esakal | प्राप्तिकर बचतीचे मार्ग
sakal

बोलून बातमी शोधा

प्राप्तिकर बचतीचे मार्ग

प्राप्तिकर नियोजन करताना आर्थिक नियोजन केल्यास आपण प्राप्तिकर तर वाचविताच शिवाय आपल्या गुंतवणुकीवर जास्त परतावा (रिटर्न) मिळवू शकता आणि आपल्या भविष्यातील गरजांची तरतूदही करू शकता त्या दृष्टीने गुंतवणुकीचे कोणते पर्याय उत्तम आहेत हे आज पाहू. 

प्राप्तिकर बचतीचे मार्ग

sakal_logo
By
सुधाकर कुलकर्णी

प्राप्तिकर नियोजन करून त्या दृष्टीने योग्य तो पर्याय निवडून त्यात गुंतवणूक करणाऱ्या करदात्यांचे प्रमाण खूपच कमी असल्याचे दिसून येते. सामान्यत: फेब्रुवारी, मार्च महिना आला की घाईघाईने इन्शुरन्स पॉलिसी, पेन्शन योजना, टॅक्‍स सेव्हिंग एफडी यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्याचे दिसून येते. तथापि प्राप्तिकर नियोजन करताना आर्थिक नियोजन केल्यास आपण प्राप्तिकर तर वाचविताच शिवाय आपल्या गुंतवणुकीवर जास्त परतावा (रिटर्न) मिळवू शकता आणि आपल्या भविष्यातील गरजांची तरतूदही करू शकता त्या दृष्टीने गुंतवणुकीचे कोणते पर्याय उत्तम आहेत हे आज पाहू. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा  

इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस): म्युच्युअल फंडाची ही योजना सेक्‍शन ‘80सी’ अंतर्गत हा एक उत्तम पर्याय असून सर्व म्युच्युअल फंड ही योजना देऊ करतात. यात एसआयपीच्या माध्यमातून किंवा एकरकमी गुंतवणूक करू शकता. कालावधी : गुंतवणुकीचा कालावधी केवळ 3 वर्षे इतका आहे. 
(अन्य पर्यायांच्या तुलनेने खूप कमी) 

नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस): ही केंद्र सरकारची योजना आहे. यातील गुंतवणूक सेक्‍शन 80 अंतर्गत करसवलतीस पात्र असते शिवाय ‘80सी’ची रु.1.5 लाख ही मर्यादा पूर्ण झाली असल्यास यातील रु.50 हजार पर्यंतची गुंतवणूक सेक्‍शन '80 सीसीडी' (1बी) अंतर्गत करसवलतीस पात्र असते आणि जर आपल्या एमप्लॉयरने आपल्या मूळ पगाराच्या (बेसिक+डीए) 10 टक्‍क्‍यांपर्यंत आपल्या एनपीएस खात्यात रक्कम जमा केली असेल तर सेक्‍शन '80सीसीडी' (2) ही रक्कम करमुक्त होते. 

युलिप : युलिप विमा कवच देऊन गुंतवणूक बाजारात सहभागी होण्याची संधीही देते. आयुर्विमा कंपनीमार्फत या योजना दिल्या जातात व यातील गुंतवणूक सेक्‍शन ‘80सी’  अंतर्गत करसवलतीस पात्र असते. या शिवाय मुदती नंतर मिळणारी रक्कम सेक्‍शन 10 (10डी) नुसार करमुक्त असते. 

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ): हा 80सी अंतर्गत एक अत्यंत सुरक्षित असा गुंतवणुकीचा पर्याय आहे. तसेच यातून मिळणारे व्याज करमुक्त असल्याने व्याजावर "टीडीएस' लागत नाही व 'हायर टॅक्‍स ब्रॅकेट'मधील करदात्यास याचा विशेष फायदा होतो. गरज पडल्यास गुंतवणूकदार वर्षानंतर नियमानुसार यातील रक्कम काढू शकतो. सध्या गुंतवणुकीवर 7.9 टक्के व्याज मिळते. खात्याची प्रारंभिक मुदत 15 वर्षे असून त्यानंतर 5 वर्षासाठी कितीही वेळ वाढविता येते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) : सुरक्षित गुंतवणूक असून  ‘80सी’ अंतर्गत करसवलतीस पात्र आते, ही गुंतवणूक फक्त पोस्ट ऑफिसमध्ये करता येते. यात मिळणारे व्याज करपात्र असले तरी त्याची पुनर्गुंतवणूक होत असल्याने ‘80सी’ नुसार कर सवलतीस पात्र असते. तसेच मुदतीनंतर मिळणारी रक्कम करमुक्त असते. यातील गुंतवणुकीचा कालवधी 5 वर्षे वर्षे इतका असून गरज पडल्यास 3 वर्षानंतर ‘एनएससी' तारण ठेवून कर्ज घेता येते. सध्या यातील गुंतवणुकीवर 7.9 टक्के इतके व्याज मिळते. 

टॅक्‍स सेव्हिंग एफडी : राष्ट्रीयीकृत बॅंका, मोठ्या खाजगी व सहकारी बॅंकांमार्फत ही गुंतवणूक करता येते. यावर मिळणारे व्याज बॅंकेनुसार कमी-अधिक असू शकते. गुंतवणुकीचा कालवधी 5 वर्षे असून मुदत पूर्व रक्कम काढता येत नाही. 

पेन्शन योजना : बहुतेक सर्व इंश्‍युरन्स कंपन्या पेन्शन प्लॅन्स देऊ करतात यातील गुंतवणूकसुद्धा ‘80सी’   अंतर्गत कर सवलतीस पात्र असते. 

सुकन्या समृद्धी योजना : मुलीच्या शिक्षण व लग्नासाठी तरतूद करण्यासाठी पालकांना उपयुक्त योजना आहे. यातील गुंतवणूक सेक्‍शन ‘80सी’ अंतर्गत करसवलतीस पात्र असते. सध्या 8.4 टक्के व्याज मिळते.

लाइफ इन्शुरन्स पॉलिसी : हा जरी एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय असला तरी यातील गुंतवणूक दीर्घकालीन (10 ते 40 वर्षे ) असून मिळणारा ‘रिटर्न’ कमी असतो. एन्डोवमेंट, मनी बॅक, व्होललाइफ यांसारख्या पारंपारिक योजनेतून मिळणारे विमा कवच पुरेसे नसते. 

सुधाकर कुलकर्णी , सर्टिफाइड फायनान्सिअल प्लॅनर, पुणे