
स्मार्ट विश्लेषण : स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स
स्टार हेल्थ ही भारतातील आरोग्य विमा कंपन्यांमधील एक अग्रगण्य कंपनी आहे. २००६ मध्ये स्थापन झालेल्या कंपनीची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यांचा बाजारातील हिस्सा १५ टक्के असून, कंपनीचा ८० टक्के व्यवसाय मुख्यत्वे विमा प्रतिनिधींद्वारे चालतो; ज्यांची संख्याच पाच लाखांच्या घरात आहे. ७७९ शाखांमधून व्यवसायाचे खूप मोठे जाळे देशभर पसरलेले असून, ११,७७८ हॉस्पिटलशी कंपनी संलग्न आहे.
प्रश्न : कंपनीच्या ‘आयपीओ’विषयी प्राथमिक माहिती काय आहे?
- येत्या ३० नोव्हेंबर २०२१ पासून प्राथमिक समभाग विक्री सुरु होत असून, ती २ डिसेंबर २०२१ पर्यंत चालू राहील. यासाठी किंमतपट्टा रु. ८७०-९०० असून, कमीत कमी १६ शेअर व त्याच्या पटीत अर्ज करता येईल.
प्रश्न : कंपनीची एकूण आर्थिक प्रगती कशी आहे?
- मागील तीन वर्षांमध्ये कंपनीच्या वैयक्तिक मालमत्तेत रु. १६४२ कोटींपासून रु. ४९७४ इतकी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२०२० मध्ये रु. २६८ कोटी नफ्यात असलेल्या कंपनीचे २०२०-२१ मध्ये कोविड महासाथीमुळे रु. ८२५ कोटींचे नुकसान झाले आहे.
प्रश्न : ‘आयपीओ’साठीची किंमत योग्य वाटते का?
- आर्थिक वर्ष २०२०-२०२१ हे कोरोनाच्या महासाथीमुळे विमा कंपन्यांसाठी जास्तच खडतर गेले. यानंतर अगदी सप्टेंबर २०२१ च्या तिमाहीमध्ये देखील रु. ३८० कोटींचा तोटा कंपनीला सहन करावा लागला आहे. मागील तीन वर्षांमध्ये सरासरी प्रति शेअर नफा ०.९१ आहे. या हिशेबाने रु. ९०० ही इश्यूची किंमत पकडली, तर जवळपास ९०० च्या घरात ‘पीई रेशो’ येतो. आयसीआयसीआय लोम्बार्ड, न्यू इंडिया अॅश्युरन्स या कंपन्यांचा पीई रेशो अनुक्रमे ५६ आणि २६ आहे. यामुळे हे समजते, की इश्यूची किंमत महाग आहे आणि त्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांसाठी आता तरी खूप लगेच फायदा होईल, असा वाव कंपनीने ठेवलेला दिसत नाही. तसेच अजून एक महत्त्वाची बाब अशी, की कंपनी जेव्हा फायद्यात होती, तेव्हासुद्धा कंपनीच्या आधीच्या गुंतवणूकदारांनी रु. ५०० च्या भावाने आपले शेअर विकले होते. आता मागील दोन वर्षांमध्ये साचलेला तोटाच रु. ११०४ कोटींच्या घरात आहे, अशा वेळी रु. ९०० ही किंमत समर्थन करावी, अशी वाटत नाही. एकूण ७२०० कोटींच्या इश्यूमध्ये फक्त रु. २००० कोटी नवा निधी कंपनी उभारणार आहे, तर रु. ५२०० कोटी इतकी मोठी रक्कम ही केवळ ‘ऑफर फॉर सेल’ आहे. त्यामुळे कंपनीकडे जास्त पैसा येणार नसून, परस्पर शेअरविक्रेत्यांकडेच जाणार आहे. बरेचदा तेजीमध्ये असे दिसून येते, की कंपनीचे प्रवर्तक चढ्या किंमतीमध्ये शेअर विकून मोकळे होतात आणि यामध्ये भरडला जातो तो सर्वसामान्य गुंतवणूकदार; ज्याने वरवरच्या ऐकीव माहितीवर ‘आयपीओ’मधून शेअर घेतलेले असतात.
आता बाजारातील एकूण परिस्थितीचा विचार केला, तर दक्षिण आफ्रिका, युरोपमध्ये कोरोनाची व्याप्ती परत वाढायला लागली आहे. ही एक चिंताजनक बाब आहे. इन्शुरन्स कंपन्यांना तर तो एक शापच म्हणावा लागेल. या सर्वांचा परिणाम होऊन जागतिक बाजारात मंदीसदृश वातावरण तयार झाले आहे. १५ नोव्हेंबर रोजी ६१ हजार अंशांच्या घरात असणारा ‘सेन्सेक्स’ २६ नोव्हेंबरला म्हणजे अवघ्या ११ दिवसांत ५७ हजार अंशांच्या घरात येऊन पोचला आहे. एक महिन्याच्या कालावधीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) रु. ३० हजार कोटींची शेअरविक्री केली आहे. त्यामुळे एखाद्या ‘आयपीओ’च्या नोंदणीसाठी लागणारे उत्साहवर्धक वातावरण सध्या तरी बाजारात दिसत नाही. अशावेळी गुंतवणूकदारांनी खूप सावधगिरीने वागले पाहिजे.
(लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)