family money.jpg
family money.jpg

काय आहेत वैयक्तिक अर्थकारणाचे टप्पे ?

नाशिक : वैद्यकीय क्षेत्रातील विविध पदव्या सामान्य माणसाला माहीत नसतात. त्यामुळे एखादा आजार झाल्यानंतर कोणत्या डॉक्‍टरकडे जावे हा मोठा संभ्रम असतो. नेहमीच्या आजाराचे ठीक आहे, पण नेहमीपेक्षा काही वेगळी लक्षणे असल्यास कोणती डिग्री कोणत्या आजारासाठी आहे हे समजण्यासाठी सखोल माहिती काढावी लागते. पर्सनल फायनान्समध्येही काहीसे असेच आहे. एखाद्या व्यक्तीने किंवा कुटुंबाने आर्थिक बाबींची सुरवात कुठून करावी किंवा ते कुटुंब सध्या जी कृती गुंतवणूक, विमा किंवा इतर आर्थिक बाबतीत करताहेत ती योग्य आहे की नाही हे कसे ठरवता येईल, यासाठीच या लेखाचा ऊहापोह. यासाठी कुटुंबाचे वयोमान आणि आर्थिक स्थिती या दोन घटकांवर अवलंबून याचे वर्गीकरण करता येईल. प्रत्येक वर्गात बसणाऱ्या कुटुंबाची आर्थिक बाबींच्या कृतींची गरज वेगळी असू शकते. अशा प्रकारे वर्गीकरण केल्यानंतर कुटुंबाचे प्रकार आणि त्यांची आर्थिक कृती काय असायला हवी हे एकेक करून बघू या : 

कुटुंब प्रकार 1 : मुख्य सदस्य तिशीतील आणि मासिक उत्पन्न कुटुंबाला पुरेसे 
नवीन संसार सुरू केलेले किंवा संसार सुरू करून काही वर्षे झालेल्या अशा कुटुंबांमध्ये स्थिरस्थावर व्हायला काही काळ जातो. नवीन संसार, नातेवाईक, करिअर, मुले या सगळ्यात आर्थिक बाबींकडे दुर्लक्ष होण्याची शक्‍यता असते. खरेतर आर्थिक नियोजन उत्पन्न सुरू झाल्या झाल्या होणे अपेक्षित आहे, पण ते केले नसेल तर कमीत कमी या कुटुंबाने सुदृढ पाया रचण्याच्या दृष्टीने खालील कृती करणे आवश्‍यक ठरते. त्यात कमावत्या व्यक्तीचा टर्म इन्शुरास घेणे, कुटुंबाचा आरोग्यविमा घेणे, मासिक गुंतवणूक योग्य प्रमाणात सुरू करणे आणि आपत्काल रक्कम बाजूला काढणे या बाबी मुख्यत्वे करून येतात. 

कुटुंब प्रकार 2 : मुख्य सदस्य तिशीच्या पुढे आणि पंचेचाळीसच्या आत आणि मासिक उत्पन्न चांगले. आर्थिक स्थिरता यायला लागल्याबरोबर आयुष्यातील उद्दिष्टांसाठी गुंतवणूक सुरू करणे गरजेचे ठरते. 
अशा कुटुंबाने सविस्तर आर्थिक नियोजन करून आर्थिक घडी बसविणे योग्य ठरते. आर्थिक नियोजन केल्यानंतर मासिक खर्च योग्य प्रमाणात होतो आहे की नाही, कर्ज योग्य प्रमाणात आहे की नाही, रोकड आणि मालमत्ता यांचे प्रमाण योग्य आहे की नाही, प्रत्येक उद्दिष्टासाठी योग्य मासिक गुंतवणूक किती, गुंतवणूक योग्य प्रमाणात योग्य पर्यायामध्ये केली आहे की नाही, विमा योग्य प्रमाणात घेतला आहे की नाही असे सगळे अभ्यासून त्यावर योग्य उपाययोजना केली पाहिजे. 

कुटुंब प्रकार 3 : मुख्य सदस्य तीस ते पन्नासमध्ये, आतापर्यंत चांगले नियोजन केलेले आणि मुख्य आर्थिक उद्दिष्टांसाठी गुंतवणूक झालेली. या प्रकारात मोडणारे कुटुंब साधारणपणे सधन कुटुंब म्हणवले जाऊ शकते. यांची सगळी उद्दिष्टे पूर्ण झालेली असतात. म्हणजेच खेळता पैसा असतो आणि त्याचे काय करायचे हा मुख्य प्रश्‍न असतो. अशा कुटुंबांनी आर्थिक स्वायत्ततेकडे एक पाऊल टाकायला हरकत नाही. आर्थिक स्वायत्तता म्हणजे पुढील आयुष्यात उदरनिर्वाहासाठी काम करावे लागू नये. त्यासाठी (वेळेच्या आधीच) निवृत्त कधी व्हायचे हे ठरवून पुढील आयुष्यात येणारे सगळे खर्च दरमहा येणाऱ्या व्याजातून तहहयात झाले पाहिजेत याचे नियोजन करणे. आर्थिक स्वायत्तता मिळवण्यासाठी आधीच्या दोन पायऱ्या पूर्ण करणे आणि स्वायत्ततेसाठी गुंतवणूक सुरू करणे अपरिहार्य ठरते. 

कुटुंब प्रकार 4 : मुख्य सदस्य साधारणपणे चाळीसच्या पुढे आणि भरपूर मालमत्ता असणारे अशा प्रकारच्या कुटुंबामध्ये असलेली मालमत्ता (चल आणि अचल) कशी टिकवायची आणि कशी वाढवायची ही मुख्य समस्या असते. या कुटुंबाने वरील सगळ्या पायऱ्या ओलांडलेल्या असतात. अशा कुटुंबाचे लक्ष मुख्यत्वे वेल्थ मॅनेजमेंट असले पाहिजे. चक्रवाढ पद्धतीने पैसे वाढवणे, गुंतवणूक जोखमीचे योग्य व्यवस्थापन करणे, नवनवीन गुंतवणुकीच्या संधी शोधणे, मालमत्ता पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी नियोजन आणि व्यवस्थापन करणे आणि त्यासाठी योग्य सल्लागार नेमणे इत्यादी कृती करणे क्रमप्राप्त आहे. 

वरील चार कुटुंब प्रकारांत ज्यांना तत्काळ आर्थिक कृतीची आवश्‍यकता असते अशी साधारणपणे सगळीच कुटुंबे बसतात. वरील चार प्रकार म्हणजे योग्य वेळी योग्य कृती काय आहे यांची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com