सोनेरी गुंतवणुकीसाठी ‘सॉव्हरिन गोल्ड बाँड’

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा कारभार सांभाळल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षातील (२०१९-२०) सार्वभौम सुवर्ण रोखे अर्थात ‘सॉव्हरिन गोल्ड बाँड’ची विक्री करण्याचे धोरण जाहीर केले होते.

केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा कारभार सांभाळल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी चालू आर्थिक वर्षातील (२०१९-२०) सार्वभौम सुवर्ण रोखे अर्थात ‘सॉव्हरिन गोल्ड बाँड’ची विक्री करण्याचे धोरण जाहीर केले होते. त्यानुसार या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत टप्प्याटप्प्याने अशा बाँडची विक्री होत असून, त्यातील चौथा आणि शेवटचा टप्पा ९ ते १३ सप्टेंबर या काळात प्रस्तावित आहे. केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून ‘सॉव्हरिन गोल्ड बाँड’ बाजारात आणले आहेत. यामुळे धातुरूपी सोन्याची जोखीम घेण्याची इच्छा नसलेल्या गुंतवणूकदारांना आता अशा पेपररूपी सोन्यात गुंतवणुकीची संधी मिळत आहे. हे बाँड सर्वसामान्य गुंतवणूकदारांना विकत घेता येणे शक्‍य व्हावे म्हणून किमान एक ग्रॅम सोने विकत घेता येईल इतक्‍या सुलभ मूल्यामध्ये उपलब्ध केले जात आहेत. 

हे गोल्ड बाँड विकत घेण्याची कमाल मर्यादा एका आर्थिक वर्षात (एप्रिल ते मार्च) व्यक्ती वा हिंदू अविभक्त कुटुंबासाठी (एचयूएफ) प्रत्येकी चार किलो सोन्याचे बाँड इतकी आहे. विद्यापीठ, सार्वजनिक न्यास, धर्मादाय संस्थांसाठी ही मर्यादा कमाल २० किलो गोल्ड बाँडइतकी ठरविण्यात आली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या गोल्ड बाँडच्या इश्‍यूसाठी प्रतिग्रॅम रु. ३८९० इतकी किंमत रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केली आहे. या बाँडची खरेदी ऑनलाइन पद्धतीने किंवा त्याचे पैसे डिजिटल पद्धतीने दिले जाणार असतील, तर गुंतवणूकदारांना प्रतिग्रॅम ५० रुपयांची खास सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे अशा गुंतवणूकदारांसाठीची किंमत प्रतिग्रॅम ३८४० रुपये असेल. हे गोल्ड बाँड आठ वर्षे मुदतीचे असून, पाच वर्षांनंतर बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध असेल. या बाँडवर अडीच टक्के दराने व्याज मिळणार असून, ते करपात्र असेल. शिवाय हे बाँड तारण ठेवून बॅंका, वित्तसंस्था, बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था यांच्याकडून गुंतवणूकदारांना कर्जसुद्धा घेता येणार आहे. डिमॅटच्या स्वरूपात असलेल्या बाँडचे व्यवहार स्टॉक एक्‍स्चेंजवर करता येणार आहेत. त्याचबरोबर एका गुंतवणूकदाराकडून दुसऱ्या पात्र गुंतवणूकदाराकडे हे गोल्ड बाँड हस्तांतरितसुद्धा करता येणार आहेत. मुदतीनंतर या बाँडद्वारे धातुरूपी सोने मिळणार नसून, त्याऐवजी सोन्याच्या किमतीइतके पैसे दिले जाणार आहेत. मुदतपूर्तीनंतर व्यक्तींना मिळणारा दीर्घकालीन भांडवली नफा पूर्णतः करमुक्त करण्यात आला आहे. सर्व करदात्यांना या बाँडच्या हस्तांतरामुळे येणारा दीर्घकालीन भांडवली नफा ‘इंडेक्‍सेशन’च्या फायद्यासह ठरविता येईल, असेही स्पष्ट केले गेले आहे.

हे बाँड सर्व शेड्युल्ड बॅंका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ठरावीक टपाल कार्यालये, मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. प्रत्यक्ष धातुरूपी सोनेखरेदीऐवजी डिजिटल रूपात सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी सॉव्हरिन गोल्ड बाँड ही उत्तम संधी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sovereign gold bonds