.

  • आपण जर नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यासारखी सुविधा वापरत नसाल, तर प्रत्यक्ष बँकेत जाऊन हा तपशील देणे गरजेचे आहे.

  • ‘पॉझिटीव्ह पे’ची पूर्तता केली नसल्यास चेक पेमेंट बाबतची तक्रार करता येणार नाही. त्यामुळे आधीच खबरदारी घ्यायला हवी.

थोडक्यात, यापुढे चेकचे पेमेंट आणखी सुरक्षित झाले आहे, असे म्हणता येईल.

(लेखक सर्टिफाइड फायनान्शिल प्लॅनर- सीएफपी आहेत)

loading image
go to top