
स्मार्ट गुंतवणूक - म्युच्युअल फंडाची कोटीच्या कोटी उड्डाणे
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत आणि म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेत (एयूएम) मोठी वाढ झाली आणि हा कल चालू वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात देखील तसाच राहिल्याचे चित्र दिसत आहे. यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे गेल्या वर्षभरात भारतीय शेअर बाजाराने घेतलेली उसळी! शेअर बाजारातील बहुसंख्य कंपन्यांच्या शेअरचे बाजारमूल्य वाढल्याने त्याचे प्रतिबिंब म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेत पडले. मार्च २०२० मध्ये २८,००० पर्यंत कोसळलेल्या ‘सेन्सेक्स’ने अवघ्या १४ महिन्यांच्या कालावधीत म्हणजे मे २०२१ मध्ये ५१,००० अंशांच्या पातळीला स्पर्श केला. यावरूनच वाढलेल्या मालमत्तेचा अंदाज बांधता येईल. दुसरे कारण म्हणजे गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंड गुंतवणुकीत मोठ्या संख्येने जोडले गेलेले नवे गुंतवणूकदार!
यातही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) या पद्धतीनुसार गुंतवणूक करण्याकडे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा कल गेल्या वर्षात वाढलेला दिसत आहे. ‘ॲम्फी’ संस्थेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात १ कोटी ४४ लाख नवी ‘एसआयपी’ खाती उघडली गेली, ज्याद्वारे तब्बल ९६,००० कोटी रुपये विविध म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतविले गेले. हाच कल पुढेदेखील सुरु राहिला आणि एप्रिल २०२१ या एका महिन्यात उघडल्या गेलेल्या सुमारे १४ लाख नव्या ‘एसआयपी’ खात्याद्वारे अंदाजे ८६०० कोटी रुपये गुंतविले गेले. गुंतवणुकीच्या या ओघामुळे देशातील म्युच्युअल फंडांच्या एकूण मालमत्तेने नुकताच ३२ लाख कोटी रुपयांचा मोठा टप्पादेखील पार केला.
गुंतवणूकदारांना फायदा
मार्च २०२० ते मे २०२१ या कालावधीत बहुतेक म्युच्युअल फंडांच्या ‘एनएव्ही’चा आलेख इंग्रजी ‘व्ही’ (V) अक्षराप्रमाणे झालेला दिसत आहे, ज्याचा फायदा या कालावधीत सुरु असलेल्या ‘एसआयपी’ गुंतवणूकदारांना झाला. एका सोप्या उदाहरणाने हे लक्षात येईल. मार्च २०२० मध्ये ४०,००० अंशांच्या पातळीला स्पर्श केलेला ‘सेन्सेक्स’ त्यानंतर कोसळून २८,००० अंशांपर्यंत आला आणि त्यानंतर पुन्हा वाढत त्याने मे २०२१ मध्ये त्याने ५१,००० अंशांची पातळी गाठली. या कालावधीत ‘सेन्सेक्स’वर आधारित इंडेक्स फंडांत ज्यांनी ‘एसआयपी’ केली होती, त्यांना उत्तम परतावा मिळाला. साधारणतः अशाच प्रकारचे चित्र म्युच्युअल फंडांच्या बहुसंख्य योजनांमध्ये गेल्या वर्षभरात पाहायला मिळाले.
आता पुढे काय?
‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ पुन्हा एकदा सर्वोच्च पातळीच्या जवळ पोचल्यानंतर ‘तेजीचा बुडबुडा’ फुटणार, असा अंदाज काही तज्ज्ञ वर्तवित आहेत.
म्युच्युअल फंडाच्या ‘एसआयपी’ गुंतवणूकदारांनी ही संधी मानून आपली ‘एसआयपी’ सुरू ठेवावी. शक्य असल्यास नवी ‘एसआयपी’ सुरू करावी. अर्थात ‘एसआयपी’चा कालावधी दीर्घकालीन असावा.
संभाव्य अंदाजाप्रमाणे बाजार कोसळला तरी भविष्यात तो जेव्हा सावरेल तेव्हा म्युच्युअल फंडांच्या ‘एनएव्ही’चा मार्च २०२० पासूनचा आलेख ‘डब्ल्यू’ (W) या इंग्रजी अक्षरासारखा दिसेल. या कालावधीत ‘एसआयपी’ गुंतवणूक सुरू असलेल्या गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होईल.
बाजार कोसळल्यानंतर अशा ‘एसआयपी’च्या जोडीला त्याच फंडात एकरकमी गुंतवणूक करण्याची तयारी ठेवल्यास दुहेरी फायदा होऊ शकतो.
बाजार कोसळला नाही, तर सध्या सुरू असलेल्या ‘एसआयपी’वर फायदा मिळेलच.
अर्थात बाजार कोणत्याही स्थितीत असला तरी ‘एसआयपी’च्या पद्धतीने दीर्घकालीन गुंतवणुकीत फायदा होतो, येणाऱ्या काळातही म्युच्युअल फंडांची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरूच राहतील, असे वाटते.
(लेखक म्युच्युअल फंडांचे अभ्यासक आहेत.)