गुंतवणूक करताना कल्पना करा की

शेअर बाजारात झालेल्या घसरणीचे पडसाद भारतीय शेअर बाजारांवर उमटले
money
moneysakal
Summary

शेअर बाजारात झालेल्या घसरणीचे पडसाद भारतीय शेअर बाजारांवर उमटले

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५८,०९८ अंशांवर तर ‘निफ्टी’ १७,३२७ अंशांवर बंद झाले. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँकांनी स्वीकारलेल्या व्याजदरवाढीच्या धोरणामुळे प्रमुख देशांच्या शेअर बाजारात झालेल्या घसरणीचे पडसाद भारतीय शेअर बाजारांवर उमटले. गेल्या शुक्रवारी सेन्सेक्सने १०२० अंशांची तर निफ्टीने ३०२ अंशांची पडझड दर्शविली. शेअर बाजारात घसरण होत असताना रुपयाने एका डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळी गाठली असून ८१ च्या वर पोहोचला आहे. बँकिंग प्रणालीतील कमी झालेली तरलता, कमकुवत रुपया, व्याजदरवाढीच्या धोरणामुळे विकासाचे इंजिन मंदावण्याची भीती आदी अनेक कारणांमुळे सध्या बाजारात चिंतेचे वातावरण आहे. बाजारात चिंतेचे वातावरण असताना गुंतवणूकदारांनी बाजाराचे हेलकावे पाहून डळमळून जाण्याऐवजी भांडवलावर उत्तम परतावा मिळवून व्यवसाय वृद्धी करू शकणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये संयम ठेऊन दीर्घावधीसाठी गुंतवणूक करणे हिताचे ठरू शकेल.

शेअरचा भाव वाढत असेल तर गुंतवणुकीवर मिळणारा परतावा पाहून गुंतवणूकदार सुखावतात. दीर्घावधीसाठी गुंतवणूक करत असतानादेखील अनेक गुंतवणूकदार केवळ शेअरचे वाढते भाव आणि त्यातील हालचाल बघून केलेली गुंतवणूक कितपत योग्य आहे याचा आढावा घेत असतात. आता समजा, शेअर बाजार काही काळ बंद असेल आणि शेअरचे भाव आणि हालचाल दिसत नसेल, तर ज्या कंपन्यांच्या शेअरमध्ये आपण गुंतवणूक केली आहे ती कितपत योग्य आहे याचा आढावा कसा घेणार. याबाबत दिग्गज गुंतवणूकतज्ज्ञ वॉरन बफेट म्हणतात “दुसऱ्या दिवशी बाजार बंद पडू शकतील आणि कदाचित पुढच्या पाच वर्षांसाठी पुन्हा उघडू शकणार नाहीत, या गृहीतकावर मी खरेदी करतो.” दीर्घावधीसाठी गुंतवणूक करताना मार्केट १० वर्षे बंद राहिल्यासदेखील तुम्हाला पूर्ण आनंद देईल, अशी खरेदी करा, असे बफेट यांचे सांगणे आहे.

गुंतवणूक गुरु पीटर लिंच यांच्या म्हणण्याप्रमाणे शेअर म्हणजे लॉटरीचे तिकीट नसते तर प्रत्येक शेअरमागे एक कंपनी असते. यामुळे कंपनीच्या शेअरचे भाव दिसत नसले तरी कंपनीच्या व्यवसाय वृद्धीचा आढावा घेता येणे शक्य आहे. दीर्घावधीत भांडलावर उत्तम परतावा मिळवत कंपनीच्या नफ्यात वाढ होत चालली असेल तर शेअरचे भाव दिसत नसले तरीही केलेली गुंतवणूक कितपत योग्य आहे, याचा आढावा घेणे शक्य आहे. एखादी कंपनी कर्जबाजारी होऊन कंपनीच्या नफ्यात तसेच मालमत्तेत सातत्याने घट होत चालली असेल तर कंपनीच्या शेअरचा बाजार भाव दिसत नसला तरी त्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत धोक्याचे आहे, हे सहज समजू शकते. एकंदरीत केवळ बाजार भाव बघून तसेच अल्पावधीतील चढउतारांमुळे गोंधळून जाण्याऐवजी दीर्घावधीसाठी गुंतवणूक करताना काही काळ बाजार बंद केला किंवा बाजार भाव दिसणार नसतील तर कंपनी कितपत गुंतवणूक योग्य आहे, अशी कल्पना करून दीर्घावधीसाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल.

सध्या दीर्घावधीच्या दृष्टीने खालील कंपन्यांच्या शेअरचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

एचडीएफसी बँक (शुक्रवारचा बंद भाव रु.१४४६)

पीआय इंडस्ट्रीज (शुक्रवारचा बंद भाव रु.३०५८)

बर्जर पेंट्स (शुक्रवारचा बंद भाव रु.६३३ )

मारिको (शुक्रवारचा बंद भाव रु.५४२)

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणेआवश्यक आहे.)

(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com